Wednesday, August 31, 2016

महा-अवयवदान अभियानात
विविध महाविद्यालयात मार्गदर्शन संपन्न
नांदेड, दि. 31 :- महा-अवयवदान अभियान-2016 मध्ये आज श्री गुरुगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यावतीने प्रतिभा निकेतन महाविद्यालय तसेच पिपल्स महाविद्यालय येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. दीपक हजारी यांनी अवयवदानाचे महत्व तसेच त्याबाबतच्या गैरसमजुती, इतर बाबींवर विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. डी. के. स्वामी, डॉ. प्रा. डी. एन. वाघमारे, एम. बी. लुटे, पिपल्स महाविद्यालयाचे  प्राचार्य आर. एम. जाधव तसेच एनएसएस प्रमुख प्रा. मुनेश्वर यांची उपस्थीती होती. अवयव दानाचे महत्व या कार्यक्रमास विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचा उत्तम  प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शेंकेचे निरसन करण्यात आले. डॉ. प्रदीप बोरसे, प्रवीण गुजर, सुवर्णकार सदाशिव यांनी संयोजन केले.

000000
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 31 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 2 सप्टेंबर 2016 रोजी  यवतमाळ येथून सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
शनिवार 3 सप्टेंबर 2016 रोजी लातूर येथून सोईनुसार शासकीय वाहनाने नांदेड मार्गे यवतमाळकडे प्रयाण करतील.  

000000

विशेष छायाचित्रे….

बळीराजाचा सवंगडी...जीवलग आणि त्याच्या कुटुंबाचाच एक भाग असणाऱ्या...बैलांचा सण म्हणजे पोळा...गुरूवारी बैलपोळा साजरा होतो आहे. त्यासाठी या बैलांना सजविण्या...धजविण्यासाठी धन्यांचीही धांदल सुरु आहे. बैलाला पवनी पाडणे... म्हणजे त्याच्यासोबत जलक्रिडा करण्याची...पोहण्याची आणि...त्यात धन्याकडून कोडकौतुक करून घेण्यातही मग आगळी मौज असते, हे दर्शविणाऱे बोलके क्षण टिपले आहेत, विजय होकर्णे यांनी कंधार..लोहा परिसरात..पोळ्याच्या पुर्वसंध्येला....








माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझा संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा

नांदेड, दि. 31 :- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी  संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन (एचडी) छायाचित्रे dgiprnews01@gmail.com या ई मेल पत्यावर  दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5  तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक वरिष्ठ  सहायक  संचालक  अजय  जाधव  (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com),  सहायक   संचालक  सागरकुमार कांबळे (8605312555), (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.

0000000
सण-उत्सवातून सामाजिक सलोखा
वाढविण्याचा प्रयत्न व्हावा - काकाणी
जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न 
नांदेड, दि. 31 :-  आगामी काळातील सण-उत्सव उत्साहात पण शांततेत व सामाजिक सलोखा वाढीस लागेल अशारितीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी येथे केले. जिल्हास्तरीय शांतता समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे मंगळवारी 30 गस्ट रोजी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सण-उत्सवासाठी  प्रशानाच्यावतीने चोख बंदोबस्त तसेच काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे तसेच विशेषतः समाज माध्यमांवरून (सोशल मिडीया) प्रसारीत होणाऱ्या गोष्टींबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी गणेश उत्सव व बकरी-ईद यांच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडीत, अशोक बनकर , तहसिलदार पी. के. ठाकूर, मनपा उपायुक्त रत्नागर वाघमारे यांच्यासह नांदेड शहर आणि जिल्ह्यातील मान्यवर सदस्य उपस्थित होते.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, यंदा चांगल्या पावसामुळे बाजारपेठेत सण-उत्सवांचा उत्साह चांगला राहील. पण याच काळात अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. सण-उत्सव साजरे करताना या उत्साहाचा विनियोग चांगले समाजोपयोगी संदेश प्रसारीत करण्यासाठी करण्यात यावा. जलजागृती विषयी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी वाचवा, बेटी बचाओ, उज्ज्वल नांदेड, व्यसनमुक्ती अशा सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. उत्सवातील स्पर्धा ही सकारात्मक राहावी. उत्सव मंडळांनी अतीउत्साही कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवावे. सर्वच प्रकारच्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत. सार्वजनिक शांततेचे भान बाळगून उत्सव साजरे करावेत. पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, डॅाल्बीमुक्त मिरवणूक तसेच पाणी-ध्वनी-पर्यावरणाचे प्रदूषण टाळून सण-उत्सव साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले. नाकाबंदी, समाजकंटकावर कारवाई तसेच संशयितांची माहिती तातडीने पोलिसांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था यासाठीही संयुक्त पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
सीसीटिव्ही कॅमेरे तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने उत्सव काळातील गर्दी, मिरवणुका यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवायोजनेचे सदस्य तसेच उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही स्वयंसेवक म्हणून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहभागी करुन घेतले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी सांगितले.
आयुक्त श्री. उन्हाळे यांनी गणेश उत्सव तसेच बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत माहिती दिली. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा यासाठी तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात स्वच्छतेविषयक तत्पर सुविधा व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनीही विविध उपयुक्त सूचना मांडल्या. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. पंडीत यांनी आभार मानले.                              

0000000
नांदेड तालुक्यात दिवसभरात 96.50 मिमी पाऊस  
जिल्ह्यात हंगामात 69.73 टक्के  
          नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात  बुधवार 31 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 484.73 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 30.30  मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे.  सर्वाधिक पाऊस नांदेड तालुक्यात 96.50 मिमी इतका झाला आहे. तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 666.33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्याक्रमाने) भोकर- 86.76, लोहा- 84.18, हदगाव- 82.49, अर्धापुर- 77.81, नांदेड- 76.88, हिमायतनगर- 76.16, माहूर- 74.42, बिलोली- 70.82, कंधार- 68.08, नायगाव- 65.66, धर्माबाद- 64.66, मुदखेड- 63.34, मुखेड-61.84, किनवट- 61.45,देगलूर- 51.39, उमरी- 50.44. यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  69.73 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात बुधवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 96.50 (701.11), मुदखेड- 14.00 (540.68), अर्धापूर- 19.67 (676.66) , भोकर- 11.25 (864.50) , उमरी- 15.00 (502.59), कंधार- 33.17 (549.14), लोहा- 40.67 (701.51), किनवट- 7.00 (762.03), माहूर- 17.25 (922.75), हदगाव- 29.29 (806.14), हिमायतनगर- 18.00 (744.32), देगलूर- 29.00 (462.68), बिलोली- 51.40 (685.60), धर्माबाद- 26.67 (592.03), नायगाव- 58.00  (601.20), मुखेड- 17.86 (548.41) आज  अखेर  पावसाची सरासरी 666.33  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 10661.35) मिलीमीटर आहे.  

000000
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड, दि. 31 :-  राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड  हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 2 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 6 वा. यवतमाळ येथून लातूरकडे प्रयाण करतील. शनिवार 3 सप्टेंबर 2016 रोजी लातूर येथून सोईनुसार शासकीय वाहनाने नांदेड मार्गे यवतमाळकडे प्रयाण करतील.  

000000
जिल्हा कारागृहात फिरते कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 31 :-  जिल्हा कारागृह नांदेड येथे  कायदेविषयक  शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. ए. आर. कुरेशी,  फिरत्या कायदेविषयक शिबीराचे न्या. भीमराव नरवाडे पाटील, अॅड. प्रविण अयाचित उपस्थित होते.  
यावेळी श्री. कुरेशी यांनी विविध कायदयांची माहिती दिली. जिल्हा न्यायालयातील नवनियुक्त अति. सह दिवाणी न्यायाधीश जे.आर. पठाण , न्या. श्रीमती बी. ए. तळेकर, श्रीमती एन. एम. बिरादार यांनी प्ली बारगीनिंगबाबत बंद्यांना मार्गदर्शन केले. अॅड. नईमखान पठाण, अॅड. श्रीमती पी. ए. झगडे, अॅड. ए. बी. घोरपडे, अॅड. एम. डी. वाकोडकर यांनी उपस्थित बंद्यांना प्ली बारगीनिंग, जामिनाच्या तरतूदी, न्यायाधीन बंदी व सिध्ददोष बंदी यांचे अधिकार या विविध विषयावरील  कायद्यांची माहिती  दिली. निवृत्त न्यायाधीश नरवाडे पाटील यांनी एकमेकाबद्दल भेदभाव न करण्याचे आवाहन केले.  
जिल्हा  कारागृहाचे  अधिक्षक जी. के. राठोड यांनी  आभार मानले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.

00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...