Wednesday, August 31, 2016

सण-उत्सवातून सामाजिक सलोखा
वाढविण्याचा प्रयत्न व्हावा - काकाणी
जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न 
नांदेड, दि. 31 :-  आगामी काळातील सण-उत्सव उत्साहात पण शांततेत व सामाजिक सलोखा वाढीस लागेल अशारितीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी येथे केले. जिल्हास्तरीय शांतता समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे मंगळवारी 30 गस्ट रोजी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सण-उत्सवासाठी  प्रशानाच्यावतीने चोख बंदोबस्त तसेच काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे तसेच विशेषतः समाज माध्यमांवरून (सोशल मिडीया) प्रसारीत होणाऱ्या गोष्टींबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी गणेश उत्सव व बकरी-ईद यांच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडीत, अशोक बनकर , तहसिलदार पी. के. ठाकूर, मनपा उपायुक्त रत्नागर वाघमारे यांच्यासह नांदेड शहर आणि जिल्ह्यातील मान्यवर सदस्य उपस्थित होते.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, यंदा चांगल्या पावसामुळे बाजारपेठेत सण-उत्सवांचा उत्साह चांगला राहील. पण याच काळात अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. सण-उत्सव साजरे करताना या उत्साहाचा विनियोग चांगले समाजोपयोगी संदेश प्रसारीत करण्यासाठी करण्यात यावा. जलजागृती विषयी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी वाचवा, बेटी बचाओ, उज्ज्वल नांदेड, व्यसनमुक्ती अशा सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. उत्सवातील स्पर्धा ही सकारात्मक राहावी. उत्सव मंडळांनी अतीउत्साही कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवावे. सर्वच प्रकारच्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत. सार्वजनिक शांततेचे भान बाळगून उत्सव साजरे करावेत. पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, डॅाल्बीमुक्त मिरवणूक तसेच पाणी-ध्वनी-पर्यावरणाचे प्रदूषण टाळून सण-उत्सव साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले. नाकाबंदी, समाजकंटकावर कारवाई तसेच संशयितांची माहिती तातडीने पोलिसांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था यासाठीही संयुक्त पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
सीसीटिव्ही कॅमेरे तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने उत्सव काळातील गर्दी, मिरवणुका यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवायोजनेचे सदस्य तसेच उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही स्वयंसेवक म्हणून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहभागी करुन घेतले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी सांगितले.
आयुक्त श्री. उन्हाळे यांनी गणेश उत्सव तसेच बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत माहिती दिली. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा यासाठी तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात स्वच्छतेविषयक तत्पर सुविधा व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनीही विविध उपयुक्त सूचना मांडल्या. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. पंडीत यांनी आभार मानले.                              

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...