Monday, July 8, 2024

 वृत्त क्र. 569 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पेन्शन अदालत  

नांदेड, दि. 8 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै 2024 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवार 9 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 568 

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम 

नांदेड, दि. 8 जुलै :- खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. 

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टीक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञान वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी मूग,उडीद,ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन या  पिकासाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 

मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तूर व सोयाबीन ही पिक स्पर्धेतील पिके आहे.  या स्पर्धेसाठी पात्रतेच निकष पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ). ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12, 8-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक / पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत ही आवश्यक कागदपत्रे आहेत.  

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. मूग,उडीद 31 जुलै. ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन - 31 ऑगस्ट. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील. 

बक्षिस स्वरूप

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाठी रुपये पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धा पातळी तालुका पातळीवर पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये, तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये राहिल, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

 वृत्त क्र. 567 

मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन 

नांदेड, दि. 8 जुलै :- सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. 

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, व आजार यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये डीबीटी प्रणाली द्वारे निधी वितरीत करण्यात येणार आहे. 

या योजनेच्या अधिक माहितीसाठी लातूर विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण, विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयांशी संपर्क साधण्याचे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 566 

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना 

लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 8 जुलै :- येत्या शैक्षणिक वर्षात 2024-25 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्तीसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आय.टी.आय, पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम (बि.एस.सी, कृषीसह) बि.ई, एम.बी.बी.एस., एम.बी.ए यांना वार्षिक अर्थसहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholaarship.gov.in वर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे. 

प्रिमॅट्रिकसाठी आहे. आणि पोष्ट मॅट्रिकसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर प्रदर्शित केली आहे. अर्जाची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, अशी माहिती वैद्य बिडी वर्कर वेलफेअर फंड डिस्पेंसरी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 565 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी

आज व उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड, दि. ८ जुलै :- जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 9 व बुधवार 10 जुलै 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा मेळावा ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.  या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 910 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावेत. या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 564 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस

पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन


नांदेड, दि. 8 जुलै :- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सन 2023 व सन 2024 या वर्षीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची बैठक लवकरच आयोजित करण्यात येत आहे.

यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या मान्यवर पुरस्कारार्थींची नावे पाठविण्यात येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराकरिता नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र कलाकारांच्या नावांची शिफारस (वैयक्तिक माहितीसह) 13 सप्टेंबर 1993 च्या शासन निर्णयात जोडलेल्या तपशीलाप्रमाणे mahaculture@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत पाठवावे. आलेल्या शिफारशी समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...