वृत्त क्रमांक 307
दोन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव संपन्न
50 लाख रुपयांपेक्षा अधिक शेत मालाची थेट विक्री
नांदेड दि. 19 मार्च :- महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 17 व 18 मार्च 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे संपन्न झाला. या महोत्सवास नागरिक, ग्राहक उर्त्स्फूत प्रतिसाद दिला असून या दोन दिवसात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली आहे.
जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतातील आधुनिक तंत्रज्ञान हवामान बदल व शेती पुढील आव्हाने या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवनवार यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व आणि प्रक्रिया तसेच महिलांना उद्भवणारे आजार त्यावरील उपाय योजना याविषयी माहिती दिली. केळी संशोधन केंद्र नांदेड येथील प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी केळी पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड व निर्यातक्षम केळी उत्पादन यावर सविस्तर मार्गदर्शन करून निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना याविषयी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते. 18 मार्च 2025 रोजी समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कृषी संचालक तथा रोटरी क्लब नांदेडचे सचिव सुरेश अंबुलगेकर तर प्रमुख पाहुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी उपसंचालक हरिराम नागरगोजे, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड अनिल शिरफुले, किनवटचे राजकुमार रणवीर, देगलूरचे विठ्ठल गीते, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार संचालक एस. डी. मोरे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉक्टर माधुरी रेवनवार, केळी संशोधन केंद्र नांदेड येथील प्रभारी अधिकारी डॉक्टर शिवाजीराव शिंदे आदींची उपस्थिती होती.
महोत्सवामध्ये मालेगावचे शेतकरी भगवान इंगोले, चिखली बु. चे सत्यनारायण मंत्री , मनाठाचे संजय सूर्यवंशी, सुनिता कावळे, दापशेडचे विश्वनाथ होळगे, वाडी बु चे व्यंकटराव पावडे आदींनी मनोगत व्यक्त केले व महोत्सव दरवर्षी व्हावा जेणेकरून जिल्ह्यातील सर्व प्रगतशील शेतकऱ्याचे गेटटुगेदर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये 83 स्टॉलधारक तसेच कृषी विभागातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महोत्सवामध्ये 83 स्टॉलमध्ये शेतकरी, महिला बचतगट, विविध कंपन्यांचे स्टॉल आदीं 117 विक्रेत्यांनी आपल्या शेतमाल व साहित्याची मांडणी करून विक्री केली. महोत्सवामध्ये विविध प्रकारचा शेतमाल जो शहरात सहजासहजी उपलब्ध होणार नाही जसे की हातसडीचे तांदूळ, काळे गहू, खपली गहू, डाळीमध्ये तुर, मुग, उडीद, मसूर, ज्वारी, विविध प्रकारची फळे जसे की टेंबरे, विविध जातीची आंबे, नर्सरीची रोपे यांची 50 लक्ष रुपयांची विक्री झाली. कृषी विभागासह इतर विभागातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नांदेड शहरातील नागरिक यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महादेव पिंपळगाव तालुका अर्धापूर येथील शेतकरी मुगाजी कामाजी कल्याणकर यांच्या दुग्धजन्य पदार्थाची कुल्फी, खवा, कलाकंद, आदी पदार्थांची दोन दिवसांमध्ये 50 हजार रुपयांची विक्री झाली. कामठा बु. येथील महानंदा कल्याणकर यांचे सेंद्रिय टरबूज हे ग्राहकांचे खास पसंती ठरली. तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोहा यांनी तयार केलेले पाणलोटाचे मॉडेल व नंदकिशोर गायकवाड भोसी तालुका भोकर येथील शेतकऱ्यांचा मियाझाकी या आंब्याचे प्रदर्शनामध्ये खास आकर्षण होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक वसंत जारीकोटे तर आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागातील तंत्र अधिकारी के एम जाधव, मेरगेवार, प्रमोद गायके, संदीप स्वामी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण हांडे, नितीन नाईक, आदींसह कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000