Friday, November 29, 2019


हिब्बट, माळाकोळी येथील
भूगर्भातील आवाजाच्या अनुषंगाने आवाहन
 नांदेड, दि. 29 :-  नांदेड जिल्‍हयात मुखेड तालुक्यात हिब्बट आणि लोहा तालुक्यात माळाकोळी येथील भूगर्भातील आवाज आणि भुकंपांच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातील भू भौतिकी विभागाचे वरीष्‍ठ अॅसोसिएट  प्रोफेसर  डॉ.. विजय कुमार यांच्‍यासोबत चर्चा केली.
चर्चेत डॉ. विजय कुमार यांनी पावसाचे अधिकतम प्रमाण असल्‍यास भूगर्भात जमा होणारे  पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्‍ट तथा प्‍लेटांचे घर्षण बेसॉल्‍ट खडक  तथा अंतर्गत खनिज यांच्‍याशी संयुग होऊन मुक्‍त होणाऱ्या वायुमुळे हे आवाज निर्माण होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. अशी परिस्थिती निर्माण झाल्‍यास न  घाबरता सावधगिरी बाळगण्‍याचे त्‍यांनी सांगितले. मिनीतुन होणाऱ्या आवाजांची नोंद ही भूकंपमापक यंत्रावर होत नसुन भूकंपनाच्‍या तिव्रतेची नोंद होते, असे सांगितले.
हिब्‍बट आणि माळाकोळी याठिकाणी जमीनीतुन ध्‍वनिक उत्‍सर्जन आणि भूकंपाच्‍या हालचाली वारंवार अनुभविण्‍यात येत असल्‍याने जिल्‍हा प्रशासनाने वेळीच याची माहिती राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण मंत्रालय मुंबई,  भूकंप अन्‍वेषण केंद्र केंद्रीय पृथ्‍वी विज्ञान विभाग नवी दिल्‍ली आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपुर यांना वेळोवेळी निदर्शनास आणुन दिली असन यावर संशोधन सुरु आहे.
जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी 25 नोव्‍हेंबर 2019 रोजी स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातील भूभौतिकी विभागाचे वरीष्‍ठ अॅसोसिएट प्रोफेसर डॉ. टि. विजय कुमार यांच्‍यासोबत एक तास चर्चा केली. नांदेड आणि सभोवतालचा प्रदेश हा सेस्मिक झोन- 2 या श्रेणीत येत असुन सोलापुर पासुन तेलंगाना राज्‍यातील बोधन पर्यंत संपुर्ण भूगर्भाची स्‍कॅनिंग होत असल्‍याची आणि ठिकठिकाणी याचे केंद्र उभारण्‍यात येत असल्‍याची  माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
     ग्रामीण भागातील अनेक घर कच्‍चे आणि पत्र्यांचे असतात तसेच त्‍यावर मोठे लाकडाचे ओडके, खोड किंवा वजनदार दगड ठवलेले असतात ते अतिशय धोकादायक ठरतात. कारण भूकंपाच्‍या वेळी हे खाली पडुन मोठी जीवितहानी करतात. दोषपुर्ण बांधकाम हे भूकंपात फार जास्‍त धोकादायक ठरतात. भूकंपाच्‍या वेळी सावधानता बाळगाने हे सगळयात जास्‍त महत्‍वाचे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
00000


जिल्हा परिषदेची गुरुवारी सर्वसाधारण सभा
नांदेड, दि. 29 :- नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी 5 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12.30 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144
नांदेड, दि. 29 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 26 डिसेंबर 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु: सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 डिसेंबर 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000


स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी
15 डिसेंबरला निवड चाचणी परीक्षा
नांदेड दि. 29 :-  सेतू समिती नांदेड संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत युपीएससी व एमपीएससी तयारी करण्यासाठी सेतू समिती संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत प्रवेश देण्यासाठी सन 2019-20 या वर्षातील निवड चाचणी परीक्षा 15 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 दुपारी 12 यावेळेत घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 2 ते 9 डिसेंबर 2019 पर्यंत nanded.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे. परीक्षा शुल्क दोनशे रुपये असून 2 ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत ग्रंथपाल स्पर्धा परीक्षा अभ्यासिका स्टेडीयम परिसर नांदेड यांच्याकडे भरणा करावी. परिक्षेचे स्थळ नांदेड जिल्ह्याच्या nanded.gov.in या संकेतस्थळावर वेगळ्याने प्रसिद्ध करुन प्रवेशपत्र ऑनलाईन काढण्याची सुविधा 12 ते 14 डिसेंबर 2019 या कालावधीत उपलब्ध राहील. परिक्षेचा निकाल 15 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वा. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव सेतू समिती नांदेड यांनी दिली आहे.  
000000


मयत आरोपी शेरुसिंघच्या
मृत्यूची दंडाधिकारी चौकशी  
नांदेड दि. 29 :- पोलीस स्टेशन अर्धापूर हद्दीत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गु.र.नं. 287 /2019 क. भा.द.वि. सह कलम 3/25, 26 (2) भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्ह्यातील मयत आरोपी शेरुसिंघ ऊर्फ शेरा पि. दलबिरसिंघ खैरा रा. माळटेकडी  यांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे.   
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी पोलीस स्टेशन अर्धापूर यांच्या हद्दीत गुरुवार 21 नोव्हेंबर 2019 रोजी शेरसिंघ ऊर्फ शेरा पि. दलबिरसिंघ खैरा रा. माळटेकडी नांदेड यांच्या समवेत घडलेल्या पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याने या मृत्युचे कारण निश्चितीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 प्रमाणे नांदेड उपविभागीय दंडाधिकारी यांना दंडाधिकारी चौकशी अधिकारी म्हणून दंडाधिकारी चौकशी 15 दिवसाचे आत करुन अहवाल सादर करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
0000


पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने  
सवलती लागू करण्याचा आदेश निर्गमीत
नांदेड दि. 29 :- ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये झालेल्‍या क्‍यार महा चक्रिवादळामुळे झालेल्‍या अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 562 गावांमध्ये विविध सवलती लागू करण्‍याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केला आहे.
             आदेशात म्हटले आहे की, ऑक्‍टोबर – नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये झालेल्‍या क्‍यार   महा चक्रि वादळाने झालेल्‍या अवेळी पावसामुळे विविध सवलती लागू करण्‍यास शासनाने मान्‍यता दिली आहे. त्यानुसार जिल्‍हयातील 16 तालुक्‍यात एकूण 1 हजार 562 गावामध्‍ये  अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍याने जमीन महसूलात सूट. शेतीपिकांच्‍या नुकसान झालेल्‍या शेतक-यांच्‍या पाल्‍यांना शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्‍कात माफी देण्याची सवलत लागू राहील.  शासनाच्‍या अनुज्ञेय या सवलती देण्‍याची व्‍यवस्‍था संबंधीत विभाग प्रमुखांनी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000


जिल्हयात सातव्या आर्थिक गणनेची सुरुवात
नांदेड दि. 29 :- केंद्र शासनाच्यावतीने राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात ये आहे. आर्थिक गणनेच्या या कामाची सुरुवात नांदेड येथे मंगळवार 26 नोव्हेंबर  रोजी झाली आहे. यावेळी उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमास श्री सरोदे, सहसंचालक, क्षेत्रीय कार्य विभाग, राष्ट्रीय नमुना पाहणी तसेच कार्यालयातील श्री भोसले, श्री थोरात, श्री मीना, श्री भोसले इतर अधिकारी, कर्मचारी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर (C.S.C.), नांदेडचे अधिकारी श्रीपवार, श्री नेहाते, इतर प्रगणक पर्यवेक्षक उपस्थित होते.
ही गणना प्रथमच मोबाईल ॲपव्दारे होणार असून ही गणना पेपरलेस होणार आहे.यामध्ये व्यवसाय, उदयोग, वस्तु सेवावितरणामध्ये सहभागी आस्थापना, रोजगार, कामगारांची संख्या, स्वयंरोजगार, कामगार पणन संस्था . घटकांची गणना केली जाणार आहे. आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम Common Service Centre (CSC) E-Governance यांचेकडून नेमण्यात आलेल्या प्रगणक पर्यवेक्षक यांच्याकडून केले जाणार आहे. नियुक्त प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून कुंटुंबाची माहिती संकलित करणार आहेत.तसेच प्रगणकांनी केलेल्या कामाचे तपासणी पर्यवेक्षक करतील.
आर्थिक गणनेच्या माहितीचा उपयोग केंद्र राज्य शासनास नियोजन धोरण आखण्यासाठी होतो. याप्रसंगी जिल्हायातील सर्व शहर गावांत गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हा स्तरीय समन्वय समिती मधील सर्व प्रशासकीय अधिका-यांनी गणना करण्यासाठी नेमणूक केलेल्या प्रगणक पर्यवेक्षक यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी / सर्व स्तरावरील जनतेने सदर गणनेबाबत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी निखील बासटवार यांनी केले आहे.
000000


पोशिंद्याच्या उभारीसाठी
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा "प्रयास"
         
नांदेड,दि. 29 :- जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी विविध कारणांनी विवंचनेत सापडला आहे. त्यातूनच वैफल्यग्रस्त होवून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. आत्महत्या मागच्या कारणांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते, उपाय योजना मात्र तोकडी पडते. आत्महत्येनंतर करण्यात येणारी मदत गेलेल्या व्यक्तीची उणीव कदापी भरून काढू शकत नाही. आत्महत्या होवूच नयेत या जाणीवेतून नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी "प्रयास" नावाने नवोपक्रम सुरू केला आहे.
गुरूवार 28 रोजी शहरातील नियोजन भवनात शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या अनुषंगाने विशेष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चार तास चाललेल्या या चर्चा सत्रात शेतकरी आत्महत्या मागची कारणे व त्या रोखण्यासाठी उपाययोजनांची सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी कृषि, आरोग्य, मानसशास्त्र, पोलिस प्रशासन, किर्तनकार, लोककलावंत, सेवाभावी संस्था आदी क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवून उपाय सुचवले.
हरवत चाललेला संवाद जपावा
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
अगदी मागच्या पिढीपर्यंत गावागावातून पार, चावडी सारख्या ठिकाणी चर्चा होत. नियमितपणे एकमेकांची ख्याली खुशाली विचारली जात असे. त्यामुळे एखाद्याच्या समस्येबाबत जेष्ठांच्या मार्गदर्शनातून लगोलग उपाय देखील निघत. अलिकडे नागरिकरणाचा वेग वाढल्यामूळे हरवत चाललेला संवाद देखील या दुर्देवी समस्येच्या मुळाशी आहे. बऱ्याचदा समस्या छोटी असते परंतू तिचा बाऊ केल्याने मोठी वाटते. अशावेळी सकारात्मक संवाद नवी उभारी देतो. त्यामुळे या चर्चासत्रातून पुढे आलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे आले पाहिजे. विवंचनेत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
चर्चेचा सूर - आर्थिक विवंचनेसह मनो- सामाजिक न्यूनगंड
शेतकरी आत्महत्येसाठी आर्थिक अडचणीसह अन्य सामाजिक, मानसिक घटकांचाही समावेश असून अडचण सोडवण्यासाठी योग्य उपाय शोधण्याची मानसिकता निर्मितीचे वातावरण नसल्याने न्यूनगंड निर्माण होतो.
          शेतकरी बांधवाच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत याची जाणीव अशा उपक्रमातून करणे शक्य असल्याचे मत यावेळी सहभागी विविध क्षेत्रातील तज्ञ, समाजसेवक यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील याप्रसंगी शासनाच्या खाते प्रमुखांना देण्यात आले.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, प्रकल्प संचालक नईम कुरेशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिक्षक रविशंकर चलवदे, आय.एम.ए चे डॉ. संजय कदम, अरविंद महाराज मोरे, भारतीय जैन संघटना, पतंजली योगपिठ, साईप्रसाद परिवार, भजनी मंडळ, महिला बचत गट यांचेसह सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000


जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी
728 लक्ष रुपयाचा प्रस्ताव
वैधानिक विकास मंडळाकडे सादर केला
नांदेड,दि. 29 :- जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम क्षेत्रांतर्गत असलेल्या 31 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका तसेच माविम अंतर्गत असलेल्या महिला बचत गटांसाठी
स्वयंरोगार यंत्र सामुग्रीसाठी  728 लक्ष रुपयाचा प्रस्ताव वैधानिक विकास महामंडळाकडे सादर केला. प्रस्ताव योग्य असल्याचे व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कराड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम क्षेत्रअंतर्गत असलेल्या एकूण 31 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत रुपये 410 लक्ष निधीचा प्रस्ताव तसेच माविम अंतर्गत असलेल्या महिला बचत गटांसाठी
बैल चलित बहुउद्देशीय शेती यंत्र शेतकरी स्वयंरोजगार किट यासाठी रुपये 159 लक्ष निधीचा प्रस्ताव, टेलरिंग युनिट गारमेंट सेंटर साठी रुपये 75 लक्षचा प्रस्ताव
हिमायतनगर येथील महिला बचत गटांसाठी खवा तयार करण्यासाठी ची यंत्र रुपये 6.15 लक्ष्यचा प्रस्ताव
मैदान कल्लूर ता देगलूर येथील पुदिना शेतीसाठी कूलिंग शीत वाहन व इतर अनुषंगिक साहित्य साठी रुपये 13.50 लक्षाचा प्रस्ताव
धर्माबाद तालुक्यातील महिला बचत गटांसाठी मसाला गृह उद्योगसाठी रुपये 14.22 लक्ष्याचा प्रस्ताव वैधानिक विकास महामंडळाकडे सादर केला.
या बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या सोयाबीनसाठी ग्रेडिंग मशीनचा 110 लक्ष्य रुपयाच्या प्रस्तावास निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल शासनाने घ्यावी, असे सांगून डॉ. कराड यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कर्करोग निदान विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेऊन या उपक्रमाचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गर्भवती मातांसाठी अंगणवाडी येथे सामूहिक दुपारचे जेवण व जेवण झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या लोहयुक्त औषधे गोळ्याचे सेवन याबाबत सविस्तर माहिती दिली. या उपक्रमाची विशेष दखल डॉ. कराड यांनी घेतली. या कामांबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशंसा डॉ कराड यांनी केली.
बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी श्री थोरात, श्री सुपेकर, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा कृषी अधीक्षक, उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
00000


विभागीय स्तरावरील लोकशाही दिन महिला लोकशाही दिनाचे
9 डिसेंबरला आयोजन
औरंगाबाद, दि. 27:- विभागीयस्तरावरील लोकशाही दिन विभागीय महिला लोकशाही दिनाचे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
तक्रार करण्यासाठीचे अर्ज दिनांक 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत विहित नमुना प्रप्रत्र-1() मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसिलदार) यांच्याकडे  स्विकारण्यात येणार आहे. विहित नमुना अर्जही  प्रप्रत्र-1() आवक शाखेत  उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच  विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त,महिला बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावे.
अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे पुन्हा सादर कराव्यात.तसेच ज्यांनी यापुर्वीच्याविभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही.
जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनांत तक्रारदाराचे समाधान झाले नाही असे सर्व प्रश्न  विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...