Friday, November 29, 2019


टिप :- सदरील लेख हा दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी जागतिक एड्स दिनी प्रसिध्द करावा.
विशेष लेख क्र . 2
एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा

1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो. या आजाराबाबत जनजागृतीचे प्रतिक म्हणून लाल रंगाची फित हे प्रतिनिधिक चिन्ह आहे. एचआयव्हीचा संसर्ग ही  जागतिक पातळीवरची समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून, असे लक्षात आले या आजारामुळे 3.5 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे योग्य वेळी एड्सची माहिती घेऊन हा आजार टाळू शकतो.
हा आजार 1980 च्या दशकात प्रथम माकडामध्ये आढळला. पुढे त्याची लागण पसरायला सुरूवात झाली. एच.आय.व्ही.ची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उदभवतो का? या सगळया प्रश्नांवर अनेक माध्यमांव्दारे प्रचार झाल्याने  नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. तरी सुध्दा आजही अंधश्रध्दा आणि गैरसमजुतींना समाजातून काही लोक खतपाणी घालत आहे. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.
डब्ल्यु.एच. आणि यू.नी. एडस यांनी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात येते की,भारतात या आजाराचा प्रसार 2005 सालापासून होताना दिसतो. तेव्हा आजाराचे प्रमाण 55 लाख होते. त्या तुलनेत 2007 साली 25 लाख होती म्हणजे 50 टक्के घट झाल्याचे आढळून आले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात भारतात जनजागृती झाल्यामुळे हे प्रमाण घटण्यास सुरूवात झाली. 2011 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात या रोगाबाबत योग्य जागरूकता निर्माण झाल्यामुळे 50 टक्के प्रमाण घटल्याचे दिसते.  2017 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात महाराष्टात प्रमाण अधिक आहे. यात 3.30 लाख इतके रूग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश 2.70 लाख, कर्नाटक 2.47 लाख, तेलंगाना 2.04 लाख, वेस्ट बंगाल 1.44 लाख, तमिळनाडू 1.42 लाख, उत्तरप्रदेश 1.34 लाख रूग्ण आहेत. येणा-या काळात एड्समुक्त भारत करण्याचे प्रयत्न केले जात आहे.  त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असणे आवश्यक आहे.
एड्स आजाराचे टप्पे 
मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणा-या आजार लक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्स म्हणजे अॅक्वायर्ड- संपादित केलेला, इम्यूनो- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, डेफिशियन्सी कमतरता, सिंड्रोम लक्षण समूह होय. एच. आय. व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर आजाराची लक्षणे दिसायला सुरूवात होते.  त्याचा परिणाम काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी 3 महिने ते १५ वर्षेपर्यंत असू शकतो. ते व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतो.

एड्स झाल्याचे केव्हा समजते?
एच.आय.व्ही.चा विषाणू शरीरात रोगप्रतिकारक संस्थेच्या पेशीवर हल्ला करून त्या नष्ट करण्यास सुरूवात करतो. नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी वेगाने निर्माण होत नाही. या पेशींच्या कमतरतेमुळे बाधित व्यक्ती क्षयरोग, कँडिडियासीस, नागीण आदी विविध संक्रमणांमुळे होणा-या  आजाराचे बळी पडू शकतात. एच.आय.व्ही. संक्रमणाची अंतिम टप्प्याची म्हणजेच एड्सची सुरुवात येथून होते. तोपर्यंत बाधित व्यक्ती तिस-या अवस्थेपर्यंत पोहोचतो. 

ही आहेत लक्षणे
बाधित व्यक्तीचे वजन कमी होण्यास सुरूवात होते. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत जुलाब होतात. एक महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला येतो. अंगावरील त्वचेवर वारंवार खाज येते. बाधित व्यक्तीच्या तोंडात व घशात फोड येतात. लसिका ग्रंथींची सूज जास्त काळ राहते  ही प्रमुख लक्षणे ज्या व्यक्तीत दिसतात ती एड्सग्रस्त व्यक्ती समजावी.

असा टाळता येतो धोका
एड्स सहज टाळता येऊ शकतो. यासाठी आवश्यक काळजी घेतल्याने एड्स टाळणे प्रत्येकाला शक्य आहे. रक्त घेण्याची वेळ आली तर एच.आय.व्ही. मुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरीज आणि सुईचा वापर करावा. गुप्तरोग झाला असल्यास डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा. पालकांकडून बाळाकडे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करावी. दाढी- कटिंग करताना न्हाव्यालासुद्धा नवीन ब्लेड वापरण्याचा आग्रह करावा. एड्सग्रस्ताचे नेलकटर व ब्लेड वापरू नये, कारण यामुळे एड्स होण्याची शक्यता असते.
योग्य उपचाराला प्राधान्य दयावे
बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती देऊन योग्य त्या उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. एड्स लपवणे म्हणजे या आजाराची दुस-याला बाधा करणे.
सरकारी दवाखाने, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी एड्सबाबत समुपदेशन केंद्रे आहेत. तिथे जाऊन आजाराची माहिती घ्यावी. कारण एड्सची माहितीच एड्सपासून बचाव करू शकते. औषध म्हणजे एड्सची पूर्ण माहिती जाणून घेणे. .आर.टी. उपचार केंद्रात रुग्णांनी जाऊन जीवनमान सुधारावे. एच.आय.व्ही. एड्ससंबंधी गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लोकांना अचूक व संपूर्ण माहिती व प्रबोधनावर अधिक भर द्यावा.

-प्रतीक्षा परिचारक, संहिता लेखक,
विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद 



No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...