Friday, April 11, 2025

 वृत्त क्रमांक  377

फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या

शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक   

नांदेड दि. 11 एप्रिल :- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतु फळपिकांची ई-पीक पहाणी डीजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ऑपद्वारे केली नाही त्यांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत ई-पिक पाहणी पुर्ण करावी. अन्यथा 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णय मधील तरतुदी नुसार 7/12 उताऱ्यावर ई-पिक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीमार्फत मृग बहार सन 2024 मध्ये मोसंबी, चिकू, पेरु, सिताफळ व लिंबू या 5 फळपिकांसाठी तर आंबिया बहार सन 2024-25 मध्ये संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व पपई या 5 फळपिकांसाठी नांदेड जिल्ह्यात फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी  12 जून 2024 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0000

 वृत्त क्रमांक  376

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत

क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले जयंती उत्साहात साजरी  

नांदेड दि. 11 एप्रिल :- भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहमध्ये क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांची जयंती येथील सामाजिक न्याय विभागाच्या सांस्कृतिक  सभागृहात आज उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रामाचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची उपस्थिती होती.   

जिल्हा समाज कल्याण अधिकारी अऊलवार यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त मार्गदर्शन करुन उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त महामानवांना अभिवादन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन जयंती साजरी  करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होत. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जीवन चरित्रावर समाज भुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांनी प्रकाश टाकला व उपस्थितांना सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुजाता पोहरे, कैलास मोरे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पंडीत, कार्यालय अधीक्षक डी. वाय. पतंगे, सहाय्यक लेखाधिकारी उपस्थित होते. संविधानाचे सामुहिक वाचन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पापंटवार यांनी केले तर आभार श्रीमती अंजली नरवाडे यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

00000



विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभाग

विभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन

500 वर बचत गटातील ६ हजार महिला सहभागी

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची संपूर्ण यंत्रणेचा सक्रीय सहभाग

छत्रपती संभाजीनगर दि.11: "साहेब आमच्या प्रभाग संघासाठी कार्यालयाला जागा पाहिजे, साहेब बचत गटातून कर्ज मिळाल आणि आम्ही आमच्या व्यवसायात यशस्वी झालो, साहेब बचत गटाचे पहिले कर्ज मिळाले दुसऱ्या कर्जाच सांगा, बचत गटाला बाजारपेठ मिळवून द्या, बचत गटासोबत वैयक्तिक लाभांच्या योजना राबवा," अशा अनेक विषयांवर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थी महिलांनी ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला.  विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत तत्परतेने यावर मार्ग काढून अडचणी सोडवू असे सांगतांना संबंधित यंत्रणांनी महिलांनी मांडलेल्या अडचणी तातडीने सोडवाव्यात असे निर्देश यावेळी दिले.  

मराठवाडा विभागातील आठही  जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा ‘संवाद मराठवाडयाशी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ आज दुपारी 4 वाजता झाला. 

यावेळी सहआयुक्त सुरेश बेदमुथा, डॉ.अनंत गव्हाणे, एनआयसीचे अनिल थोरात, यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते. 


लातूर जिल्ह्यातील वाडवाळ ता.चाकूर येथील आदर्श प्रभाग संघाच्या सुनिता भाऊसाहेब श्रीनाथे यांनी आपल्या प्रभाग संघाला कार्यालयासाठी जागा द्यावी, तसेच बिनव्याजी कर्ज द्यावे, सोबतच लखपती दिदी मुद्रा लोन याबाबत मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी संबंधित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांना तत्परतेने कार्यवाही करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले. 

बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथील महिला बचत गटाच्या महिला संवादात सहभागी झाल्या. आमच्या बचत गटाला बाजारपेठेबाबत मदत करा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या सरस्वती गवळी यांनी आपल्या उत्पादनाच्या बाजारपेठेची अडचण बोलून दाखवली. यावर विभागीय आयुक्त यांनी बचत गटाने निर्मित केलेले उत्पादनाबाबत संबंधित यंत्रणेने इतर जिल्ह्यांनाही याबाबत माहिती पाठवून मागणी घेता येईल तसेच राज्यातील ज्या उत्पादनाची मागणी आहे ते उत्पादन पाठविता येईल, तसेच बाजारपेठेची मागणी लक्षात घेत बचत गटानेही उत्पादन करावे असे आवाहन केले. 

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील शाम बाला भोसले यांनी गावात 75 गट आहेत, सीआरपी पदभरती करावी अशी मागणी केली. यावर 15 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. 

बीड जिल्ह्यातील ईट या गावातून शेतकरी गटाच्या मंगल रामप्रसाद डोईफोडे या आपल्या शेतीत काम करताना चर्चेत सहभागी झाल्या. 

नांदेड जिल्ह्यातील माहूर येथून सपना पेडवाल यांनी चर्चेत सहभाग घेतला. आपल्या बचत गटाच्या अडचणींही त्यांनी मांडल्या. माहूर तालुक्यातील वाई प्रभाग येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गावात यंदा 45 लाख रुपये आले आहेत, गटातून गावात आर्थिक प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांचे कौतुक केले. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आदर्श प्रभाग संघाच्या अंजली पवार यांनीही महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्याची भावना बोलून दाखवली. गंगापूर तालुक्यातील सरला काकडे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. 

जालना जिल्ह्यातील अकोला देव ता.जाफ्राबाद येथील श्रीमती सवडे यांनी बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी मॉल आवश्यक असून या मॉलसाठी जागा पाहिजे अशी मागणी केली. हिंगोली जिल्ह्यातून दयानंद ढोबळे, तरडगव्हण, ता.शिरूर कासार जि.बीड येथून भाग्यश्री भोसले, जालना जिल्ह्यातील रेवगाव येथून गितांजली महिला प्रभाग संघाच्या योगिता गोरडे, परभणी जिल्ह्यातील शिवनेरी प्रभाग संघ ताड बोरगाव, धाराशिव प्रभाग संघ, यासह अनेक महिलांनी चर्चेत सहभाग घेतला. महिलांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने समजून घेत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांच्या अडचणींबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जिल्हा पातळीवरून या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी या अडचणींबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

***








 वृत्त क्रमांक  375

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा

* रविवार व सोमवारी येलो अलर्ट जारी  

नांदेड दि. 11 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 13 व 14 एप्रिल हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईप लाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 374

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान 

नांदेड दि. 11 एप्रिल :- जिल्ह्यात सोमवार 14 एप्रिल रोजी आंबेडकरी अनुयायी यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. येत्या 14 एप्रिल रोजी तसेच त्यानंतर 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते.  त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्ह्यात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केला आहे. 

12 एप्रिल 2025 चे 00:01 वाजता पासून ते 30 एप्रिल 2025 चे 24 वाजतापर्यत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "अ" ते "ई" प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.   

रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्यारितीने चालावे कोणत्यारितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्याप्रसंगी व पुजेअर्चेनेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेनेच्यावेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत. 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्या पुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शन पर आदेश देण्याबाबत. सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबधी. कोणीही सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. सदर जाहिरसभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत. 

हा आदेश लग्नाच्यावरातीस, प्रेतयात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. सदरचा आदेश 12 एप्रिल 2025 चे 00:01 वाजेपासून ते 30 एप्रिल 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत लागू राहील, असेही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आदेश स्पष्ट केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक  373

जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी

जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार

1 हजार 207 कोटींची गुंतवणूक तर 4 हजार 32 रोजगार निर्मिती                                                                        

नांदेड दि. 11 एप्रिल :- जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातक्षम उद्योग तयार करुन जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यात करावी. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेवून उद्योग उभारावेत, जेणेकरुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

आज जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने तुलसी कम्फर्ट येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद -२०२५ संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप दमय्यावार, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर औटी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे, अग्रणी बँक व्यवस्थापक आलोकनाथ शर्मा, निर्यात सल्लागार आकाश ढगे, उद्योजक संघटनेचे शैलेष कराळे तसेच विविध शासकीय विभाग, बँकाचे प्रतिनिधी, उद्योजक, निर्यातदार, व्यापारी आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

या गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करारासोबत उद्योग क्षेत्राशी निगडित विविध विषयावर जसे निर्यात क्षेत्रातील विविध संधी, पणन, शासनाच्या विविध योजनांबाबत तज्ञांकडून मागदर्शन करण्यात आले.                                                 

गुंतवणूक परिषदेत झालेले प्रमुख सामंजस्य करार याप्रमाणे आहेत.

एम.व्ही.के.ॲग्रो फुट प्रोडक्ट लि., रिलायन्स इंडस्ट्रिज लि., नांदेड बायो फ्युल प्रा.ली., निसर्ग जॅगरी मिल्स प्रा.ली., श्री. सुभाष शुगर प्रा.ली., गोदावरी इंजिनियरींग सोल्युशन, गोदावरी इंजिनियरिंग सोल्युशन, गोदावरी ड्रग्स लि. , माधव रिजंन्सी, एस. आर.व्ही.एनर्जी प्रा.ली., एकदंत सोया प्रा. ली. 

या गुंतवणूक परिषदेचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, यांनी तर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राशी संबंधीत विविध बाबींचा उहापोह श्री. इंगळे यांनी केला. ही गुंतवणूक परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण , अनिल कदम तसेच सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

0000








वृत्त क्रमांक 372   

विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ 

लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद ; प्रभाग व ग्रामसंघाला जागा उपलब्ध करणार 

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

नांदेड दि. 11 एप्रिल :- मराठवाडा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभार्थी महिला, स्वयंसहायता गट, ग्रामसंघ आणि स्थानिक नागरिकांशी ऑनलाईन थेट संवाद साधला. या संवाद मराठवाड्याशी उपक्रमात मराठवाड्यातील महिलांनी भरभरुन प्रतिसाद दिला व आपल्या शंका व अडचणी विभागीय आयुक्तासमोर नि:संकोचपणे मांडल्या. 

दुपारी 4 ते 6 या वेळेत पार पडलेल्या या संवादात विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, उपायुक्त सुरेश बेदमुथा तसेच मराठवाड्यातून सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, तहसिलदार आदीं उपस्थित होते. तर नांदेड येथून निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, डिआरडीएचे गजानन पातावार, एनआयसीचे प्रदीप डुमणे इ. संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

लाभार्थ्यांनी विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, निधी वितरण, प्रशिक्षण आणि कार्यान्वयानातील अडचणी, तसेच प्रभागसंघ व ग्रामसंघ कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन मिळावी, अशी मागणी अनेक बचतगटामार्फत करण्यात आली. या संवाद माध्यमातून महिलांच्यावतीने मांडलेला प्रत्येक मुद्द्या विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी ऐकूण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या सर्व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे विषय सोडविण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांची नियुक्ती करण्याबाबत सूचना दिल्या. 

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आज मराठवाड्यातील जवळपास 6 हजार महिला जोडल्या गेल्या होत्या. ज्या लोकांना जिल्हा पातळीवर न्याय मिळत नाही. त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागात महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, बचतगटांचे संघटन, व उद्यमशीलतेला चालना देणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगत, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बचत गटाच्या महिलांनी ज्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे, असे उत्पादन तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन या संवादाच्या माध्यमातून केले. 

नांदेड जिल्हृयातील माहूर तालुक्यातील दोन बचतगटाच्या महिलांनी या उपक्रमात संवाद साधला. माहूर तालुक्यातील एका बचतगटाने ग्रामसंघाचे कर्ज प्रस्ताव नामंजूर असल्याची समस्या मांडली तर माहूर तालुक्यातील लखमापूरच्या बचतगटाच्या अध्यक्ष महिलेने प्रभाग व ग्रामसंघाला कार्यालय मिळावे अशी मागणी केली. मराठवाड्यातील सर्व महिलांनी आज सुरु झालेल्या ‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमाचे स्वागत करत, अशा संवादामुळे थेट प्रशासनाशी जोडले जात असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या विषयावर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असून, पुढील आठवड्यात नवीन विषयावर संवाद साधला जाणार आहे. 

00000




 वृत्त क्रमांक  371

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती

प्रा. राम शिंदे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 11 एप्रिल :- महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे हे रविवार 13 एप्रिल 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वा. शिर्डी विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 12 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरूद्वारा नांदेड येथे आगमन व तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरूद्वारा दर्शनासाठी राखीव. दुपारी 12.30 वा. तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरूद्वारा नांदेड येथून शासकीय वाहनाने कौठा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.45 एकनाथ धमणे यांचे निवासस्थानी राखीव. दुपारी 1 वा. शासकीय वाहनाने मातोश्री मंगल कार्यालय कौठा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. मातोश्री मंगल कार्यालय कौठा नांदेड येथे आगमन व सभापती पदी निवड झाल्याबद्दल धनगर समाज व नांदेड जिल्हा महायुतीच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. शासकीय वाहनाने विष्णुपूरी नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.40 वा. विष्णुपुरी नांदेड येथे आगमन व सहयोग शैक्षणिक संकुलास भेट. दुपारी 3.15 वा. शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 4.30 वा. विमानतळ नांदेड येथून खाजगी विमानाने पुणे विमानतळकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक  370

गीग व प्लॅटफॉर्म वर्कर यांनी

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 11 एप्रिल :- केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विशेष राष्ट्रीय ई-श्रम पोर्टलवर नोंदणी अभियान 7 ते 17 एप्रिलपर्यत राबविण्यात येत आहे. तरी गीग व प्लॅटफॉर्म वर्करसनी 17 एप्रिलपर्यत या नोंदणी शिबिरात सहभाग घेवून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी किंवा  https://register.esharm.gov.in/#/user/platform worker-registration या संकेतस्थळावर स्वयं नोंदणी करावी, असे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

 या नोंदणी अभियानात गीग व प्लॅटफॉर्म वर्करची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येत आहे. या नोंदीवरुन त्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात येणार आहे. ज्याद्वारे त्यांचे 5 लाखांची प्रत्येक कुटूंबासाठी वार्षिक आरोग्य विमा कवच 31 हजार रुग्णालयामार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती बिडी कामगार कल्याण निधी दवाखाना नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 369

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा 15 एप्रिल रोजी शुभारंभ

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते मंगळवारी जलपुजन कार्यक्रम

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

                                                                                                                                                                      नांदेड, दि. 11 एप्रिल :-पाणी व्यवस्थापनाची माहिती लोकांना व्हावी तसेच जलव्यवस्थापनाची मोठया प्रमाणात जनजागृती व्हावी यादृष्टीने राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ 15 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जलपुजनाने होणार आहे. 

आज राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दृरदृश्यप्रणालीद्वारे पूर्व जलव्यवस्थापन कृती पंधरवडा पूर्व तयारी आढावा घेतला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अति. मुख्य सचिव दिपक कपूर यांची उपस्थिती होती. तर बैठकीस राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, सर्व मुख्य अभियंता, सर्व अधिक्षक अभियंता, सर्व कार्यकारी अभियंता तसेच या विषयाशी संबंधित मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी आदीची उपस्थिती होती. 

यावेळी जल व्यवस्थापन पंधरवड्यात करण्यात येणाऱ्या कामकाजाचा पूर्व आढावा घेण्यात आला.  या  जल व्यवस्थापन पंधरवड्यात 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील कालव्यासाठी संपादित केलेल्या जागेवर सर्विस रोड व निरीक्षण रोडवर शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे संबंधित गावामध्ये रस्त्याने जाण्यासाठी वाद निर्माण होतात. या अतिक्रमण नरेगामार्फत काढून संपादित क्षेत्राच्या सिमावरती वृक्ष लागवड करणे योग्य राहील अशी सूचना जलसंपदा मंत्री महोदयाकडे मांडली. 

यात 15 एप्रिल रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उदघाटन. 16 एप्रिल रोजी जलसंपदा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 17 एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, 18 एप्रिल रोजी शेतकरी व पाणी वापर संवाद, 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, 21 एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीचे निरसन करणे, 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेवून कार्यवाही करणे, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषि विभागामार्फत संयुक्तपणे पीक पध्दतीबाबत उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक, कार्यशाळेचे आयोजन. 24 एप्रिल रोजी सिंचन-ई-प्रणाली, पाणी दर, पाणी पट्टी आकारणी व वसुली थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, 25 एप्रिल रोजी विद्यापीठ केव्हीके, सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम, 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुर्नवापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी येत असल्याबद्दल प्रकरणाचा शोध घेणे, 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे, अतिक्रमण निष्कासन 31 मे पूर्वी करणे, 29 एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण, चर्चासत्र व कार्यशाळा, 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा, या पंधरवडा कालावधीत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्याचे सत्कार व पंधरवडा समारोप असे कार्यक्रम होणार आहेत. 

0000






 


जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार - सभापती प्रा. राम शिंदे

 जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे  स्मारक उभारणार - सभापती प्रा. राम शिंदे   वंचित, उपेक्षित घटकांसाठी काम करण्यावर भर देण्याची ग्वाही  नां...