Tuesday, January 28, 2025

वृत्त क्रमांक  120 

महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

नांदेड, दि. 28 जानेवारी : महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2024 ही रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील 48 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत एका सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.  

या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडीओ, लॅपटॉप, तत्सम वस्तू वापरण्यास व बाळगण्यास, तसेच सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक  119 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली

गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक  

नांदेड, दि. 28 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवार 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अभिजित राऊत जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नांदेड यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्रमांक  118 

सोमवारी लोकशाही दिन  

नांदेड दि. 28 जानेवारी : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन भवन येथे सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्यामार्फत आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 पूर्वी आपल्या तक्रारी, निवेदने, जमा करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यावेळेस 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेपासून तक्रार करणाऱ्यांनी आपले निवेदन सादर करायचे आहे. त्यानंतर लगेचच तक्रार निवारणाचे काम सुरू होईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

 


 वृत्त क्रमांक  117

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा दौरा 

नांदेड दि.२८ : राज्यपाल सी.पी राधाकृष्णन उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नांदेड येथे येत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभासाठी ते नांदेडला उद्या येणार आहेत.

सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. सकाळी 10:55 ला ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पोहोचतील.

सकाळी 11 ते दुपारी बारापर्यंत दीक्षांत समारंभ सोहळ्यामध्ये ते सहभागी होतील. दुपारी दीडच्या सुमारास नांदेड येथून ते मुंबईकडे प्रयाण करतील.

000000

वृत्त क्रमांक  116

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा - राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

फ्लिपकार्ड, पेटीएम, झोमॅटो, स्वीगी, ओयो, ओला, नायका स्टार्टअपचे आदर्श उदाहरण

नांदेड दि. २८ जानेवारी : बेरोजगार युवकांना स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे दिली.

श्री गुरु गोविदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोर्डीकर नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. 

या कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ.मनोहर चासकर,माजी मुख्यमंत्री तथा  खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे , आमदार आनंदराव बोंडारकर, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.मनेश कोकरे, बाबा बलविंदर सिंग,बाबा सुखविंदर सिंह , सतीश लुसणावथ ,विनील चंद्र रांगा यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी मंत्री महोदयांनी आदर्श स्टार्टअप म्हणून  फ्लिपकार्ड ,paytm,झोमॅटो,स्वीगी,ओयो,ओला,नायका या सारख्या स्टार्टअपचे उदाहरणे देऊन युवकांना प्रेरीत केले. त्यापुढे म्हणाल्या,

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टिम म्हणून उदयास आला आहे. देश एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी सज्ज होत आहे. भारतामध्ये सध्या 1.25 लाखांहून अधिक स्टार्टअप आणि 110 युनिकॉर्न स्टार्टअप आहेत. ज्यांची वॅल्यूएशन रु 8,000 कोटीपेक्षा जास्त आहे. 

भारतीय स्टार्टअप्स नवनवीन उद्योगधंद्यानमध्ये क्रांती घडवत आहेत.आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनत आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून युवा पिढीच्या विचारात परिवर्तन घडत आहे; नोकरी शोधणारे बनण्याऐवजी आता युवक नोकरी देणारा होण्यास उत्सुक आहेत. 

भारत सरकारकडून नॅशनल क्वांटम मिशन, इंडिया एआय मिशन आणि सेमीकंडक्टर मिशन सारख्या उपक्रमांनी तरुणांसाठी संधींची दारे खुली केली आहेत.आपल्या राज्यातसुद्धा स्टार्टअप इकोसिस्टम केवळ मेट्रो शहरांपुरती मर्यादित नाही, ती आता सामाजिक संस्कृती बनत आहे. आर्टिफीसियल इंटेलिजन्समुळे देशामध्ये खूप मोठाप्रमाणात स्टार्टअपच्या संधी निर्माण होत आहेत. जागतिक गुंतवणूकदार भारतामध्ये येण्यासाठी उस्तुक आहेत. 

आपल्याला जर महाराष्ट्राची इकॉनोमी एक ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त करायची असेल तर सर्वात मुख्य सहभाग राहणार आहे तो म्हणजे स्टार्टअपकडून.त्याकरिता गरज आहे ती योग्य प्रशिक्षण आणि लागणाऱ्या पायाभूत सुविधांची. महाराष्ट्रातील छोट्या शहरातील होतकरू नव उदयोजकांना स्टार्टअप संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे स्टार्टअला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात असलेल्या विविध योजनांचे फायदे मराठी उद्योजकांपर्यंत पोहचत नाहीत.मराठवाड्यात बेजारीजागारीचे प्रमाण जास्त आहे. इथल्या युवकांमध्ये स्वतःचा व्यवसाय उभारायचे गुण आहेत पण त्यांना स्टार्ट अप सुरु करण्यासाठी नेमके प्रशिक्षण नाही. त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना स्टार्ट अप करण्यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी  विश्वजित देशमुख व डॉ.सुजित देशमुख यांनी  हा उपक्रम सुरु केलाय.

या मिशन द्वारे  मराठवाड्यातील युवकांना स्टार्ट अप सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. स्टार्ट अप सुरु करण्यासाठी शासन कसे मदत करणार याबाबतही युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुध्दा युवकांच्या स्टार्ट अप साठी भूमिका खूप अग्रेसर आहेत, असेही त्यांनी युवकांना संबोधित करताना स्पष्ट केले.

00000






वृत्त क्रमांक  115

२७ व्या दीक्षान्त समारंभासाठी ‘स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ सज्ज

आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत गुणवंतांचे पदवीदान

नांदेड दि. २८ जानेवारी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ दीक्षान्त समारंभ २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. 

नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. भूषण पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदचे सर्व सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.

याप्रसंगी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास नांदेड चान्सलर सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी हा बहुमान परभणी येथील बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु. श्रद्धा हरहरे यांना मिळणार आहे.. श्रध्दा हरहरे यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही ५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. 

सत्ताविसाव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील एकूण २१०५५ विद्यार्थ्यांना यावर्षी पदवी, पदविका  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये १८० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र दीक्षान्त समारंभाच्या दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

हा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक समिती आप-आपली कार्य पूर्ण करीत परिश्रम घेत आहेत.

000000



 वृत्त क्रमांक  114

संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' 

 ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापासून वंचित 

नांदेड दि. २८ : वारंवार सूचना व माहिती देऊन ही नांदेड शहरातील जवळपास २ हजार लाभार्थी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकले नाही. त्यामुळे पुढील सात दिवसात ही कारवाई न केल्यास या महिन्याचे पैसे  खात्यामध्ये जमा होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.    

 यासंदर्भात तहसील कार्यालयाने निवेदन स्पष्ट केले असून आधार कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार शिबिरे  घेण्यात आली.मात्र तरीही अनेक जण आधार कार्डला आपले बँक खाते जोडू शकलेले नाहीत. योजनेतील पारदर्शीतेसाठी व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आधार कार्ड सोबत बँकेचे खाते जोडले जाणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे दोन हजारावर लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतील विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी जसे की गांधी निराधार,विधवा,अपंग, दुर्धर योजना,श्रावणबाळ,इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना येतात. 65 वर्षाखालील निराधार लोकांना या योजनेतील लाभ प्रामुख्याने भेटतो.  महाराष्‍ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍तीवेतन योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्‍यांना बॅंक/पोस्‍ट खाते आधार क्रमांकाशी संलग्‍न केल्‍यानंतरच अर्थसाहाय्याचे वाटप करण्‍याबाबत शासन पत्रानुसार कळविण्‍यात आले आहे. 

शिबीर घेतले तरी दुर्लक्ष 

तहसिल या कार्यालयाने यापूर्वी अनेक वेळा आधार बॅंक खात्याशी सलंग्‍न करण्‍यासाठी कार्यालयात कॅम्‍प आयोजित केला होता. जाहीर आवाहन महानगरपालिका यांचे 6 क्षेत्रिय कार्यालय तसेच वृत्‍तपत्राद्वारे व या कार्यालयाचे तलाठ्यांचे कार्यालय येथे प्रसिध्‍द केलेले होते. मात्र तरीही प्रतिसाद नाही.

सात दिवसाची मुदत 

मात्र तरीही शिल्‍लक लाभार्थ्‍यानी अदयाप पर्यंत त्‍यांनी आपले खाते आधारशी संलग्‍न करून घेतले नसून कार्यालयात संबंधीत कागदपत्रे देखील जमा केलेली नाहीत .सबब पुढील सात दिवसाच्‍या आत आपले बॅंक/पोस्‍ट खाते आधारशी संलग्‍न करून घेण्‍यात यावे. तसे न केल्‍यास आपले अनुदान वितरीत करता येणार नाही याची नोंद घ्‍यावी. याची सर्वस्‍वी जबाबदारी लाभार्थ्यची राहील. 

कागदपत्रेही जमा करावी 

यादीत नमुद लाभार्थ्‍यांनी आपले बॅंक खात्‍याची पहिल्‍या पानाची पासबुकची झेरॉक्‍स, अदयावत आधार कार्डची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र, दुर्धर आजार असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नांदेड शहर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे जाहीर प्रगटनाच्‍या प्रसिध्‍दी पासून सात दिवसाच्‍या आत कार्यालयीन वेळेत जमा करावे. जे लाभार्थी विहित मुदतीमध्ये आपले वरील प्रमाणे कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांचा लाभ त्यांच्या खात्यावर जमा करता येणार नाही. यास लाभार्थी स्‍वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्‍यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 नागरिकांनी सहकार्य करावे 

संजय गांधी व तत्सम योजनेतील लाभार्थी ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत  असणाऱ्या अत्यल्प आर्थिक गटातील बहुतेक निराधार असतात. यामध्ये प्रामुख्याने निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादी लाभार्थ्यांचा सहभाग असतो त्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांनी त्यांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार संजय वरकड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  113 

गतिशील व दायित्वपूर्ण प्रशासनाचे

100 दिवसांचे नियोजन पूर्ण करा : मेघना बोर्डीकर

 

राज्यमंत्र्यांनी घेतला विविध विभागाचा आढावा

 

नांदेड दि. 28 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील व दायित्व पूर्ण अंमलबजावणी कराअसे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे केले.

 

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणपाणी पुरवठा आणि स्वच्छताऊर्जामहिला आणि बालकल्याणसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा नांदेड येथील आजचा प्रथम दौरा होता. त्यांनी नियोजन भवन येथे आज विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार अजित गोपछडेजिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमहानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी अधीक्षक अभियंता महावितरणमहापारेषणकार्यकारी अभियंता जलजीवन मिशनपाणीपुरवठा विभागनांदेड कार्यकारी अभियंतामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेडउपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारीजिल्हा परिषद. जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता महावितरण व महापारेषणवरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि यंत्रणा जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ आदी विभागांचा त्यांनी आढावा घेतला. खासदार अजित गोपछडे यांनीही यावेळी अनेक योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उत्तम प्रशासनाचे 100 दिवस हा संकल्प पुढे ठेवण्यात आला आहे. 7 कलमी कार्यक्रम त्यासाठी दिला गेला आहे. या शंभर दिवसांमध्ये प्रशासनामध्ये झालेला बदल दर्शनी दिसला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजेसर्व वेबसाईट अपडेट असाव्यातकार्यालयाची स्वच्छता व प्राथमिक सुविधा परिपूर्ण असल्या पाहिजे. पारदर्शी व उद्दिष्टपूर्ण कार्यप्रणाली आत्मसात केली पाहिजे,अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्या.

 

विविध विभागाच्या सादरीकरण संदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले. तथापिकागदावरचा विकास प्रत्यक्षात उतरण्यासाठी 100 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नियोजन करण्याचे त्यांनी आदेश दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण  मिसाळ यांनी केले.

00000










    वृत्त क्रमांक 128 माजी सैनिकांची ऑनलाईन नोंदणी आता अनिवार्य नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्व...