Monday, June 15, 2026

 वृत्त क्रमांक

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

नांदेड, दि. १५ जून : महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने जिल्हाभरातील विविध शाळांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जिल्हा परिषद हायस्कूल, विष्णुपुरी येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान आरोग्यदूत म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बॅच व आरोग्यदूत पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड, विभागीय समन्वयक, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरीच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.

दरम्यान, विभागाचे शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी (म.), ता. अर्धापूर येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास तालुका गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले, शिक्षण विस्तार अधिकारी निजाम शेख, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत आत्मीयता निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात झाली.

०००००


















वृत्त क्रमांक

विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक 

मरळक येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

नांदेड दि. 15 जून :- शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे प्रभावी साधन असून,  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात जिल्हा परिषद शाळांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय लावून ज्ञानाचा विस्तार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

आज १५ जून २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुल, मरळक बु. येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. यावेळी त्यांनी शालेय वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करुन, जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. जि. प. हा. मरळक बु. या शाळेस भेट देताना आपल्या शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्याचे सांगून, आपले प्राथमिक शिक्षणही जिल्हा परिषद शाळेतच झाल्याचा उल्लेख केला.

संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असून, शाळेस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी भेट देत आहेत. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांच्या आयुष्यातील शाळेतील पहिल्या पावलाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळांमधूनच खरे शिक्षण मिळते आणि जीवनाला योग्य आकार मिळतो, असे प्रतिपादनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाची सवय लावावी, यासाठी शाळेतील वाचनालयातील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवावीत, अशी सूचना त्यांनी केली.                                        

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या आधारावर यश संपादन करावे - जिल्हाधिकारी

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या आधारावर यश संपादन करावे, असे आवाहन करताना शाळेच्या दहावीच्या परीक्षेचा ९५ टक्के निकाल लागल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमिक शिक्षकांची कमतरता असतानाही प्राथमिक शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी मरळक येथील इयत्ता 10 वीची कु. अंजली शंकर नरवाडे ही मुलगी शाळेतून पहिली आली असून तिला 92 टक्के गुण मिळाले आहेत. आज जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी तिचा सत्कार केला. यावेळी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या, या पार्श्वभूमीवर कु.अंजली नरवाडे या मुलीचे आईवडील मजूरीचे काम करतात. आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अंजलीने मिळवलेले गुण हे नक्कीच इतर विदयार्थ्यांसाठी प्रेरणादाई असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शाळेतील भौतिक सुविधांची आवश्यकता पूर्ण करण्याचे आश्वासन देताना खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे गणवेश, पाठ्यपुस्तके व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी नवप्रवेशित विदयार्थ्यांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून वाजतगाजत शाळेपर्यंत मिरवणूक काढली.

हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.

00000








 वृत्त क्रमांक

औषध विक्रेत्यांनी नियमाचे पालन करुन औषध विक्री करावी -अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमान्वये मे. तोष्णीवाल मेडिकल्सवर कारवाई

नांदेड दि. 15 जून:- आज नांदेड शहरातील मे. तोष्णीवाल मेडिकल्स, डॉक्टर्स लेन, नांदेड या पेढीकडून मुदतबाहय औषधाची डॉक्टराच्या चिठठीशिवाय, फार्मासिस्टचे गैरहजेरीमध्ये, विना बिलांने विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरील पेढीविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.  

औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठठीशिवाय फार्मासिस्टचे गैरहजेरीमध्ये विना बिलाने औषधाची विक्री  करू नये. डॉक्टराच्या चिठठीवरील औषधी विक्री करतेवेळी विक्री करण्यात येत असलेल्या औषधाचा तपशील  व  औषधावर नमूद  तपशील यामध्ये तफावत आढळून येणार नाही याची त्यांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी.  मुदतबाहय औषधांचे सेवनामुळे रूग्णांचे आरोग्यावर त्याचे  विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मुदतबाहय औषधी विक्री होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आवाहन सर्व औषधी विक्रेत्यांना करण्यात आले आहे.

सर्व औषध विक्रेत्यांनी सतर्क राहून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 चे पालन करूनच औषधांची  विक्री करावी.  कायद्याचे उल्लघंन झाल्यास किंवा त्यांचेविरूध्द या प्रशासनास तक्रारी प्राप्त झाल्यास  व सत्यता पडताळणीमध्ये दोषी आढळून आल्यास त्यांचेविरूध्द कडक कारवाई घेण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी. 

नागरिकांनी अशा प्रकारची औषधी विक्री होत असल्याचे आढळून आल्यास, त्यांनी तात्काळ प्रशासनाकडे संपर्क साधावा जेणेकरून संबंधित पेढयाविरूध्द कारवाई करता येईल, असे सहाय्यक आयुक्त औषधे अ.तु.राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 वृत्त  

नवीन कामगार नियमावलींच्या मसुद्यावर नागरिकांनी

हरकती व सूचना नोंदवाव्यात

मुंबई, दि. 15: कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केला असून तो https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यांबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी; तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कामगार व्यवस्थेला अधिक पादरर्शक, सुसंगत आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी केंद्र शासनाने 21 नोव्हेंबर 2025 पासून चार महत्वपूर्ण कामगार संहितांची अंमलबजावणी संपूर्ण भारतात सुरू केली आहे. यामध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहीता 2020 तसेच व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा व कामाची स्थिती संहिता 2020 यांचा समावेश आहे. या सर्व संहितांमध्ये विद्यमान 29 कायदे एकत्र अरण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या कामगार संहिता नियमांचा मसुदा https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. संबंधित सूचना अथवा हरकती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत कामगार आयुक्त कार्यालय, कामागर भवन, बांद्रा कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051 या पत्त्यावर पाठवाव्यात; तसेच mh-labourcodes@gmail.com  या ईमेलवरही सूचना, हरकती स्वीकारल्या जाणार आहेत, असे मुंबई शहरचे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

 वृत्त क्रमांक

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू 

नांदेड दि. 15 जून : नांदेड जिल्हयात लातूर बोर्डाच्यावतीने 16 जून ते 8 जुलै 2026 या कालावधीत इयत्ता 10 वी व 12 वी पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहेत. इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षा जिल्ह्यातील 17 केंद्रावर तर इयत्ता 10 वीच्या परीक्षा एकूण 14 केंद्रावर सकाळी 11 ते सायं 6 या वेळेत घेण्यात येत आहेत. 

भारतीय नागरिक सुरक्षा संहितता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा केंद्रापासून 500 मीटरच्या परिसरात 16 जून ते 8 जुलै 2026 रोजीपर्यत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच, परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्रात 100 मीटरपर्यत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास, तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास, त्याचप्रमाणे वर दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 500 मीटरपर्यत सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहेत, असे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमित केले आहेत. 

00000

  वृत्त क्रमांक शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली ...