Monday, March 16, 2026

 प्रति, 

मा. संपादक, आवृत्ती प्रमुख, जिल्हा प्रतिनिधी, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया व आकाशवाणी

नमस्कार 🙏

उद्या मंगळवार दि. 17 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद नांदेडचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

मा. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली सन 2025-26 चे सुधारीत व सन 2026-27 चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात येईल.


🕛 वेळ: दुपारी  12.00 वाजता

📍 स्थळ: कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड

सर्व वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया व आकाशवाणी प्रतिनिधींनी उपस्थित राहून प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.


मुख्य लेखा व वित्त अधिकारी

जिल्हा परिषद, नांदेड

000000

 वृत्त क्रमांक 331

आज श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

पंडित दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह, रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 16 मार्च :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड व श्री.गुरू गोविंदसिंघजी, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 17 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 वा. पर्यंत श्री.गुरू गोविंदसिंघजी, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि  छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत युवकांसाठी टोयोटाचा 'शिका आणि कमवा' उपक्रमांतर्गत जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण ‍दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन यासारखे कोर्सेस उपलब्ध आहेत.  

या रोजगार मेळाव्यामध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत तरूणांसाठी टोयोटाचा शिका आणि कमवा अंतर्गत कौशल्य विकास उपक्रमासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 17 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 वा. पर्यंत श्री. गुरू गोविंदसिंघजी, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 330

जिल्ह्यात 16 ते 19 मार्च या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह

हलका ते मध्यम पावसाची शक्यता 

नांदेड दि. 16 मार्च :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 16 मार्च रोजी सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 16 व 19 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 16 व 17 मार्च हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा व 18 ते 19 मार्च 2026 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची , विजेच्या कडकडाटावसह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक 329

मंगळवारी कंधार येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 16 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 17 मार्च 2026 रोजी  जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कंधार येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 17 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कंधार येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 व आकाश पवार 7083096554 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 328

नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड ; श्रीनगर भागातून 10 सिलिंडर जप्त

नांदेड दि. 16 मार्च : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने श्रीनगर भागात धाड टाकून 10 रिकामे गॅस सिलिंडर जप्त केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमान मंदिर रोड, श्रीनगर परिसरात राहणारे मकसूद अहमद हे आपल्या राहत्या घरी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून चढ्या दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड व तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 12 मार्च 2026रोजी संबंधित ठिकाणी आकस्मिक तपासणी केली.

तपासणीदरम्यान पथकाला एकूण 10 रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये घरगुती वापराचे ७ सिलिंडर (एचपी-3, भारत गॅस-2, इंडेन-2) तर व्यावसायिक वापराचे ३ सिलिंडर (एचपी कंपनीचे) असे एकूण 10 रिकामे सिलेडर पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

या प्रकरणात जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 व 7 तसेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (Restriction on Use and Fixation of Selling Price) आदेश, 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईत निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड, मुंजाभाऊ लोकरे, बालाप्रसाद वल्लाकट्टी, वेदनेश्वर घावट (जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय) तसेच नवदीप जाधव आणि विश्वनाथ शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर किंवा अवैध साठवणूक करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 327

पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 16 मार्च : माणसांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद पुस्तक वाचनात असते. कायदे किंवा नियमांच्या आधारे बदल घडवता येत नाहीत; ते स्वयंप्रेरणेनेच घडतात. त्यामुळे वाचनाची सवय प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

नांदेड ग्रंथोत्सव 2025 च्या समारोप प्रसंगी (दि. 15 मार्च) ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अच्युत बन होते. व्यासपीठावर माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, राजेंद्र हंबीरे, गोविंद वडगावकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, मला लहानपणापासून वाचनाची सवय आहे. पुस्तकावर केलेली गुंतवणूक आयुष्यात खूप काही देऊन जाते. लेखक आपल्या लेखनातून एकाच वेळी हजारो लोकांशी संवाद साधतात. आपण सर्व भाषांतील पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी भाषेला मोठा साहित्यिक वारसा लाभला आहे. मोबाईलच्या युगात वाचन करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे आहे; मात्र हे आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे.

कामाच्या व्यापातूनही वाचनाची सवय कायम ठेवत असल्याचे सांगत त्यांनी सेतुमाधव पगडी लिखित आणि कै. नरहर कुरुंदकर यांच्या प्रस्तावनेचे ‘छत्रपती शिवाजी’ हे पुस्तक सध्या वाचत असल्याचे सांगितले. तसेच या कार्यक्रमाला शासकीय सोपस्कार म्हणून नव्हे तर एक वाचक व ग्रंथप्रेमी म्हणून उपस्थित असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाचन चळवळ वाढवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन वाचनाची गोडी लावावी, असे मत व्यक्त केले. माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी ग्रंथालयीन कर्मचारी अत्यंत कमी मानधनावर काम करत असून त्यांचे मानधन वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच ग्रंथालय क्षेत्रातील अडचणी सोडविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे व राजेंद्र हंबीरे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी मराठी भाषेचा वापर वाढविण्याचे आवाहन करत ‘बन साहित्य प्रतिष्ठान’च्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून साहित्यिक पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती दिली. वाचनाच्या आवडीमुळे जागतिक साहित्य संमेलन व इतर कार्यक्रमांसाठी आतापर्यंत ५५ देशांना भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्यांचा तसेच वाचकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद फाजगे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत तघडफल्ले यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी मानले.

000000





वृत्त क्रमांक 326

बुधवार १८ मार्च रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना 

प्रख्यात विख्याते गणेश शिंदे यांचा ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित 

नांदेड, दि. १६ मार्च : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमात श्री. गणेश शिंदे (व्याख्याते, स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार) यांचे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अध्यात्मदृष्टिकोनावर, समाजकार्यातील त्यांच्या प्रभावावर तसेच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विचारांवर आधारित विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

नांदेड व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी आध्यात्मिक-सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

00000000



छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...