पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ
#शेतकरीकर्जमाफी
#शेतकरीकल्याण
Monday, August 17, 2026
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर २०२६’ मध्ये सहभागी व्हा. यानिमित्त जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या रिल स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अधिकृत QR कोड स्कॅन करा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकजण सहभागी होऊया... जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वृत्त क्रमांक
समाज कल्याणकडून जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यशाळा
नांदेड दि. 17 ऑगस्ट :- जिल्ह्यात भारत सरकार शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि वसतिगृह प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित काम पाहणाऱ्या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेला उपस्थित राहावे. कार्यशाळेत अर्ज प्रक्रिया, येणाऱ्या अडचणी आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयात
कार्यशाळेचे आयोजन
मंगळवार 18 ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत तर याच दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत पीपल्स व सायन्स महाविद्यालय स्नेहनगर नांदेड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नांदेड, अर्धापूर येथील फक्त तालुका व जिल्हास्तरावरील महाविद्यालयांचा समावेश राहील.
बुधवार 19 ऑगस्ट रोजी नूतन महाविद्यालय उमरी येथे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद तालुक्यातील महाविद्यालयांचा समावेश राहील.
गुरूवार 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 यावेळेत दत्त कला व वाणिज्य महाविद्यालय हदगाव येथे हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील महाविद्यालय.
शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जनता कॉलेज नायगाव येथे नायगाव, मुखेड, देगलूर, बिलोली या तालुक्यातील महाविद्यालय.
सोमवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत सरस्वती महाविद्यालय किनवट येथे माहूर व किनवट तालुक्यातील महाविद्यालय.
मंगळवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत संत गाडगेबाबा महाविद्यालय लोहा येथे लोहा व कंधार तालुक्यातील महाविद्यालय.
मंगळवार 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत एमजीएम महाविद्यालय नांदेड येथे नांदेड मधील इतर सर्व महाविद्यालयांचा समावेश या कार्यशाळेसाठी राहील.
या योजनेंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षा मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना स्वाधार व वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियाबाबत विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा व नशामुक्त अभियान अंतर्गत शपथ अभियान देखील राबविण्यात येत असून वरील नमूद महाविद्यालयात आयोजित करण्यात येत आहे. सर्व महाविद्यालयमधील विद्यार्थी, संबंधित काम पाहणारे कर्मचारी यांनी वरील प्रमाणे उपस्थितीत रहावे. जेणेकरून या योजनेबाबत माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाहीत.
शासन निर्णय 26 डिसेंबर 2024 नुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाआयटी पोर्टलवर सन 2024-25 पासून महाराष्ट्र स्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय 1 नोहेंबर 2003 व 7 जुलै 2023 नुसार राबविण्यात येत आहे. स्वाधार योजनेंतर्गत वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जधारक विद्यार्थ्याना येणाऱ्या अडचणी तसेच सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.
स्वाधार व वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियाबाबत विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडचणी तसेच तालुकास्तरावरून कार्यालयात प्रत्येक
विद्यार्थी समक्ष येणे शक्य नाही. त्यामुळे सदर बाबतीत विद्यार्थ्यांना सविस्तर
माहिती देणे व मार्गदर्शन करण्यासाठी आणि ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय
तसेच तालुकास्तरीय महाविद्यालयाचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेस सर्व महाविद्यालय व विद्यार्थी
यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी
केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
‘जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये
मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. १७ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून त्यांच्या जयंतीदिनी, २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाच्या कामांना व्यापक लोकसहभागाची जोड देत जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचे मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. याचबरोबर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून २०, २१ आणि २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल ॲपवर मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती जगदाळे यांनी केले आहे.
अधिकृत समाजमाध्यमे :
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
जलसंधारणाच्या विविध उपक्रमांची माहिती
या विशेष मुलाखतीत सचिव जितेंद्र पापळकर राज्यातील जलसंधारणाच्या कामांची सद्यस्थिती, शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.०, माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे तसेच विविध मृदसंधारणाची कामे याबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक परिणामकारक स्वरूप देताना पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन, पाणी अडविणे व जिरविणे, भूजल पुनर्भरण आणि भूजल पातळीत वाढ यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासाठी गावनिहाय जलआराखडा, स्थानिक जलस्रोतांचे नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व शाश्वत पद्धतीने वापर याबाबत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मुलाखतीत माहिती देण्यात येणार आहे.
लोकसहभागातून जलसुरक्षित महाराष्ट्र
जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शासनाच्या प्रयत्नांना ग्रामस्थ, शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाल्यास जलसुरक्षित महाराष्ट्राचे उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य होऊ शकते. गावागावांत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक पातळीवरील सहभागाचे महत्त्वही सचिव पापळकर या मुलाखतीतून अधोरेखित करणार आहेत.
भविष्यातील जलव्यवस्थापनावर भर
हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची गरज या पार्श्वभूमीवर भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी शासनाचा दीर्घकालीन दृष्टिकोनही या मुलाखतीत स्पष्ट करण्यात येणार आहे. जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा शाश्वत वापर यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता तो लोकचळवळीचा भाग व्हावा, यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. जलसंधारण दिनाच्या निमित्ताने जलसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारून जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे, हा संदेश या विशेष मुलाखतीतून देण्यात येणार आहे.
००००
वृत्त क्रमांक
‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’मध्ये आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
नांदेड, दि. 17 ऑगस्ट : कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’ अंतर्गत 14, 15 व 16 ऑगस्ट 2026 या तीन दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच नागरिकांकरिता आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या तीन दिवसांत आरोग्य शिबिरांमध्ये 310 रुग्णांची विविध आजारांसाठी तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा, मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये 128 रुग्णांची फिजिओथेरपी व अॅक्युपंक्चर उपचार देण्यात आले, 83 रुग्णांची नेत्र तपासणी, 7 रुग्णांची इंडोस्कोपी तपासणी तसेच 92 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली.
मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी
रामेश्वर नाईक कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर राबविण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’च्या आयोजक डॉ. सान्वी जेठवाणी, अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.
मान्यवरांची शिबिरास भेट
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे, खासदार डॉ. अजितजी गोपछडे, महापौर सौ. कविता मुळे, , मा. रामेश्वर नाईक कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मुंबई, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील तसेच नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन शिबिरातील आरोग्य सेवा व व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी मान्यवरांनी शिबिरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासण्या, निदान व उपचार व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. तसेच शिबिरातील विविध आरोग्य सेवा केंद्रांना भेट देऊन नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी शिबिराचे आयोजक, समन्वयक, आरोग्य सेवा देणाऱ्या विविध संस्था तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
विविध यंत्रणांचा प्रभावी समन्वय
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे आणि समन्वयक संभाजी लोंढे यांनी शहरातील खासगी रुग्णालये, वैद्यकीय शैक्षणिक संस्था व विविध सेवाभावी संस्थांशी सातत्याने समन्वय साधून शिबिरांचे नियोजन, आयोजन आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली.
आरोग्य संस्थांचे मोलाचे योगदान
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्नित सनराईज ग्लोबल हॉस्पिटल, नांदेड येथील डॉ. त्र्यंबक दापकेकर व त्यांचे सहकारी, नांदेड फिजिओथेरपी कॉलेज, पांगरीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. विजय भारतीया, आरोग्य भारती नांदेड, लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड येथील डॉ. सुलोमान व त्यांचे सहकारी, गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडद्वारा संचालित फिरते इंडोस्कोपी रुग्णालयातील डॉ. नितीन जोशी व त्यांचे सहकारी तसेच गुरु सेवा प्रतिष्ठान व साई अॅक्युपंक्चर उपचार केंद्र नांदेड येथील डॉ. शकुंतला झंवर व डॉ. मल्लेश कर्रे तसेच सप्तरंग सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक यांचे मोलाचे योगदान लाभले.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तीन दिवस चाललेल्या या आरोग्य शिबिरांना शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, निदान, उपचार, वैद्यकीय मार्गदर्शन आणि पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने हा उपक्रम लोकाभिमुख व परिणामकारक ठरला.
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि विविध वैद्यकीय व सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून भविष्यातही नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
0000
वृत्त क्रमांक
आपणच आपला गावआराखडा तयार करा ;
वनोपजाचे संरक्षण विक्रीतून गावाला समृद्ध करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड दि. 17 ऑगस्ट :- प्रत्यक्ष फिरून शिवारफेरी पूर्ण करा, आपल्या गावाला काय हवं त्याचा आराखडा तयार करा, वनोपजाचे संरक्षण व विक्रीतून गावाला समृद्ध करा, रासायनिक खते व औषधी टाळून जीवामृत, दसपर्णी अर्क वापरा, खर्च कमी करून उत्पन्न वाढवा, गटशेती करा, सामूहिक वनसंपत्तीचे नियोजन, जैवविविधतेचे संवर्धन, लघुवनोपजाचे व्यवस्थापन, पारंपरिक ज्ञानाचा वापर आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून घेणे हेच आजच्या कार्यशाळेचं फलित आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक वनहक्क अंमलबजावणी व व्यवस्थापन समिती (CFRMC) प्रशिक्षण कार्यशाळेत किनवट येथे मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्यावतीने किनवट पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी बी. सरवनन, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांची प्रमुख उपस्थिति होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री कर्डिले असे म्हणाले की, निसर्गातील जीवसृष्टीची विविधता म्हणजे जैवविविधता होय. किनवट परिसरातील जंगले, बांबू, साग, विविध औषधी वनस्पती, वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा , हरीण, मोर, विविध पक्षी व कीटक हे सर्व मिळून त्या परिसराची जैवविविधता तयार करतात. तेव्हा याची जपणूक झाली पाहिजे.
याप्रसंगी पांढरकवडा येथील उमेद संस्थेचे सचिव अमीत कुलकर्णी यांनी ग्रामसभा सक्षमीकरण, गडचिरोली येथील सृष्टी संस्थेचे संयोजक केशव गुरनाळे यांनी आर्थिक सक्षमीकरण, यवतमाळ येथील जिल्हा व्यवस्थापक रुपेश श्रृपवार यांनी वन हक्क कायदा जनजागृती, सहायक बालाजी नरवाडे यांनी वनहक्क कायदा, वन परिक्षेत्राधिकारी धीरज मदने यांनी वन संरक्षण व संसाधन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. आदी कर्मयोगी उत्तम कानिंदे यांनी प्रास्ताविक , सूत्रसंचालन केले व आभार मानले.
याप्रसंगी सहायक प्रकल्पाधिकारी प्रदीप नाईक, विस्तार अधिकारी (पं) कैलास गायकवाड, जिल्हा कन्व्हर्जन समिती सदस्य तुकाराम पेंदोर , गजानन डवरे, देवगिरी कल्याण आश्रम जळगावचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. उत्तम धुमाळे, जिल्हा सचिव विश्वनाथ नखाते, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार, वनपाल मनोज गुरसाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वनहक्क तालुका व्यवस्थापक महेश राठोड व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे गणेश कटकमवार यांनी परिश्रम घेतले.
000000
वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी • विद्यार्थी, उमेद...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...







.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)