Wednesday, March 25, 2026

वृत्त क्रमांक  

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने

एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

नांदेड, दि. 25 मार्च :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” (CRT) बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने माहे एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक गावातील किमान ३०-४० शेतकऱ्यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.  

पाणी फाउंडेशनद्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

सदर शेती शाळा चार भागात घेतली जाणार असून त्याबद्दलचा तपशील नियोजित दिनांकासह खालील प्रमाणे आहे. 

भाग १- पेरणीपूर्व तंत्रज्ञान: बेड तयार करणे, बेडवर टोकन करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया- दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी नियोजित.

भाग २- जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन: बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन. नियोजित दिनांक ८ एप्रिल २०२६.

भाग ३- एकात्मिक कीड व्यवस्थापन: सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, 

लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर. नियोजित दिनांक १५ एप्रिल २०२६.

भाग ४- भात शेतीचे लागवड तंत्र : भाताची थेट पेरणी, श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत. नियोजित दिनांक २२ एप्रिल २०२६.  

या शेतीशाळेस कृषि विभागा अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी ४०-५० शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

उपरोक्त शेती शाळा नियोजित दिनांका दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळेची लिंक गाव निहाय शेतकरी यांचे व्हॉअसअपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे कृषी अधिक्षक कृषी कार्यालयाने कळविले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक  

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक

कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 25 मार्च :- संपूर्ण महाराष्ट्रात सन 2024 पासून धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालकांनी ऑनलाईन नोंदणी करावी व या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे. 

या कल्याणकारी मंडळाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे. 

वय 65 वर्षावरील चालकासाठी सन्मान निधी योजना, जीवन विमा व अपंगत्व विमा योजना कर्तव्यावर असताना, आरोग्य विषयक लाभ योजना, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य योजना, पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना.

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत बेवसाईटची लिंक https://ananddighekalyankarimandal.org आहे. या लिंकद्वारे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक संघटना तसेच रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक यांनी अधिकृत लिंकद्वारे सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. 

सभासद नोंदणी पुढीलप्रमाणे करावी. वाहन मालकाचे नाव, वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक तसेच कुटूंबातील सदस्यांची माहिती, रेशन कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, इत्यादीची माहिती भरुन आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी. अर्जातील माहिती तपासून सर्व अटीची पुर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जातो. अर्जामध्ये त्रुटी असल्यास कार्यालयास संपर्क साधा असा संदेश प्राप्त होतो. अशा वेळी प्रादेशकि परिवहन कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून त्रुटीची पुर्तता करुन घ्यावी. 

नोंदणी व ओळखीसाठी 500 व सभासद शुल्क 300 रुपये असे एकूण 800 रुपये शुल्क भरण बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिपक वाकोडे मो. क्र. 9834589717 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक  

31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार 

नांदेड, दि. 25 मार्च :- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी 31 मार्च 2026 अखेर प्राप्त होणारी देयके पारित करून त्याच दिवशी आहरण व वितरण अधिकाऱ्यांना ई-कुबेर व धनादेशाद्वारे प्रदान करणे आवश्यक आहे.

यासाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 409 नुसार जिल्हाधिकाऱ्यांना कोषागारातील व्यवहारासाठी सुट्टीच्या दिवशीही बँका उघड्या ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने 31 मार्च 2026 रोजी शासनाचे कोषागाराशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी भारतीय स्टेट बँक तसेच शासनाचे व्यवहार हाताळणाऱ्या जिल्हा व तालुका स्तरावरील इतर बँकांच्या शाखा रात्री उशिरापर्यंत कार्यरत ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

00000

  वृत्त क्रमांक  

’माझे गाव - आरोग्य संपन्न गाव' अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभ

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश

नांदेड दि.२५ मार्च:-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी 'माझे गाव - आरोग्य संपन्न गाव' हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनानुसार, १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे.

१ एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अभियानाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ एप्रिल २०२६ रोजी, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 'विशेष आरोग्य ग्रामसभा' आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ग्रामसभेमध्ये:

 * ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली जाईल.

 * आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाईल.

 * लोकसहभागातून गाव 'आरोग्य संपन्न' करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाईल.

अभियानाचे स्वरूप व पुरस्कार

हे अभियान केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजना आणि शाश्वत विकास ध्येयांशी (SDG-3) संलग्न आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्ह्यांना राज्यस्तरावर कोट्यवधी रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000



वृत्त क्रमांक   कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन  नांदेड, दि. 25 मार्च :- नानाजी देश...