#घरगुतीएलपीजी चा तुटवडा नाही
Friday, March 13, 2026
वृत्त क्रमांक
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
नांदेड दि. 13 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 16 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 16 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्कासाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक 02462-251674 व मो. 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
मिनी सरस – रेणुका महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; महिलांच्या उत्पादनांना विक्रीचे व्यासपीठ
नांदेड, दि. १३ मार्च : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड यांच्या वतीने मिनी सरस – जिल्हास्तरीय रेणुका महोत्सव २०२६ अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान संचालक मेघना कावली व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. पूनमताई राजेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वसरणी येथील निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत दिग्दर्शक पंकज शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्फूर्तीदायक गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विनोदी वासरे यांनी केलेल्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) अमित कुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पापु व मयूरकुमार अंदेलवाड, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे व त्यांची टीम तसेच आरोग्य विभागाच्या डॉ. प्रगती निलपत्रेवार उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तुबाकले यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा स्मिता मोहोरी यांनी मांडली तर सूत्रसंचालन इरवंत सूर्यकार व स्मिता मोहोरीर यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सौ. पूनमताई पवार यांनी महिलांनी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उद्योग-व्यवसायाकडे वळावे, तसेच त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
यानंतर राज्य अभियान व्यवस्थापक तथा नांदेडचे पालक अधिकारी रामदास धुमाळ यांनी उमेद अभियानाचा इतिहास, उद्दिष्टे व वैशिष्ट्ये यांची माहिती दिली. महिलांना आर्थिक पाठबळ देऊन उपजीविका, लखपती दीदी उपक्रम तसेच स्वावलंबी विचारपीठ निर्माण करण्याचे काम उमेद अभियानातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोप करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितले की, देशातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण जीवनोन्नती अभियान विविध नावांनी राबविले जाते. महाराष्ट्रात ‘उमेद’ अभियानाद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना उद्योजकतेकडे वळविण्याचे काम करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड यांनी मानले.
या महोत्सवात नांदेड तसेच इतर जिल्ह्यांतील महिलांच्या सुमारे १०० विक्री स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रमही पुढील पाच दिवस आयोजित करण्यात येणार आहेत.
दुपारच्या सत्रात महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली, तर सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध शाहीर प्रा. गौतम पवार (भूकमारीकर) यांच्या शाहिरी प्रबोधन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
हा मिनी सरस – रेणुका महोत्सव १८ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली.
000000
गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत
राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन
· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध
· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने
· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही
· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई
· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. १३ : इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसेच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याची नागरिकांनी निश्चिंतता बाळगावी, अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
मार्च महिन्यामध्ये गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध असून युध्दाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना विभागामार्फत सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा या समित्यांमध्ये समावेश असेल. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
मुंबई-ठाणे रेशनिंग क्षेत्रात नियंत्रक, रेशनिंग यांच्या नियंत्रणाखाली स्थापन केलेल्या समितीत पोलीस उप आयुक्त आणि उपनियंत्रक (रेशनिंग) समितीत समावेश करण्यात येणार असून मुंबई आणि ठाणे शहरातील सर्व उपायुक्तांशी सह पोलीस आयुक्त (प्रशासन) समन्वय साधणार आहेत.
पर्यायी इंधनाच्या वापराची शक्यता तपासण्याचे निर्देशही यंत्रणांना देण्यात आले आहेत. यामध्ये कोळसा, रॉकेल आदी पर्यायांचा विचार केला जाणार असला तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच जिल्हास्तरीय समित्यांनी हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांसोबत बैठक घेऊन पर्यायी इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत.
अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने
रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, शासकीय शाळा/महाविद्यालयांमधील मेस, मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना घरगुती/व्यावसायिक गॅसचा पुरवठा प्राधान्याने देण्यात येणार असून अशा संस्थांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने देण्यासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रमही निश्चित केला जाणार आहे.
गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरू नयेत, यासाठी दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन तसेच मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा समित्या यांसंदर्भातील जबाबदारी पार पाडतील. समाज माध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येईल.
गॅस बुकींग अॅप आणि मिस्ड कॉल सेवांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश तेल कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष तातडीने सुरू करून तक्रार निवारणासाठी व्हॉट्सअॅप सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आगामी धार्मिक सण व उत्सवांचा विचार करून सार्वजनिक संस्थांना एलपीजी सिलिंडरचा पुरवठा अखंड ठेवण्यासाठी प्राधान्य राहील.
गॅस सिलिंडर पुरवठ्या संदर्भात नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. एलपीजी वाहतूक करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सींना आवश्यक पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन, रेशनिंग नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज साठा स्थिती व अद्ययावत अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही
महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी सुमारे ९,००० मेट्रिक टन एलपीजी ची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी उत्पादन वाढविण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घरगुती गॅसची मागणी पूर्ण करण्याइतके पुरेसे उत्पादन आणि साठा उपलब्ध आहे.
व्यावसायिक एलपीजीच्या बाबतीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार रुग्णालये, शाळांमधील मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा, सामुदायिक स्वयंपाकगृहे (कम्युनिटी किचन), तसेच शासकीय शाळा व महाविद्यालयांच्या मेस यांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात येत आहे. उपलब्ध उत्पादनातून या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात.
घरगुती वापरासाठीच्या पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) चा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधनाच्या बाबतीतही राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून दररोज सुमारे १५,००० किलो लिटर पेट्रोल आणि ३८,००० किलो लिटर डिझेल या मागणीची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
००००
वंदना थोरात/विसंअ
वृत्त क्रमांक
सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
नांदेड, दि. 13 मार्च :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
वृत्त क्रमांक
चढया दराने खताची विक्री केल्याने देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
नांदेड, दि. 13 मार्च : देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी पाच कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
वृत्त क्रमांक
बिलोली शहरात 15 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
नांदेड दि. 13 मार्च :- बिलोली शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 12 मार्च 2026 रोजी बिलोली शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 15 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करून 6 हजार 400 रुपये दंड वसूल केला.
ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ.संजीवनी जाधव, डेंटल सर्जन डॉ. पूजा काळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड व समुपदेशक सुंदर चव्हाण तसेच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल एम एस मुद्देमवार व पोलीस कॉन्सटेबल एन एम अंबुरे उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
जिल्ह्यात १६ व १७ मार्च रोजी यलो अलर्ट जारी
जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह
हलका ते मध्यम पावसाची शक्यता
नांदेड दि. 13 मार्च :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी १३ मार्च २०२६ रोजी सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ व १७ मार्च २०२६ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. १६ व १७ मार्च २०२६ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.
या गोष्टी करा :
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका:
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
00000
वृत्त क्रमांक
सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ वेळेत द्या-अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर
आरोग्य,निवास,शिक्षण यांच्यासह सर्व लाभ वेळेत देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करा
नांदेड, दि. १३ मार्च : स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे. शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या प्रगतीसाठी विविध योजनांचे लाभ नियमानुसार व वेळेत देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात सफाई कामगारांच्या अडचणी व प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विभागप्रमुख तसेच सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. हदगाव नगर परिषदेअंतर्गत प्रलंबित प्रकरणावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करा. तसेच समितीनुसार असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना अध्यक्ष श्री. डागोर यांनी दिल्या.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष शिबिरे आयोजित करून आयुष्मान भारत कार्ड व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत घरकुल, समाजकल्याण विभागाच्या योजनांद्वारे पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, तसेच महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योगासाठी कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती, साप्ताहिक सुटी, नियमित वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रलंबित लाभ तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना अध्यक्ष श्री. डागोर यांनी सांगितले की, भविष्यात सफाई कर्मचारी कंत्राटी न राहता नियमित कर्मचारी करण्यावर भर देणार असल्याचे त्यानी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी समन्वयाने कार्य करून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल, अशी ग्वाही दिली.
प्रारंभी नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली.
०००००
वृत्त क्रमांक
१४ व १५ मार्च रोजी नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन
ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन व साहित्यिक मेळाव्याची मेजवानी
नांदेड दि.१३ मार्च:-: ग्रंथसंस्कृतीचा वारसा जपणे आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यावतीने १४ व १५ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, साहित्यिक मेळावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ मार्च रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या वेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसीलदार विकास बिरादार, राजकुमार माने तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सकाळी ११ वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत राहणार असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने “महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम व सार्वजनिक ग्रंथालयांसमोरील आव्हाने” तसेच “छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वराज्य संकल्पना” या विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशी “अभिजात मराठी भाषा व साहित्य” तसेच “स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने” या विषयांवर परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव (बहिर्जी महाविद्यालय, बसमत), प्रा. संजय जगताप, डॉ. विलास वैद्य, महेश मोरे, नारायण शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, प्रा. शामल पत्की (सचिव, नांदेड एज्युकेशन सोसायटी) तसेच विजय सुवर्णकार (राजपत्रित अधिकारी) मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रंथोत्सवाचा समारोप डॉ. अच्युत बन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून संभाजीराव धुळगंडे, अर्जुन झाडे (जिल्हा नियोजन अधिकारी), विक्रम देशमुख (कोषागार अधिकारी), दिलीप बनसोडे (शिक्षणाधिकारी), दत्ता डांगे (इसाप प्रकाशन, नांदेड) व निर्मलकुमार सूर्यवंशी (निर्मल प्रकाशन, नांदेड) उपस्थित राहणार आहेत.
गुरु गोविंदसिंग स्टेडियम परिसरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे होणाऱ्या या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, वाचक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी व नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
#घरगुतीएलपीजी चा तुटवडा नाही #महाराष्ट्रशासन #LPG #गॅससिलेंडर #पेट्रोल #डिझेल #इंधन
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...


