Saturday, November 7, 2026

​ निमंत्रण

मा. संपादक / प्रतिनिधी / स्ट्रिंजर, दैनिक वृत्तपत्र / 

दूरचित्रवाणी / केबल टीव्ही, नांदेड जिल्हा.

सस्नेह नमस्कार,

​मा. उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री ​मा.ना.​ डॉ. उदय सामंत  हे ​रविवार, दि. ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता सायाळ (ता. जि. नांदेड) येथे​ शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

तरी आपण यावेळी उपस्थित राहावे, ही विनंती.

-- प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

****

वृत्त क्रमांक

उद्योगमंत्री उदय सामंत उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर

सायाळ येथे शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी

नांदेड, दि. ७ : राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार, दि. ८ नोव्हेंबर, २०२६ रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

रविवार,दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता ते नांदेड येथून मोटारीने सायाळ (ता. जि. नांदेड) येथे जाण्यासाठी प्रयाण करतील. सकाळी ११.४५ वाजता सायाळ येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

दुपारी १ वाजता #सायाळ येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी १.३० वाजता नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतरचा वेळ राखीव राहील.

***


#दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali

वृत्त क्रमांक

अवैध सावकारी व जबरी कर्जवसुलीविरुद्ध नांदेड जिल्ह्यात विशेष मोहीम

नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात

नांदेड, दि. ७ : जिल्ह्यातील अवैध सावकारी, शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारणी आणि जबरीने कर्जवसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारांना बळी पडलेल्या नागरिकांनी कोणत्याही दबावाला न घाबरता निर्भयपणे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सावकारी समितीच्या बैठकीत प्राप्त तक्रारींचा प्रकरणनिहाय आढावा घेण्यात आला. अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची विशेष तपासणी सुरू असून, कर्जवाटप व वसुलीची पद्धत, परवान्यातील अटींचे पालन, व्याजदरांची आकारणी तसेच वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे.

शासनाच्या १६ सप्टेंबर २०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना दिलेल्या तारण कर्जासाठी वार्षिक ९ टक्के, तर विनातारण कर्जासाठी १२ टक्के व्याजदर निर्धारित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिलेल्या तारण कर्जासाठी १५ टक्के, तर विनातारण कर्जासाठी १८ टक्के वार्षिक व्याजदराची मर्यादा आहे. या मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारणे तसेच चक्रवाढ किंवा दंडव्याज आकारणे अनुज्ञेय नाही.

सद्यस्थितीत जिल्ह्यात १८८ वैध परवानाधारक सावकार असून, त्यापैकी ११४ सावकार नांदेड तालुक्यात आहेत. विशेष तपासणी मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६२ सावकारांच्या दप्तरांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आवाहनानंतरच्या दहा दिवसांत अवैध सावकारीसंदर्भात २३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १५ तक्रारींची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.

सावकारांकडून जबरदस्तीने किंवा दबाव टाकून कर्जवसुली केली जात असल्यास अथवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारले जात असल्यास नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड किंवा संबंधित तालुक्याच्या उपनिबंधक अथवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींची पडताळणी करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अवैध सावकारीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

******








वृत्त क्रमांक

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा व पाणी उपलब्धतेची संयुक्त पाहणी

आंडगा (दक्षिण) येथे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची क्षेत्रीय भेट; ग्रामस्थांशी साधला संवाद

नांदेड, दि. ७ : जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज लोहा तालुक्यातील आंडगा (दक्षिण) येथे संयुक्त क्षेत्रीय भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

आंडगा (दक्षिण) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मन्याड (लिंबोटी) धरणावरील विद्युत मोटारींचा वीजपुरवठा दररोज दोन ते तीन तास सुरू ठेवून जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जनावरांसाठी चारा व पाण्याच्या उपलब्धतेबाबत तसेच विद्युत मोटारींच्या वीजपुरवठ्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली.

परिसरात उपलब्ध असलेल्या वाळलेल्या चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत, निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत तसेच पशुधनासाठी संतुलित आहार व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या संयुक्त पाहणीत जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, लोहा येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे  सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम बोदेमवाड उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी चारा व पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासह ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली.

**







 महात्मा जोतीराव फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष : समाजकार्यासोबत विकासकामांतही मोलाचे योगदान


महात्मा जोतीराव फुले यांनी स्वकष्टातून मिळविलेली संपत्ती समाजकार्यासाठी खर्च केली. पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. पुण्यातील येरवडा पुलाच्या बांधकामात त्यांच्या कंपनीचा सहभाग होता. सामाजिक परिवर्तनासोबत विकासकामांतही त्यांनी आपला ठसा उमटविला.

#महात्माजोतीरावफुले #द्विजन्मशताब्दी #सामाजिकपरिवर्तन #MahatmaPhule #SocialReform



#दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी आता एका जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्यात किंवा विभाग स्तरावर चारा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयातून जिल्ह्यांची चारा गरज भागवावी, असे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, गाळपेर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना ज्वारी, मका, हरभरा आदी पिके घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

वृत्त क्रमांक

एएसडीडी प्रवर्गातील मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्याची आणखी एक संधी

स्थलांतरित मतदारांना सध्याच्या निवासस्थानाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करता येणार

नांदेड,दि.7 : विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेदरम्यान घरोघरी भेटी देऊन गणना प्रपत्र वितरित करण्यात आले होते. मात्र, गणना प्रपत्र देऊनही अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) आणि दुबार (Duplicate) अर्थात ASDD या प्रवर्गांत समावेश झाल्यामुळे ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्याची आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

या मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाशी संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र भरून सादर करता येणार आहे. संबंधित मतदारांची पूर्वीची माहिती असलेली गणना प्रपत्रे ECINET प्रणालीद्वारे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संबंधित मतदारांपर्यंत प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सॲप, ई-मेल, एसएमएस आदी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून ही प्रपत्रे पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. तसेच मतदारांना मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरून किंवा ECINET प्रणालीद्वारे आपला मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) प्रविष्ट करून गणना प्रपत्र डाऊनलोड करता येईल व ते भरूनही सादर करता येईल.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संबंधित राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मतदारांशी संपर्क साधतील. तसेच शेजारी, नातेवाईक, स्थानिक रहिवासी आणि रहिवासी कल्याणकारी संस्थांच्या माध्यमातून अथवा उपलब्ध संपर्क क्रमांकाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचून गणना प्रपत्र भरण्याच्या प्रक्रियेची माहिती देतील.

स्थलांतरित व स्थलांतरित नसलेल्या मतदारांसाठी स्वतंत्र जोडपत्रे

जे मतदार त्यांच्या मूळ निवासस्थानावरच वास्तव्यास आहेत, मात्र काही कारणास्तव गणना प्रपत्र सादर करू शकले नाहीत, अशा मतदारांनी गणना प्रपत्रासोबत जोडपत्र-ब मध्ये प्रपत्र सादर न करण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. तर मूळ निवासस्थानावरून स्थलांतरित झालेल्या मतदारांनी जोडपत्र-क मध्ये त्यांच्या नवीन पत्त्याची आणि संबंधित विधानसभा मतदारसंघाची माहिती देणे आवश्यक आहे. अशा स्थलांतरित मतदारांना त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र सादर करता येईल.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या अधिकृत संकेतस्थळावर ASDD प्रवर्गातील मतदारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत आपले नाव असलेल्या आणि प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ६ (Form-6) सादर न केलेल्या मतदारांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने गणना प्रपत्र भरून सादर करावे. यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

दरम्यान, ASDD यादीतील ज्या मतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ६ (Form-6) आधीच सादर केला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

​ निमंत्रण मा. संपादक / प्रतिनिधी / स्ट्रिंजर, दैनिक वृत्तपत्र /  दूरचित्रवाणी / केबल टीव्ही, नांदेड जिल्हा. सस्नेह नमस्कार, ​ मा. उद्योग, ...