Friday, May 8, 2026

वृत्त क्रमांक

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी

विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड दि. मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 08 मे 2026 रोजी दुपारी 12:24 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 08 व 09 मे 2026 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.                                       

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच  झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण

नांदेड, दि. ८ मे : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” चे आयोजन तरोडा बु. मंडळातील पासदगाव येथे राधेश्वरी मंगल कार्यालयात करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती घेऊन लाभ मिळविला.

सदर शिबिरास नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी श्री. चातरमल , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातील विविध गावांचे सरपंच व इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महसुली कामे तात्काळ मार्गी लागत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, विशेष सहाय्य, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक, निवडणूक विभाग तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरामध्ये सातबारा व 8-अ चे एकूण 748 दाखले वितरित करण्यात आले. तसेच उत्पन्न, रहिवासी, वय, जातीचे तसेच अल्पभूधारक प्रमाणपत्र आदी मिळून एकूण 799 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या गट अदलाबदलीद्वारे सातबाराचे वितरण करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय SIR मोहिमेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरामध्ये विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. विशेषतः सातबारा व ८-अ वितरण, आधार दुरुस्ती, आपले सरकार सेवा केंद्र, जनगणनेतील स्व-गणना, आरोग्य तपासणी, वन विभाग, संजय गांधी निराधार योजना आदी स्टॉलना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विविध योजनांची माहिती घेऊन तत्काळ अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, सुनील माचेवाड, श्री. गरड तसेच मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, अनिरुद्ध जोधळे, कुणाल जगताप, प्रमोद बडवणे, सय्यद मोसीन, संतोष आस्कुलकर, श्रीकृष्ण येलमट्टे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी गोपीनाथ कल्याणकर, मारोती कदम, संजय आढाव, अविनाश करंदीकर, माधव शिराळे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी परिश्रम घेतले.

०००००





वृत्त क्रमांक

बॅकींग, फायनान्स, अॅग्रीकल्चर, शिक्षण क्षेत्रात रोजगाराची संधी 

पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड दि. 8 मे :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व स्वा.से.राजासिंग हरिसिंग चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 12 मे 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून स्वा.से.राजासिंग हरिसिंग चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार असून या रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एसबीआय लाईफ इन्शुरन्स, मुथ्थुट फायनान्स लि, मेघदूत डेअरी प्रोडक्टस, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड या आस्थापनेकडून रिक्तपदे प्राप्त झाली असून ते प्रत्यक्ष उपस्थीत राहून मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, डिप्लोमा, आयटीआय, एचएससी उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक-युवतीसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डने लॉगीन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा पात्रतेनुसार बायोडाटाच्या आवश्यक प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. 

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. 

संबंधीत दिनांकास सकाळी १० वा. कार्यक्रमस्थळी उपस्थीत राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्याकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000


वृत्त क्रमांक जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता नांदेड दि.  8  मे :-  प्रादेशिक...