Thursday, October 15, 2026

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य #निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने दि २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन व मदत करतील . मतदार यादीत नाव समावेशन करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरता येतो. मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ वापरावा. तसेच निवासस्थानातील बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो.

मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती ही वर्षभर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र नवीन मतदार किंवा प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येईल. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासून आवश्यक अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादी तपासणे, नमुना अर्ज क्रमांक ६ भरणे किंवा नोंदणी प्रक्रियेसंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्राशी संपर्क साधता येईल.

जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/.../Districtvoterh... या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

#ECI 

वृत्त क्रमांक

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून शेतीला नवी दिशा !

• नांदेडमध्ये ‘महिला किसान दिन 2026’ कार्यशाळा; 16 तालुक्यांतील 290 महिला शेतकरी व कृषी सखींचा सहभाग

नांदेड(जिमाका), दि. 15: शेतीतील महिलांचे योगदान अधोरेखित करत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग, मूल्यवर्धन आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ‘महिला किसान दिन 2026’ निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नांदेड आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधील 290 महिला शेतकरी व कृषी सखी सहभागी झाल्या.
शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नऊ महिला शेतकऱ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात शेती क्षेत्रातील महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. महिलांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय आणि कृषिमालाच्या मूल्यवर्धनाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला शेतकऱ्यांचा सन्मान; उद्योग व स्वावलंबनावर भर
नांदेड, मुखेड आणि उमरी तालुक्यांतील महिला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘महिला शेतकरी प्रमाणपत्रां’चे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र नोंदणी मोहिमेत विशेष पुढाकार घेऊन सर्वाधिक नोंदणी घडवून आणल्याबद्दल कंधार तालुक्यातील गऊळ येथील सौ. शिवकांता ज्ञानेश्वर हेंडगे आणि लोहा तालुक्यातील दापशेड येथील सौ. वैष्णवी विश्वनाथ होळगे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवनवार यांनी गृहउद्योग, प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील विषय विशेषज्ञ सौ. अलका पवळे-पाटील यांनी महिलांचे आरोग्य, पोषण आणि संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील शास्त्रज्ञ सौ. प्रियंका खोले यांनी सूक्ष्म सिंचन, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक उद्योग अधिकारी अरविंद हांडे यांनी महिलांसाठीच्या शासकीय उद्योग योजना, अनुदान आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. कापूस संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी अवर्षणप्रवण परिस्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या करडई पिकाचे सुधारित वाण, लागवड तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका सौ. स्वाती बहीणजी यांनी ‘योगिक शेती’ संकल्पनेतून आत्मिक बळ, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व स्पष्ट करत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किनवटचे तालुका तंत्र व्यवस्थापक शिवप्रकाश पटवे यांनी केले, तर आत्माच्या प्रकल्प उपसंचालक अर्चना गुंजकर यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील तालुका तंत्र व्यवस्थापक, सहाय्यक तालुका तंत्र व्यवस्थापक तसेच आत्मा, पोकरा आणि स्मार्ट प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
***




वृत्त क्रमांक

सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

• महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

नांदेड(जिमाका), दि. 15: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नांदेड आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान प्राप्त नॅशनल यूथ आयकॉन मुरलीधर हंबर्डे, प्रा. डॉ. सागर कुलकर्णी, प्रा. डॉ. संदीप काळे तसेच समाज कल्याण निरीक्षक पी. जी. खानसोळे, एन. जे. शेख, एम. एन. जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सेवा संकल्प अभियानांतर्गतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा निकाल मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. प्रास्ताविकात शिवानंद मिनगीरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी आणि त्यांच्या वक्तृत्व कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने आणि मेहनतीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक शिवराज गायकवाड यांनी केले, तर मुख्याध्यापक एन. जे. शेख यांनी आभार मानले. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

***



वृत्त क्रमांक

गावोगावी दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवा!

• नायगाव येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा व आढावा बैठक संपन्न

• राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह व्यापक जनजागृतीवर भर

नांदेड(जिमाका), दि. 15 : ‘सुदृढ आरोग्य – सशक्त गाव – समृद्ध भारत’ या संकल्पनेतून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नायगाव येथे तालुकास्तरीय ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा व आढावा बैठक उत्साहात पार पडली. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.

या कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखडे, सहाय्यक गटविकास अधिकारी ऋषिकेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत पटवेकर आणि निरीक्षण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वेळेत आणि तत्पर आरोग्य सेवा देण्यावर भर

गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखडे यांनी मार्गदर्शन करताना, आरोग्य यंत्रणेने गावांतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून नागरिकांना वेळेत आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा उपकेंद्रनिहाय आणि कर्मचारीनिहाय सविस्तर आढावा घेतला. आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले. क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.

निरीक्षण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे यांनी वार्षिक उद्दिष्टपूर्तीचा आढावा सादर केला. आरोग्यविषयक कामकाजात गुणवत्तापूर्ण सुधारणा करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले.

आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

या कार्यशाळेस मांजरम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न पाटील, कुंटूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा शिंदे, डॉ. सुनील वाघमारे, आरोग्य विस्तार अधिकारी महेश मुखेडकर, आरोग्य निरीक्षक अंकुश खिल्लारे यांच्यासह मांजरम, कुंटूर व बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत पटवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मठपती, शैलेश मच्छरलावार, अनुप जगताप आणि सोमेश यांनी विशेष परिश्रम घेतले.

**

वृत्त क्रमांक

आयोडीनयुक्त मिठाचा वापर करा; आरोग्य जपा!

• नांदेड जिल्ह्यात 14 ते 28 ऑक्टोबरदरम्यान आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध पंधरवडा

नांदेड(जिमाका), दि. 15: आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे विकार टाळण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन आहारात प्रमाणित आयोडीनयुक्त मिठाचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 14 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध दिन’ म्हणून पाळला जातो.

शरीराच्या आणि मेंदूच्या विकासासाठी आयोडीन आवश्यक

आयोडीन हा शरीराच्या आणि मेंदूच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेला सूक्ष्म पोषक घटक आहे. शरीरात आयोडीनची कमतरता झाल्यास गलगंड अर्थात थायरॉईड ग्रंथीची वाढ, मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटणे, बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होणे, तसेच गर्भवती महिलांमध्ये गर्भपात आणि नवजात बालकांमध्ये जन्मजात विकारांचा धोका वाढू शकतो. हे विकार टाळण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात आयोडीनयुक्त मिठाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी करणे आणि प्रत्येक घरापर्यंत पुरेसे आयोडीनयुक्त मीठ पोहोचविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पंधरवड्यात विविध जनजागृतीपर उपक्रम

या पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, घोषवाक्य लेखन, प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरे, उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नागरिकांना आयोडीनचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावोगावी गटसभा व जनजागृती सभा घेण्यात येत आहेत. तसेच मीठ तपासणी संचाच्या साहाय्याने मिठातील आयोडीनचे प्रमाण तपासण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि समाजमाध्यमांद्वारेही या विषयाचा प्रसार करण्यात येत आहे.

मिठाची खरेदी आणि साठवणूक करताना काळजी घ्या

नागरिकांनी नेहमी प्रमाणित, पाकीटबंद आयोडीनयुक्त मीठ खरेदी करावे आणि उघड्यावर विकले जाणारे अस्वच्छ मीठ वापरणे टाळावे. मिठातील आयोडीनचे प्रमाण टिकून राहण्यासाठी मीठ ओलाव्यापासून दूर, हवाबंद आणि झाकण असलेल्या डब्यात साठवावे. आहारात नियमितपणे आयोडीनयुक्त मिठाचा वापर करून स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य जपावे. या पंधरवड्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.

**

 वृत्त क्रमांक

कीर्तनातून दुष्काळग्रस्त गावांत जनजागृतीचा जागर

• पाणीबचत, पशुधन संवर्धन, शेतकरी कल्याण आणि सामाजिक सुधारणांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

नांदेड(जिमाका), दि. 15: दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या गावांमध्ये पाणीबचत, जलसंधारण, पशुधन संवर्धन, शेतकरी कल्याण आणि सामाजिक सुधारणांबाबत जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने कीर्तनकार, प्रवचनकार आणि समाजप्रबोधनकारांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘अधिकृत प्रशासकीय आवाहन व मार्गदर्शिका 2026’च्या माध्यमातून कीर्तनाच्या प्रभावी लोकपरंपरेला समाजहिताच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत कीर्तन हे भक्तीबरोबरच लोकशिक्षण आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम राहिले आहे. अभंग, भारुडे आणि संतविचारांच्या माध्यमातून जलसंवर्धन, शासकीय योजनांची माहिती, सामाजिक जबाबदारी आणि संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संदेश गावागावांत पोहोचविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाणीबचत आणि जलसंधारणावर भर

दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि शेतीसाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ व पाइपलाइनमधील गळती त्वरित निदर्शनास आणून देणे, पावसाचे पाणी साठविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनर्भरण व पुनरुज्जीवन करण्याबाबत कीर्तनातून जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या बोअरवेलच्या निर्मितीपेक्षा उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मानसिकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे.

पशुधन संवर्धनातून शेतकऱ्यांना आधार

दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे चारा व्यवस्थापन, चारा छावण्यांबाबतची माहिती आणि उपलब्ध शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘चारा मित्र’ संकल्पनेतून चारा व्यवस्थापनासाठी लोकसहभाग वाढविणे आणि पीक अवशेष योग्य प्रक्रियेद्वारे पशुखाद्य म्हणून वापरण्याबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहे. ‘चारा वाचवा, पशुधन वाचवा’ हा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून जनमानसात रुजविण्यावर भर देण्यात आला आहे.

अनिष्ट प्रथांविरोधात समाजप्रबोधन

आर्थिक संकटाच्या काळात कुटुंबांवरील खर्चाचा ताण कमी करण्यासाठी विवाहसोहळ्यांतील अनावश्यक खर्च टाळणे, सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देणे आणि बचतीचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हुंडाप्रथा, बालविवाह आणि व्यसनाधीनतेविरोधात समाजप्रबोधन करणे, मुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यांना प्रोत्साहन देणे, तसेच व्यसनाधीन व्यक्तींना अपमानित न करता उपचारासाठी प्रेरित करणे, या बाबींनाही मार्गदर्शिकेत महत्त्व देण्यात आले आहे.

मानसिक आरोग्याबाबत संवेदनशीलतेचा संदेश

दुष्काळ, आर्थिक विवंचना आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे शेतकरी कुटुंबांवर मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तींचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून देणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आत्महानीचे विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना दोष न देता त्यांना आधार देणे, एकटे न सोडणे आणि योग्य मदतीपर्यंत पोहोचविण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने मार्गदर्शिकेत शिवार हेल्पलाइन 8955771115, राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन ‘टेली-मानस’ 14416, रुग्णवाहिका सेवा 108 आणि पोलीस मदत क्रमांक 112 यांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचे नमूद करण्यात आले आहे.

कीर्तनातून सामूहिक संकल्प

कीर्तनाच्या समारोपावेळी ग्रामस्थांकडून पाणीबचत व जलव्यवस्थापन, शेतकरी आणि पशुधन संवर्धन, शासकीय मदतीसाठी अधिकृत कार्यालयांशी संपर्क, अनावश्यक सामाजिक खर्चाला आळा, बालविवाह व व्यसनांना नकार आणि संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आधार देणे, अशा विषयांवर सामूहिक संकल्प करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संतपरंपरेतील समता, करुणा आणि मानवतेचा संदेश आजच्या सामाजिक आव्हानांशी जोडून लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीला कर्तव्याची जोड देत जलसंवर्धन, शेतकरी कल्याण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी कीर्तनकार व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

वृत्त क्रमांक

साबणाने हात धुणे हे आजार प्रतिबंधाचे प्रभावी साधन

• खैरगाव व आमदाबाद तांडा येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जनजागृती

नांदेड (जिमाका), दि. 15 : संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. हात धुण्याची सवय दैनंदिन जीवनात अंगीकारल्यास अनेक आजारांना प्रतिबंध करता येतो, असे प्रतिपादन अर्धापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यू. डी. तोटावाड यांनी केले.

जागतिक हात धुवा दिनानिमित्त अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ मिलिंद व्यवहारे, विस्तार अधिकारी एस. पी. गोखले, पी. एन. गर्जे, बालाजी गव्हाणे, दत्ता नांद्रे, संजय गोवंडे, प्रकाश इंगोले, माणिकराव सोळंके, धोंडीबा कल्याणकर, ग्रामपंचायत अधिकारी सदानंद मुधोळकर, मुख्याध्यापक शेख खमरोद्दीन, गजानन कल्याणकर, निळकंठ भोसले, कामाजी एडके आणि धाराजी कदम आदी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी तोटावाड यांनी गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. माहिती, शिक्षण व संवाद पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच हात धुण्याच्या विविध टप्प्यांची माहिती देऊन स्वच्छतेच्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर गटविकास अधिकारी तोटावाड यांनी खैरगाव येथील धारा दुग्ध उत्पादक सहायता गटाला भेट देऊन गटामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्र, हळद-मिरची कांडप यंत्र आणि शेवया तयार करण्याच्या यंत्राची पाहणी केली. त्यांनी महिला सदस्यांशी संवाद साधला. तसेच अंगणवाडीलाही भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन केले.

आमदाबाद तांडा येथेही हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जागतिक हात धुवा दिनानिमित्त आमदाबाद तांडा येथेही विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी यू. डी. तोटावाड, मिलिंद व्यवहारे, बायजाबाई देवराव पवार, इंदुबाई मधुकर पवार, काशाबाई दुर्गम, शिक्षिका भारतीबाई चंदर राठोड, अंगणवाडी कार्यकर्ती प्रतिभा लक्ष्मीकांत पांचाळ, पोलीस पाटील सुमनबाई शेषेराव चव्हाण, प्रियंका उदय चव्हाण, ज्योतीबाई कृष्णा राठोड, रंगराव सिताराम पवार, परसराम भजनु आडे, अशोक भिकु पवार, बालाजी गोविंद राठोड आदी उपस्थित होते.

***









 वृत्त क्रमांक

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

नांदेड(जिमाका), दि. 15: भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा सांख्यिकी अधिकारी अर्जुन झाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न तरुणाईच्या मनात रुजविणारे आणि आयुष्यभर वाचनाची आवड जोपासणारे डॉ. कलाम यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले.

‘सततच्या वाचनातून बुद्धीचा विकास होतो,’ असे प्रतिपादन जिल्हा सांख्यिकी अधिकारी अर्जुन झाडे यांनी केले. नायब तहसीलदार सुनंदा कऱ्हाळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत दररोज अवांतर वाचन करून ज्ञानात भर घालावी आणि जीवन समृद्ध करावे, असे आवाहन केले. यावेळी माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्याससंचांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांत्रिक सहायक प्रताप सूर्यवंशी यांनी केले. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून एस. के. शहाणे, श्रीनिवास इज्जपवार, संजय पाटील, अजय वट्टमवार, शंकर पवार, रोहित सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***




 वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात 17 व 18 ऑक्टोबरला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’

• विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 15: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी

आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. बाहेर असताना जवळपास सुरक्षित इमारत नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे बंद करावीत. विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात उभे असल्यास तातडीने पाण्याबाहेर पडावे.

या गोष्टी कटाक्षाने टाळा

विजांच्या कडकडाटादरम्यान घरातील दूरध्वनीचा वापर, शॉवरखाली अंघोळ करणे, नळ किंवा पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करणे तसेच विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. वादळी वाऱ्यांसह वीज चमकत असताना धातूंच्या आधारावर उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये. उंच झाडाखाली किंवा उंच धातूच्या मनोऱ्याजवळ थांबू नये. घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहणेही धोकादायक असल्याने ते टाळावे.

हवामानातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. शेतकरी, शेतमजूर, प्रवासी आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

***

वृत्त क्रमांक

 जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी 22 ऑक्टोबरपासून ‘खेत बचाओ अभियान’

• 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यभर जनजागृती; संतुलित खत वापर, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीवर भर

• अभियान लोकचळवळ म्हणून राबवा

नांदेड(जिमाका), दि. 15: जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाकडून विभागीय व जिल्हास्तरीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

या अभियानांतर्गत माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर, पीक विविधीकरण, पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विद्यापीठांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्यात येतील.

अभियानाच्या माध्यमातून तेलबिया, कडधान्ये आणि फलोत्पादन पिकांना प्रोत्साहन देण्यासह भात कापणीनंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्राचा कार्यक्षम वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच पीक अवशेष व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून पराटी व पेंढा जाळण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यात येणार आहे. सेंद्रिय व नैसर्गिक निविष्ठांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबतही प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित केली जातील.

अभियानाच्या कालावधीत शेतकरी मेळावे, प्रक्षेत्र भेटी, प्रशिक्षण कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर, खतांचा संतुलित वापर, जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण व साठवणूक, तसेच ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेचा प्रसार करण्यात येईल. यासोबतच शेतकरी ओळखपत्र तयार करणे व अद्ययावत करणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग वाढविणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी हे अभियान लोकचळवळ म्हणून राबवून शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आणि शेती अधिक शाश्वत बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

वृत्त क्रमांक

‘चारा मित्र’ संकल्पनेतून पशुधनासाठी चारा सुरक्षितता; पशुपालकांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कमी पाण्यात, लवकर येणाऱ्या चारा पिकांचे बियाणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देणार

नांदेड (जिमाका), दि. १४ : अल्-निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाईची शक्यता असून आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘चारा मित्र’ ही संकल्पना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वतःच्या शेतात पाण्याची उपलब्धता असलेल्या आणि चारा पिकांची लागवड करण्यास इच्छुक व्यक्तींना प्रशासनामार्फत कमी पाण्यात व लवकर येणाऱ्या चारा पिकांच्या वाणांचे बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक पशुपालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. चारा लागवडीसाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘चारा मित्र’ म्हणून नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले आहे.

अतिरिक्त चाऱ्याचा इतर पशुपालकांना होणार उपयोग

‘चारा मित्र’ संकल्पनेअंतर्गत लागवड करण्यात आलेल्या चाऱ्याचा प्रथम संबंधित पशुपालक आपल्या पशुधनासाठी वापर करू शकतील. त्यानंतर उपलब्ध होणारा अतिरिक्त चारा गरजू पशुपालकांच्या पशुधनासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास तसेच संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात १८२ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत असून या दवाखान्यांमार्फत पशुपालकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी विलंब न करता संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून नोंदणी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पशुधन विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने पशुधन विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचे अनुदान शासनाकडून, तर उर्वरित १५ टक्के रक्कम संबंधित पशुपालकाने भरावयाची आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्ती अथवा दुष्काळामुळे पशुधनाची हानी झाल्यास विम्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

सीएसआरच्या माध्यमातून पशुधन विम्यासाठी सहकार्याचे आवाहन

सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अनेक उद्योग, संस्था व व्यक्ती विविध सामाजिक उपक्रमांना मदत करण्यास इच्छुक असतात. अशा उद्योग व संस्थांनी सीएसआर निधीतून गावातील पशुपालकांच्या पशुधनाचा विमा उतरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

कंधार तालुक्यातील बहादूरपुरा येथे एका कुटुंबाने संपूर्ण गावातील पशुधनाचा एक वर्षाचा विमा उतरवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला होता. या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली होती. त्याच धर्तीवर इतर गावांमध्येही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

३० ऑक्टोबरच्या सीएसआर कार्यशाळेत होणार नियोजन

जिल्ह्यातील सीएसआरच्या माध्यमातून कार्यरत उद्योग, संस्था व संबंधित घटकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. दि. ३० ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीएसआर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळेत पशुधन विमा तसेच ‘चारा मित्र’ संकल्पनेसाठी सीएसआरच्या माध्यमातून करता येणाऱ्या सहकार्याबाबत नियोजन करता येणार आहे.

संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘चारा मित्र’ उपक्रमात सहभागी होऊन चारा लागवडीसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांनी तसेच सर्व पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यांशी तातडीने संपर्क साधून नोंदणी करावी आणि पशुधन विमा योजनेचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

***






महात्मा जोतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्...