Saturday, October 24, 2026

 दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य


चारा साक्षरता अभियानांतर्गत दूध उत्पादकांशी थेट संवाद; शास्त्रीय पद्धतीने चारा निर्मिती व साठवणुकीचे आवाहन


नांदेड, दि. २४ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध करून देणे आणि आगामी चारा टंचाईचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चारा साक्षरता अभियान राबविले आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत आज सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान आनंदनगर, देगलूर नाका व सिडको परिसरात दूध विक्रीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक व पशुपालकांशी थेट संवाद साधण्यात आला.

यावेळी दुष्काळाची स्थिती, पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि आगामी काळातील गरज याबाबत माहिती घेऊन चारा व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुदखेड तालुक्यातील पाथरड, कामळज, देवापूर; नांदेड तालुक्यातील पुयडवाडी, पुणेगाव, वांगी, सिद्धनाथ, तुप्पा, नागापूर, गाडेगाव, पावडेवाडी, वडगाव, पिंपळगाव मिश्री, नाळेश्वर; लोहा तालुक्यातील शंभरगाव; उमरी तालुक्यातील सिंधी आणि नायगाव तालुक्यातील गोदमगाव येथील दूध उत्पादक व पशुपालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.


पीक अवशेषांचा पशुखाद्यासाठी वापर


सोयाबीन कुटार, हरभरा कुटार व गव्हाचे काड यांसारख्या पीक अवशेषांवर युरिया-मोलॅसिस प्रक्रिया करून त्यांची पोषणमूल्ये वाढविण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. तसेच कमी खर्चातील हायड्रोपोनिक्स व अझोला तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा, तर हिरवा मका व नेपिअर गवतापासून मुरघास तयार करून टंचाईच्या काळात त्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

“सोयाबीन कुटार जाळू नका, पशुधनासाठी वापरा!” असे आवाहन करत पीक अवशेषांचा योग्य वापर व चाऱ्याची शास्त्रीय पद्धतीने साठवणूक करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.


संकरित ज्वारीच्या बियाण्यांचे १०० टक्के अनुदानावर वाटप


रब्बी हंगामात चारा उत्पादनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत संकरित ज्वारीच्या बियाण्यांचे १०० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पशुपालकांना देण्यात आली. इच्छुक लाभार्थ्यांचे ऑनलाइन अर्जही यावेळी भरून घेण्यात आले. या योजनेची ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धी करून अधिकाधिक पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

पशुपालकांनी प्रथम आपल्या पशुधनासाठी आवश्यक चारा सुरक्षित ठेवून अतिरिक्त चारा उत्पादनाचे नियोजन करावे. उपलब्ध अतिरिक्त चारा शासनास पुरवठा करण्यासाठीही पुढाकार घ्यावा, असे सूचित करण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण, चारा उपलब्धतेचे नियोजन आणि दूध उत्पादकांच्या अडचणींचे निराकरण यासाठी प्रशासन व पशुसंवर्धन विभागाकडून थेट संवाद आणि मार्गदर्शनावर भर देण्यात येत आहे.

*******






 दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या अवैध सावकारांवर कठोर कारवाई-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


तक्रारींची तात्काळ दखल घेण्याचे निर्देश

नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी करण्याचे आवाहन


नांदेड, दि. २४ : जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अवैध सावकारांकडून चढ्या व्याजदराने कर्जवाटप करून जबरीने वसुली केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. प्राप्त तक्रारींची प्रकरणनिहाय तपासणी करून अवैध सावकारी करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड तसेच सर्व तालुक्यांचे सहायक निबंधक, सहकारी संस्था उपस्थित होते.

बैठकीत प्राप्त तक्रारींचा प्रकरणनिहाय आढावा घेण्यात आला. तक्रारींची तात्काळ पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या अवैध सावकारांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. या कारवाईसाठी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून सहकार विभागास आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


अवैध सावकारीविरोधात निर्भयपणे तक्रार करा


दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोणताही सावकार चढ्या व्याजदराने कर्ज देत असेल किंवा कर्जाच्या वसुलीसाठी दबाव, धमकी अथवा जबरदस्ती करीत असेल, तर नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा भीतीला बळी पडू नये. अशा प्रकरणांची तक्रार तालुकास्तरावर सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे अथवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांच्या कार्यालयात करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. प्राप्त तक्रारींची महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ नुसार पडताळणी करण्यात येऊन, पडताळणीनंतर अवैध सावकारी आढळल्यास संबंधित सावकाराविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांचे अवैध सावकारीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी अवैध सावकारीच्या घटना निदर्शनास आल्यास तत्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

*******



 नांदेडमध्ये रेशीम शेतीला चालना-

शेतकऱ्यांची प्रलंबित कामे प्राधान्याने निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश

तुती लागवड व कीटक संगोपन गृहासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

७० शेतकऱ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण


नांदेड, दि. २४ : नांदेड जिल्ह्यात रेशीम शेतीला मोठी संधी असून, दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून या व्यवसायाला चांगला प्रतिसाद दिला आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना वर्षातून दोन वेळा उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. रेशीम शेतीशी संबंधित अनुदान तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित विभागांना दिले.

येथील जिल्हा रेशीम कार्यालय आणि भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (SBI RSETI) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी व उपाययोजनांबाबत आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात रेशीम शेतीला मोठा वाव आहे. दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे. रेशीम शेतीतून वर्षातून दोन वेळा उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहावे. तुती लागवड, कीटक संगोपन गृह तसेच संबंधित योजनांचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व प्राधान्याने काम करावे,असे त्यांनी सांगितले.

रेशीम शेती फायदेशीर असून, योग्य व्यवस्थापन व नियोजन केल्यास एका एकरातून शेतकऱ्याला वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.


शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने कार्यवाहीचे निर्देश


या बैठकीस जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सुमारे २०० रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यापैकी प्रत्येक तालुक्यातील दोन प्रातिनिधिक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद घेत संबंधित विभागांना त्यावर तातडीने कार्यवाही करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.


७० शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे


भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून रेशीम शेतीचे दहा दिवसांचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या दोन प्रशिक्षण तुकड्यांतील एकूण ७० शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच रेशीम शेतीच्या नवीन प्रशिक्षण तुकडीचे उद्घाटनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी अशोक वडवळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध रेशीम विकास योजनांची माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी कृषी विभागामार्फत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सहकार्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक कैलास जायभाये, एचआयएमडब्ल्यूपीचे प्रकल्प समन्वयक दिनेश खडसे, ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक विजय गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसबीआय आरसेटीचे संचालक कैलास जायभाये यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा रेशीम कार्यालय व एसबीआय आरसेटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये एसबीआय आरसेटीचे आशिष कुमार राऊत, रेशीम कार्यालयाच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कांचन जाधव, तांत्रिक सहाय्यक नरोजी कोरके, अभय कुलकर्णी, दत्ता भुस्कटे, संतोष साळुंखे तसेच प्रगतिशील शेतकरी रत्नाकर ढगे सायाळकर यांच्यासह संबंधितांनी योगदान दिले.

********









 दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य चारा साक्षरता अभियानांतर्गत दूध उत्पादकांशी थेट संवाद; शास्त्रीय पद्धतीने चारा ...