Tuesday, July 7, 2026
सहकार विभागाने प्रकाशित केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' माहिती पुस्तिकेमध्ये कर्जमुक्ती योजनेसंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना, पात्रता, कार्यपद्धती आणि कर्जमुक्ती लाभ मिळविण्याची काय प्रक्रिया असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे.
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना – २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबत राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
वृत्त क्रमांक
87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, दि. 7 जुलै : 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत आजपासून विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) या मोहिमेअंतर्गत सर्व मतदान भागनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, हडको येथील फिरदोस मशीद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये पात्र मतदार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व EF फाॅर्म भरून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मतदान यादी अधिकाधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी नांदेड तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार नांदेड तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारीअविनाश शिंगारे यांनी कॅम्पला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, बीएलओ तसेच नागरिकांशी संवाद साधत मतदार नोंदणीची प्रक्रिया पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.EF वाटप, संकलन व डिजिटायझेशन स्पीड अप करण्यासाठी सूचना दिली आहे.
मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी नांदेड तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले.
000000
वृत्त क्रमांक
बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बोनाफाईड प्रमाणपत्र निर्गमित करताना नियमांचे काटेकोर पालन करा : सहायक कामगार आयुक्त
नांदेड दि. 7 जुलै :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना विविध शैक्षणिक अर्थसहाय्य व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. सदर योजनांचा लाभ देताना विद्यार्थ्यांचे बोनाफाइंड प्रमाणपत्र हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सदरची शिष्यवृत्ती योजना ही प्रथम वर्गापासून ते डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅजुएशन या वर्गातील बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना देण्यात येते. अलीकडे काही प्रकरणांमध्ये बनावट/फेरफार केलेली (Forged/Fake) बोनाफाईड प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करून बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याबरोबरच पात्र बांधकाम कामगार यांच्या पाल्यांऐवजी अपात्र पाल्यांना लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होत असल्याने सर्व शाळा, कॉलेज, विद्यापीठ ई. यांनी बोनाफाईड सर्टिफिकेट निर्गमित करताना पुढील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन असे सहायक कामगार आयुक्त, आशिष ढवळे यांनी केले आहे.
मार्गदर्शक सूचना
बोनाफाईड प्रमाणपत्र केवळ संस्थेच्या अधिकृत लेटरहेड वरच निर्गमित करावे. प्रमाणपत्रावर निर्गमांक (Outward No.), दिनांक, संस्थेचा शिक्का व प्राचार्य/मुख्याध्यापक/सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे अनिवार्य राहील. प्रत्येक प्रमाणपत्राला युनिक क्रमांक (Unique Certificate Number) देण्यात यावा. शक्य असल्यास QR Code किंवा Verification Code नमूद करून ऑनलाइन पडताळणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. निर्गमित केलेल्या सर्व बोनाफाईड प्रमाणपत्रांची नोंद स्वतंत्र रजिस्टर अथवा डिजिटल प्रणालीमध्ये जतन करावी. शिष्यवृत्ती अर्जासाठी मागविण्यात आलेले बोनाफाईड प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या अद्ययावत प्रवेश नोंदीच्या आधारेच निर्गमित करण्यात यावे. बोनाफाईड प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर ८९७५९७६९४९ त्याची एक प्रत या मोबाइल क्रमांकावर whatsapp करावी, किंवा कार्यालयाच्या acInanded@gmail.com या ईमेल वर मेल करावा. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अथवा कामगार विभागाकडून पडताळणीसाठी माहिती मागविल्यास ती ७ दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी. संशयास्पद किंवा बनावट प्रमाणपत्र आढळल्यास त्याबाबत संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त, नांदेड यांना तात्काळ कळवावे.
जाणूनबुजून खोटे प्रमाणपत्र देणे, त्यास मदत करणे किंवा अशा कृत्यात सहभागी होणे हे कायद्याने दंडनीय असून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार कारवाईस पात्र राहील.
सर्व शैक्षणिक संस्थांनी या सूचनांची माहिती संबंधित कर्मचारी, विद्यार्थी व पालकांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
विशेष सूचना
कामगार विभागाकडून वेळोवेळी सादर करण्यात आलेल्या बोनाफाईड प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल. पडताळणीदरम्यान चुकीची माहिती, बनावट प्रमाणपत्र किंवा फसवणूक आढळल्यास संबंधित विद्यार्थी, अर्जदार, मध्यस्थ तसेच संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करण्यात येईल, असे सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी सांगितले.
00000
वृत्त क्रमांक
राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात 110 शिकाऊ उमेदवारांची भरती
नांदेड, दि. 7 जुलै : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड विभागामार्फत सन २०२६–२७ या द्वितीय सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये 1 वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice Trainee) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून एकूण 110 पदे भरण्यात येणार आहेत. व्यवसायनिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
मेकॅनिक मोटार व्हेईकल -40, मेकॅनिक डिझेल -44, शीट मेटल वर्क्स – 08, ऑटो इलेक्ट्रिशियन – 05, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर – 02, पेंटर (जनरल) – 03, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – 06, टर्नर –02 तसेच अभियांत्रिकी पदवी/पदविका – ०२ अशी एकूण १५० पदे आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षित राहतील.
आय.टी.आय. किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तसेच ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी प्रथम www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर स्वतःचे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विहित नमुन्यातील छापील अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील छापील अर्ज आस्थापना शाखा, विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, असदुल्लाखान टेकडी, रिजनल वर्कशाप समोर, नांदेड येथे दिनांक 8 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील व तात्काळ स्वीकारले जातील.
छापील अर्जाची किंमत (जीएसटी सह) खुल्या प्रवर्गासाठी ५९० रुपये असून मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी वैध जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यास २९५ रुपये इतकी राहील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन रा.प. महामंडळ नांदेड विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000
वृत्त क्रमांक
एसआयआर प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
माध्यमानी मोहिमेची व्यापक जनजागृती करावी
नांदेड, दि. 7 जुलै : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 अंतर्गत जिल्ह्यात 30 जूनपासून बूथस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून गणना पत्रके भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ही मोहीम विहित मुदतीत पूर्ण करण्यात येईल. या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माध्यमांनी या मोहिमेबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन घरोघरी पडताळणीसाठी येणाऱ्या बीएलओंना आवश्यक माहिती द्यावी. मोहिमेला वेग आला असून मतदारांच्या सहकार्यामुळे ती अधिक प्रभावीपणे पूर्ण होईल.
या मोहिमेत जिल्हाधिकारी, मतदान नोंदणी अधिकारी आणि इतर अधिकारी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन गणना पत्रके भरणे व त्यांचे डिजिटायझेशन करण्याचे काम करत आहेत. यासाठी जिल्ह्यात 3,088 बीएलओ, 310 बीएलओ पर्यवेक्षक, 90 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि 9 मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त बीएलओंचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य राजकीय पक्षांनी 10,909 बूथस्तरीय एजंट (BLA) नियुक्त केले आहेत.
गणना पत्रकाचे मॅपिंग किंवा डिजिटायझेशन करताना तांत्रिक अडचणी आल्यास मतदारांनी घाबरून न जाता संबंधित बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. 2002 च्या विशेष सखोल पुनरिक्षणातील मतदारांनी केवळ माहितीची पडताळणी करून गणना पत्रक जमा करायचे आहे. पात्र मतदारांना गणनापत्रक भरण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत एसआयआर मोहिमेची प्रभावी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. मतदार यादी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत पात्र मतदारांचे नाव कायम ठेवले जाईल, तर मृत, दुबार किंवा स्थलांतरित मतदारांची नावे नियमानुसार वगळली जातील, असे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी स्पष्ट केले.
डिजिटायझेशन दरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी बीएलओमार्फत तातडीने सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
०००००
वृत्त क्रमांक
अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीतून विद्यार्थी ठरणार अपात्र ; नियम कडक
नांदेड दि. 7 जुलै:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजना सन २०१८-१९ पासून ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविली जाते. तथापि उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतांना घाईगडबडीत किंवा तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. तांत्रिक कारणास्तव जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडला, तर त्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच अनेक विद्यार्थी बारावी उतीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी किंवा कृषी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करतात.
मात्र, प्रवेश प्रक्रियेत अपेक्षित जागा न मिळाल्यास किंवा गॅप टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बीए, बिएससी किंवा बिकॉम सारख्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. याच काळात विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि त्यांना लाभही मिळतो. परंतु पुढील शैक्षणिक वर्षात जेंव्हा या विद्यार्थ्यांची निवड प्रत्यक्ष हव्या असणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (उदा.अभियांत्रिकी,पॉलीटेक्निक) होते, तेंव्हा तांत्रिक नियमामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळणे कठीण होते. नियम असा आहे कि, एकदा शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला अभ्यासक्रम पूर्ण न करता अर्धवट सोडल्यास नवीन अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरतो.
वित्तीय नियमांची अडचण :- शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होत असते. एकदा ही रक्कम जमा झाल्यावर, ती पुन्हा शासनाला परत करण्यासाठी कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत. परिणामी एकदा चूक झाल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ कायमचा गमवावा लागतो, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी किंवा कार्यालयाशी चर्चा करावी :- जर विद्यार्थी भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणार असाल आणि सध्या केवळ बॅकअप म्हणून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापूर्वी महाविद्यालयास किंवा कार्यालयास चर्चा करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना2026 #महाराष्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
विद्या र्थ्यांनी निरोगी आरोग्य , संतुली त आहार या कडे लक्ष द्यावे - डॉ. सुर्यवंशी नांदेड , दि. 6 :- निरोगी मन , शांत झोप...



