Monday, March 30, 2026

वृत्त क्रमांक  378

मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित 

नांदेड दि. 30 मार्च:- क्रीडा व युवक सेवा संचालनालयमार्फत राज्यातील विकासाकरीता “मिशन लक्ष्यवेध” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.  या चाचणीमध्ये विविध क्रीडा प्रकारांतील होतकरू व गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळांडूना करीअर मार्गदर्शन खेळांडूच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित  करणे अभिप्रेत आहे. उपरोत घटक विकसीत करण्याकरीता आवश्यक प्रयत्न हे फक्त राज्यस्तरावरून नव्हे तर जिल्हास्तरावरून देखील होणे अपे‍‍क्षित आहे. त्या करीता नांदेड जिल्हयास मिशन लक्ष्यवेध या योजने अंतर्गत जिल्हास्तरावर प्रतिभा विकास केंद्र नांदेंड करीता टेबल टेनिस, बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, ॲथलेटीक्स या पाच क्रीडाप्रकारांचे खेळांची केंद्र सुरू करावयाची आदेश प्राप्त झाले होते. परंतू 29.03.2026 रोजी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या ऑनलाइन बैठकीतील चर्चा नुसार आर्चरी, हॉकी व ॲथलेटीक्स या खेळांचे  जिल्हा क्रीडा संकूल येथे  या खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा प्रतिभा केंद्र अंतर्गत आर्चरी, हॉकी व ॲथलेटीक्स खेळ रदद करण्यात आलेले आहेत. याची नोंद घ्यावी.

सदर निवड प्रक्रियेदरम्यान खेळाडूंची शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य, मानसिक तयारी तसेच खेळातील कामगिरी यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.  अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञांच्या उपस्थितीत ही निवड चाचणी पार पडणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना उच्चस्तरीय प्रशिक्षण देणे व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार करणे हा आहे.                                                                                                                          

खालील प्रमाणे निवड चाचणी ठिकाण व खेळप्रकार नमुद करण्यात आलेले आहेत.

1) टेबल टेनिस  2) बॅडमिंटन या खेळाची निवड चाचणी दि.02/04/2026 वेळ स.10.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड  संपर्क क्रं. चंद्रप्रकाश होनवडजकर (रा.क्री.मा.) मो.7972953141, हानमंत नरवाडे मो.9604866253.

खेळाडू निवड चाचणीचे निकष व पात्रता- (1).वयोमर्यादा 21 वर्षाआतील मुले/मुली त्यावर्षाच्या 31 डिसेंबर रोजी)       (2) जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्डे,गत 02 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 03 फोटोग्राफ, शाळा महाविद्यालयीन बोनाफाईड प्रमाणपत्र, पालंकाचे संमतीपत्र इ. (3.) महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. (4) क्रीडा कामगिरी- किमान राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू) (शालेय/संघटना अधिकृत स्पर्धा) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुस्ती फिटनेस चाचण्यामध्ये पात्र होणे आवश्यक आहे. (5) शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकिय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे.वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी संबंधित आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी सुचविले आहे अधिक माहितीसाठी चंद्रप्रकाश होनवडजकर राज्य क्रीडा मार्गदर्शक- मो.7972953141 यांचेशी संपर्क साधावा.  

00000

वृत्त क्रमांक  377

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड दि. 30 मार्च :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 व 31 मार्च 2026 तसेच 1 व 3 एप्रिल 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक  376

इयत्ता 10 वी व 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 30 मार्च :- नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार या पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकद्वारे अर्ज/प्रस्ताव ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

माध्यमिक (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, राज्य मंडळ, पुणे यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून ते विभागीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. यासाठी सर्व प्रस्ताव 15 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज भरताना काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच क्रीडा गुण प्रस्ताव सादरीकरणाबाबत अडचण असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जर कागदपत्रे अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण असल्यामुळे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आला, तर संबंधित विद्यार्थी, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी घ्यावी. संबंधित शाळा व महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन करावे.

जिल्ह्यातील एकही पात्र खेळाडू क्रीडा सवलतीपासून वंचित राहू नये यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

०००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...