Wednesday, June 26, 2024

 वृत्त क्र. 533

प्रत्येक स्टॉलवर लोकराज्य अंक उपलब्ध

 

 विद्यार्थी, अभ्यासक व शाळांनी मागणी करावी

 

नांदेड, दि. 26 :- राज्य शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे शासकीय योजना व महत्वाची माहिती देणारे मासिक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असलेले लोकराज्य नव्या जोमाने प्रसिध्द होणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी, अभ्यासक, लेखक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपला अंक राखून ठेवावा , असे आवाहन  जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.

 

आज पहाटे नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी पवार, राज्य संघटनेचे कार्यकारी सदस्य चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार सह पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोकराज्यचा अंक प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांना सहज खरेदी करणे शक्य होवून उपलब्ध होईल. यासाठी सर्व वितरकांनी आपल्या स्टॉलवर लोकराज्य अंक विक्रीसाठी ठेवावा,असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.

 

लोकराज्य हे मासिक सर्वासाठी उपयोगी असून यात राज्य शासनाने घेतलेले धैयधोरणे, सर्व सामान्यांसाठी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळातील निर्णय, विशेष प्रसंगावर आधारित विशेषांकात सखोल माहिती असलेले लेख,पर्यटनावरील माहिती अशा अनेक विषयावर आधारित माहितीचा संग्रह खात्रीशीर आकडेवारीसह प्रसिध्द करण्यात येतो. जुलै महिन्याचा विशेष अंक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील विशेषांक आहे.

या मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रुपये असून या वर्गणीमध्ये वर्षभर 12 अंक वर्गणीदारांना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येतो. वर्गणी भरण्यासाठी आता आपल्या घरी येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे देखील वर्गणी दिली जाऊ शकते. शहरातील प्रमुख बुक स्टॉलवर हे अंक उपलब्ध असतील. तसेच जिल्हा माहिती कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये अंक नोंदणीसाठी संपर्क साधला जाऊ शकतो.

 

कार्यालयाशी संपर्क साधा

या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. या कार्यालयाचा पत्ता-जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपुरा नांदेड असा आहे. अधिक माहितीसाठी लोकराज्य समन्वयक काशिनाथ आरेवार (मो. क्र. मोबाईल नंबर 9422350213 यावरही संपर्क साधता येईल.

 

प्रमुख स्टॉलवर उपलब्ध

तसेच नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक स्टॉलवर हा अंक आता फक्त 10 रुपयांस मिळणार असून वार्षिक वर्गणी भरून वर्गणीदार होण्यासाठी या कार्यालयात येवून 100 रुपये वर्गणी भरावी लागेल. या 100 रुपयांची शासकीय पावतीही वर्गणीदारांना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आतापर्यत अनेक मोठया पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षा देताना लोकराज्यचा अंक नियमित वाचत असल्याचे त्यांच्या अनुभवात नमुद केलेले आहे.

 

तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याला घरपोच लोकराज्य मागा !

नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी लोकराज्य घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. केवळ शंभर रुपयांच्या वर्गणीमध्ये वर्षभर अंक घरपोच येऊ शकतो.आपल्या घरी वृत्तपत्र टाकणाऱ्या विक्रेत्याकडे शंभर रुपयाची पावती घेऊन आपली नोंद करू शकता. आपल्या विक्रेत्याकडे आपल्यापर्यंत अंक पोहोचवले जाईल, असे आवाहन वृत्तपत्र विक्री संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार यांनी केले आहे. घरपोच अंकासाठी चंद्रकांत घाटोळ ( मो.क्र. 7020345110) यांच्याशी संपर्क साधावा.

00000








 वृत्त क्र. 532

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप

नांदेड दि. 26 :- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्रीचे (क्रिटीकल इनपुट किट) चे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.
 
यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) भाऊसाहेब बऱ्हाटे, व्यवस्थापक नाबार्ड दिलीप दमयावार, जिल्हा कृषि अधिकारी जिल्हा विजय बेतीवार, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प) तथा प्रकल्प उपसंचालक (आत्मा), अनिल शिरफुले, तालुका कृषि अधिकारी, एस. बी. मोकळे, कृषि सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सी डी कदम व आत्माचे श्रीहरी बिरादार व नंदीग्राम शेतकरी उत्पादक कंपनीचे संदीप डाकुलगे, के-फर्टस लॅबचे बी. बी. पेंडकर व नांदेड तालुक्यातील मौजे. तळणी येथील आत्महत्याग्रस्त कुटूंबीय उपस्थित होते.
 
आत्महत्याग्रस्त कुटूंबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्री पिक प्रात्यक्षिक अंतर्गत (0.40 हेक्टरसाठी उच्चतम अनुदान मर्यादा चार हजार रुपये प्रति लाभार्थी/ प्रति प्रात्यक्षिक याप्रमाणे आहे. तसेच विविध आधुनिक कृषीतंत्रज्ञानाचा (जैविक, नैसर्गिक इ.) प्रचार व प्रात्य़क्षिक राबविण्याच्या विस्तार कार्यक्रमाच्या योजनासाठी जैविक किटकनाशके व खते तयार करण्याच्या सोप्या पद्धती शेतकऱ्यांना समजावून सांगणे. तसेच त्यांचा प्रचार व प्रसाराचे विस्तार कार्य करण्यात येणार आहे.
 
आत्महत्याग्रस्त कुटूंबांना प्रोम निर्मिती (पालाशयुक्त सेंद्रीय खत), जैविक कीटकनाशके इ. घरच्या घरी करुन शेतीचा खर्च कमी करणे व काही प्रमाणात उत्पादनाची साधने निर्माण करण्याची आत्मा मधून प्रात्याक्षिक कीट देवून मार्गदर्शन करण्यात येत आहे असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) भाऊसाहेब बऱ्होट यांनी सांगितले.
 
या कृषि निविष्ठामध्ये कंपोस्ट खत, निम पावडर तयार करणे, निमार्क तयार करणे व बीबीएफची निवड करणे याबाबी शेतकरीस्तरावर करण्यात येणार आहेत व फॉस्‍फेटीक खत, खत विरघळण्यासाठी व शेणखत कुजविण्यासाठी जिवाणू, लाईट ट्रॅप, एनपीके जीवाणू, बीव्हीएम कल्चर व सापळा पिके इ. निविष्ठांचा आवश्यकता आहे. या निविष्ठांचा पुरवठा आत्महत्याग्रस्त कुटूंबांतील शेतकरी यांना करण्यात येवून शेतकऱ्यांना उत्पादन प्रक्रिया व कार्यक्षम वापराबाबत मोफत मार्गदर्शन सुध्दा करण्यात येणार आहे.
 
सार्वभौम ग्रामसभा अंतर्गत शेतकरी आत्महत्या झालेल्या गावांमध्ये ग्राम जयंती महोत्सव साजरा करुन सक्षम ग्राम निर्मितीसाठी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा), क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची गावभेट दौऱ्याअंतर्गत 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान झालेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सक्षम ग्राम निर्मितीसाठी चला जाऊ गावाकडे कार्यक्रम राबविण्यासाठी आत्मा अंतर्गत खरीप हंगामासाठी जिल्ह्यामध्ये 63 गावामधून 335 आत्महत्याग्रस्त कुटूंब आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आत्मा यंत्रणेमार्फत जिल्हयांतर्गत प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी येथे 29 एप्रिल 2024 व सगरोळी येथे 3 मे 2024 रोजी संपन्न झाले.  त्यामध्ये त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.
00000





वृत्त क्र. 531

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी

मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करण्याचा कृषी तज्ञांचा सल्ला 

नांदेड, दि. २६ : जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू  नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. अद्यापही पेरणी करण्याचे दिवस गेलेले नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र जमिनीत चांगले पाणी मुरल्याशिवाय उत्तम पाऊस झाल्याशिवाय अशा पद्धतीचे धाडस करणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे कृषी तज्ञाच्या सल्ल्यावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अजूनही पेरणीसाठी वाट बघितली जाऊ शकते. तूर्तास पेरणी करू नका,असे आवाहन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यात नायगाव, उमरी, हदगाव, भोकर, देगलूर, माहूर, हिमायतनगर आदि तालुक्यामध्ये अद्यापही 100 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याची सरासरी देखील फार अधिक नाही. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार किमान 100 मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणीचा विचार करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला पावसाची आणखी प्रतीक्षा आहे.

काल मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील हवामान खात्याचा दाखला देत यावर्षी सरासरीपेक्षा उत्तम पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. दमदार पाऊस लवकरच येईल त्यानंतरच पेरणीला हात लावावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन केले आहे.

000

वृत्त क्र. 530

बिज प्रक्रिया संच अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 26 :- शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ / कंपनीने बँकेकडे प्रस्ताव सादर करावीत. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर शेतकरी उत्पादक संघ / कंपनी (एफपीओ/एफपीसी) अनुदानास पात्र राहतील. तालुका कृषि  अधिकाऱ्याकडे 31 जुलै पर्यत अर्ज सादर करता येतील. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा एकदाच लाभ दिला जाणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 

कृषि विभागाच्यावतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके सन 2024-25 मध्ये स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) साठी बीज प्रक्रिया संचचा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहून शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत प्रमाणित बियाणे उत्पादक करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांना बिज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी यंत्र सामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 529

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी   

नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी  मुदतवाढ 18 जून 2024 ते 1 जुलै 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी 1 जुलै पर्यंत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन सचिव अनुराधा ओक यांनी  केले आहे. 

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा  तपशील पुढील प्रमाणे आहे. ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी 18 जून ते 1 जुलै 2024 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर गुरुवार 20 जून ते 5 जुलै 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. सोमवार 12 जुलै 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

00000

वृत्त क्र. 528

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम 

नांदेड दि. 26 :- कृषि विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2024-25 अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकंडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझायीन / स्पेसिफीकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 31 जुलै 2024 पर्यंत सादर करावेत. 

या योजनेंतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही व ज्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येतो अशा परिसरात अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. 

अटी व शर्तीच्या आधीन राहुन इच्छूक शेतकरी उत्पादक संघ / कंपनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा. सदर प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत आहे. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील. 

या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे. अपुर्ण बांधकाम, मंजूर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषि माल साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 527

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान 

नांदेड, दि. 26 :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीस आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. 

या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. सुरवातीला आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा असा होता. या दिंडीत आमदार बालाजी कल्याणकर, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी, विविध शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. सामाजिक न्याय दिनानिमित्त आमदार बालाजी कल्याणकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

सामाजिक न्याय भवनात व्याख्यान संपन्न 

सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक सभागृह, सामाजिक न्याय भवन नांदेड येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात “छत्रपती राजर्षी शाहू महाराज वसा आणि वारसा” या विषयावर प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख यांनी मार्गदर्शन केले.  सामाजिक न्यायाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपल्या पासून केली पाहिजे. आपण ज्या पदावर आहोत त्या पदाला न्याय देता आला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविध विचार पैलु व कार्यावर सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षीत सामाजिक न्याय, समता बंधुता अधिक सक्षम होण्यासाठी सर्वानी जोमाने कार्य करण्याचा संकल्प केला.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी बापु दासरी हे होते. तर कार्यक्रमाचे आयोजक सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे हे तर प्रमुख पाहूणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, समाजभुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे, यु.एस. ढाणकीकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल सावंत हे होते. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी डी.वाय पंतगे, विचारवंत प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख हे उपस्थित होते. सामाजिक न्याय दिनानिमित्त निबंध व वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्राप्त मधुबाला संजय भोळे व नंदिनी भास्कर लोणे या विद्यार्थीनींना धनादेश देवून सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिनानिमित्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना यावेळी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी तर सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 

ooo




वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...