Wednesday, June 26, 2024

वृत्त क्र. 531

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी

मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करण्याचा कृषी तज्ञांचा सल्ला 

नांदेड, दि. २६ : जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू  नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. अद्यापही पेरणी करण्याचे दिवस गेलेले नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र जमिनीत चांगले पाणी मुरल्याशिवाय उत्तम पाऊस झाल्याशिवाय अशा पद्धतीचे धाडस करणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे कृषी तज्ञाच्या सल्ल्यावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अजूनही पेरणीसाठी वाट बघितली जाऊ शकते. तूर्तास पेरणी करू नका,असे आवाहन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यात नायगाव, उमरी, हदगाव, भोकर, देगलूर, माहूर, हिमायतनगर आदि तालुक्यामध्ये अद्यापही 100 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याची सरासरी देखील फार अधिक नाही. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार किमान 100 मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणीचा विचार करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला पावसाची आणखी प्रतीक्षा आहे.

काल मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील हवामान खात्याचा दाखला देत यावर्षी सरासरीपेक्षा उत्तम पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. दमदार पाऊस लवकरच येईल त्यानंतरच पेरणीला हात लावावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन केले आहे.

000

No comments:

Post a Comment

 माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल,  व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार   छत्रपती संभाजीनगर दि.२(जिमाका)- माह...