Wednesday, February 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित

तर 17 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 143 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 744 एवढी झाली असून यातील 99 हजार 982 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 72 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे लोहा 2, भोकर 1, हदगाव 1, माहूर 3, मुखेड 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 8 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 17 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 56, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 72 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 72 हजार 214

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 52 हजार 562

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 744

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 982

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.31 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-72

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 27 फेब्रुवारी ला मराठी भाषा गौरव दिन 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- अवघ्या मराठी  भावविश्वावर ज्यांनी राज्य केले, असे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी  जन्मदिन त्यांच्या या जन्मदिनी  मराठी भाष गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत. 

हा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार व्हावा हा उद्देश आहे. या धोरणाची अमंलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात  विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा प्रतिज्ञा  घेतली जाईल.  यासाठी स्थानिक प्रशासनाव्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. 

सध्याच्या कोविड- 19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन साजरे करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. परंतु जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य आहेत, तिथे  राज्य शासन यांनी आखून दिलेल्या कोविड मार्गदर्शन तत्वांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे  कळविण्यात आले आहेत.

0000000

 दिव्यांग व्यक्तीच्या योजनांसाठी

आमिषास बळी न पडण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जातात. दिव्यांग अनुदान, दिव्यांग साहित्य, बीज भांडवल व दिव्यांग विवाह अनुदान व इतर दिव्यांग योजनाचा पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनांच्या लाभासाठी दिव्यांगाच्या पालकांना व दिव्यांग पाल्यांना कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून दूरध्वनी संदेश किंवा प्रत्यक्षात आपणास लाभ मंजूर करुन देतो असे अमिष देत असेल तर त्यांच्या कोणत्याही थापाना बळी पडू नका, असे आवाहन जिल्हा परिषदेचे  समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.  

याच बरोबर अशा भूलथापा देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती समवेत आर्थिक व्यवहार करु नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरापासून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरापर्यत अशा अज्ञात व्यक्तीकडून आमिष दाखविल्यास जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा. याबाबची माहिती द्यावी किंवा कोणतीही माहिती असल्यास पत्त्यासह व दुरध्वनी संदेशासह तक्रार नोंदवावी, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला 28 फेब्रुवारीपासून नांदेड येथे प्रारंभ

 

·         एकुण 15 नाट्य प्रयोगाचे होणार सादरीकरण 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :-  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 60 वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथे येत्या 28 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.  महाराष्ट्रात ही स्पर्धा  विविध 19 केंद्रांवर 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव  देशमुख यांच्या पुढाकाराने कोविड नंतर सुरु होणाऱ्या या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दुसऱ्या टप्प्यात नांदेड येथे 28 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची नावे व तारखा पुढीलप्रमाणे आहेत.  नांदेड शहरातील कुसुम सभागृहात रोज सायंकाळी 7 वाजता हे सादरीकरण होईल. येथील केंद्रावर नांदेड, परभणी आणि बीड जिल्ह्यातील  एकूण 15 नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.  

यात 28 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेडच्यावतीने गोविंद जोशी लिखित, दिग्दर्शित स्पेस, 1 मार्च रोजी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ परभणीच्यावतीने रविशंकर झिंगरे लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित उद्रेक, 2 मार्च रोजी छत्रपती सेवाभावी संस्था,उखळी,जी.परभणीच्यावतीने अभिजित वाईकर लिखित, सोनाली डोंगरे दिग्दर्शित कधी उलट कधी सुलट, 3 मार्च रोजी स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने सुदाम केंद्रे लिखित, श्याम डुकरे दिग्दर्शित टकले रे टकले 4 मार्च रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित,सौ. सुनिता करभाजन दिग्दर्शित भयरात्र, 5 मार्च रोजी नटराज कला विकास मंडळ जिंतूर, जी. परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित धर्मदंड, 6 मार्च रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्यावतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित ड्रीम्स रिले, 7 मार्च रोजी संत सर्वज्ञ दासो दिगंबर सेवाभावी प्रतिष्ठान बीड, नांदेड शाखेच्या वतीने डॉ. हेमंत कुलकर्णी लिखित, राजीव किवळेकर दिग्दर्शित दास्ताँ, ८ मार्च रोजी सरस्वती प्रतिष्ठान नांदेडच्यावतीने किरण पोत्रेकर लिखित, सौ. स्वाती देशपांडे दिग्दर्शित कळा या लागल्या जीवा, 9 मार्च रोजी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान, नांदेडच्यावतीने गिरीश जोशी लिखित, प्रमोद देशमुख दिग्दर्शित फायनल ड्राफ्ट 10 मार्च रोजी शुभंकरोती फौंडेशन नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, किरण चौधरी दिग्दर्शित एक परी 11 मार्च रोजी ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्यावतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित जय भीम निळा सलाम 12 मार्च रोज शाक्य सर्वांगीण विकास प्रतिष्ठान परभणीच्या वतीने, नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित यशोधरा, 13 मार्च रोजी तन्मय ग्रुप नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित 28 युगांपासून मी एकटी आणि 14 मार्च रोजी झपूर्झा फौंडेशन परभणीच्यावतीने विनोद डावरे लिखित, दिग्दर्शित अस्वस्थ वल्ली या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.  

कोरोनाच्या काळामुळे गत वर्षी स्पर्धेचे आयोजन झाले नाही. याही वर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता नाट्य स्पर्धा कोरोना विषयक सर्व नियम पाळून संपन्न होणार आहे. नांदेड शहरातील रसिक प्रेक्षकांनी नेहमीच कलावंताना प्रोत्साहन दिले आहे. या हौशी मराठी नाटय स्पर्धेला व नाटय कलावंताना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी केली आहे.

00000



माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य

या संकल्पनेवर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

 

·         विजेत्यांना लाखोंची बक्षिसे

·         प्रश्न मंजूषा, घोषवाक्य, गीत, व्हिडिओ मेकिंग आणि भित्तीचित्र स्पर्धा

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- भारत निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त  माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. यात प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत, व्हिडीओ मेकिंग, भित्तीचित्र या विषयावर स्पर्धा घेतल्या जात आहेत. यासाठी लाखोंची  बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहे. प्रवेशिका, नियम, अटी यांची तपशिलवार माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका खालील दिलेल्या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका तपशीलासह मंगळवार 15 मार्च 2022 पर्यंत voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात.  राष्‍ट्रीय मतदार जागृतीच्‍या अनुषंगाने आयोजित करण्‍यात आलेल्या या विविध स्‍पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, नागरिक व मतदारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्विप मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग या कार्यक्रमातर्गंत ही स्पर्धा आयोजित केली आहे. सामान्य लोकांची प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून त्यांच्या सक्रिय सहभागातून निवडणूक आयोग लोकशाही बळकट करत आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामुहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व स्पष्ट करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकूरांचा गौरव करणे हा उद्देश या स्पर्धेचा आहे. 

 

अशा आहेत स्पर्धा आणि त्यांची बक्षिसे. प्रश्न मंजूषा, घोषवाक्य, गीत, व्हिडिओ मेकिंग, भित्तिचित्र स्पर्धा.  

 

प्रश्न मंजूषा स्पर्धा-  सुलभ, मध्यम आणि अवघड हे स्पर्धेतील तीन स्तर असतील. स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येतील.

 

घोषवाक्य स्पर्धा- या स्पर्धेत सहभागी व्हा आणि दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर तुमचे शब्द गुंफून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक घोषवाक्य तयार करणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. प्रथम पारितोषिक 20 हजार रुपये,  द्वितीय पारितोषिक 10 हजार रुपये,  तृतीय पारितोषिक 7 हजार 500 आहे. तर सहभागी होणाऱ्या स्पर्धाकांपैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी 2 हजार रुपये विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

 

गीत स्पर्धा- शास्त्रीय, समकालीन आणि रॅप इत्यादीसह कोणत्याही स्वरूपातील गीतांच्या माध्यमातून स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिभा आणि क्षमता जोखणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धकांना दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गीतरचना तयार आणि शेअर करू शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरू शकतात. गाण्याचा कालावधी तीन मिनिटांपेक्षा जास्त नसावा.

 

संस्थात्मक श्रेणीत- पहिले बक्षिस 1 लाख रुपये, दुसरे बक्षिस 50 हजार रुपये, तिसरे बक्षिस 30 हजार तर विशेष उल्लेखनीय 15 हजार रुपये. व्यावसायिक श्रेणीत- पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार तर विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये. हौशी श्रेणीत- पहिले बक्षिस 20 हजार रुपये, दुसरे बक्षिस 10 हजार रुपये, तिसरे बक्षिस 7 हजार 500 तर विशेष उल्लेखनीय बक्षिस 3 हजार रुपये असेल. 

 

व्हिडिओ मेकिंग स्पर्धा- व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून कॅमेराप्रेमींना भारतीय निवडणुकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारा व्हिडिओ (चित्रफीत) तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त, खालील विषयांवर देखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवू शकतात-: माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्त्व (प्रलोभनमुक्त मतदान); मतदानाची शक्ती, महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व प्रदर्शित करणे. सहभागी स्पर्धकांना वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचा आहे. व्हिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची नुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.  

 

संस्थात्मक श्रेणीत- पहिले बक्षिस 2 लाख रुपये, दुसरे बक्षिस 1 लाख रुपये, तिसरे बक्षिस 75 हजार तर विशेष उल्लेखनीय 30 हजार रुपये. व्यावसायिक श्रेणीत- पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार तर विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये. हौशी श्रेणीत- पहिले बक्षिस 30 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 10 हजार तर विशेष उल्लेखनीय बक्षीस 5 हजार रुपये असेल.

 

भित्तिचित्र स्पर्धा: वरील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तिचित्रे तयार करू शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पर्धक डिजिटल भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे पाठवू शकतात. भित्तिचित्र यांचे रेझोल्यूशन (रंगकणांचे पृथक्करण) चांगले असले पाहिजे.

संस्थात्मक श्रेणीत- पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार तर विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये. व्यावसायिक श्रेणीत- पहिले बक्षिस 30 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 10 हजार तर विशेष उल्लेखनीय 5 हजार रुपये. हौशी श्रेणीत- पहिले बक्षिस 20 हजार रुपये, दुसरे बक्षिस 10 हजार रुपये, तिसरे बक्षिस 7 हजार 500 रुपये तर विशेष उल्लेखनीय बक्षिस 3 हजार रुपये असे बक्षिसाचे स्वरुप आहे.

 

संस्थात्मक, व्यावसायिक, हौशी या स्पर्धेच्या श्रेणी आहेत. 

 

संस्थात्मक श्रेणी- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावसायिक श्रेणी- ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र असा आहे किंवा गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र याच्याशी संबंधित एखादे काम हा जिच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हौशी श्रेणी- हौशी: जी व्यक्ती गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या/ त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतून असतो तिला 'हौशी' म्हणून गणण्यात येईल.

 

गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले असून संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या श्रेणीचा समावेश आहे. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. या व्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 3 विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.

 

स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात. ई-मेल करतांना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य तर प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धा या 5 प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येत आहेत.विविध श्रेणींमधील प्रवेशिका या भारत निवडणूक आयोगाद्वारे गठित परीक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतील आणि विजयी प्रवेशिकांची निवड करण्यात येईल. पूनर्मूल्यांकनाच्या दाव्यांशी संबंधित विनंत्यांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...