Monday, August 12, 2024

वृत्त क्र. 707

दि. 12 ऑगस्ट 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण

नांदेड, दि.१२ ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सोमवारी दुपारी ४ वाजता  नांदेड,हिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले होते. श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 

आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित हिंगोली येथील कावड महोत्सवात सहभागी झाल्यानंतर त्यांनी नांदेड शहरा लगतच्या माजी खासदार हेमंत पाटील यांच्या शेतातील पुरातन शिवमंदिराला व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले यावेळी त्यांना आ.बालाजी कल्याणकर,माजी खासदार हेमंत पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे आदींनी निरोप दिला.

***




 मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध  

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• हिंगोलीच्या कावड यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली, दि. 12 (जिमाका): मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार आहे. एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.  

हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आनंदाचा शिधा, मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च शिक्षण आदी योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी उपस्थितांना केले.

कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी दान स्वरुपात चार एकर जमीन दिली आहे. त्याठिकाणी विपश्यना केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासह अन्य विकासात्मक कार्यासाठी आमदार बांगर यांचे कौतुकही श्री. शिंदे यांनी केले.

वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रास 800 कोटी रुपये निधी मंजूर आहे. तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह सर्व योजनांसाठी भरीव निधींचीही भरीव तरतूद केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

अद्याप मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परंतु उर्वरीत कालावधीतही मुबलक पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी औंढा नागनाथ येथील नागनाथाला साकडे घातल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आमदार बांगर यांच्या पुढाकारातून मागील दहा वर्षांपासून कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव संस्थान येथून कावड यात्रा काढण्यात येते. कळमनुरी येथून काढलेली ही कावड यात्रा हिंगोलीतील कयाधू नदी तिरावरील अमृतेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येते. या यात्रेस कावडधारींसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
***
















 



 

 वृत्त क्र. 706 

आजपासून तीन दिवस प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा !

 

घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

 

नांदेड दि. 12 : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जनतेच्या मनात तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची जाज्ज्वल भावना कायमस्वरुपी त्यांच्या मनात राहावीयासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत 'हर घर तिरंगाअर्थात घरोघरी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयेखासगी आस्थापना आणि प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करण्यासाठी 9 ऑगस्टपासून आयोजित उपक्रमांना नागरिकविद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हर घर तिरंगा अभियानात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी व्हावे. तसेच यंदा घरावर ध्वज फडकविण्याचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देवून आगळावेगळा आदर्श निर्माण घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा. राष्ट्रीय वेशभूषा करून सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी ध्वज फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ध्वजासोबत सेल्फी घेवून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

***



 वृत्त क्र. 705 

खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप, पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रुपये 5 हजार (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. 

सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी या संमतीपत्रावरोवर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहाय्यकांना देण्यात यावी. याशिवाय ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत त्यांनी सामायिक खातेदार ना हरकत पत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे. 

सदरचे संमतीपत्र तसेच सामायिक खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र यांचा नमुना पत्र आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकांकडून  शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या वेवपोर्टलवर माहिती भरली जाणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

0000

 

 वृत्त क्र.  704 

शून्य ते सहा वयोगटातील बालकांची श्रवण दोष तपासणी शिबिर संपन्न

 

·  महसूल पंधरवडा निमित्त शिबिराचे आयोजन  

 

#नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  महसूल पंधरवडा-2024 निमित्त जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा याअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासनजिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले. 50 बालकांची श्रवणदोष तपासणी या शिबिरात करण्यात आली.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळउपजिल्हा चिकित्सक डॉ.  संजय पेरकेतहसीलदार संजय वरकडनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटीलबाल विकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटेदिव्यांग कक्ष प्रमुख कुरेलूजिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक नितीन निर्मल आदींची  उपस्थिती होती.

 

हे शिबिर केवळ शीघ्र निदानापुरतेच मर्यादित न ठेवता येणाऱ्या काळात योग्य ते उपचार करण्यात यावे असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे 800 कॉक्लीअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया झाली असल्याचे डॉक्टर संजय पेरके यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिघ्र निदानउपचाराचे महत्त्व व गरज याविषयी सविस्तर अशी माहिती नितीन निर्मल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. तहसिलदार संजय वरकड यांनी या शिबिरा शुभेच्छा दिल्या तर मुरलीधर गोडबोले यांनी सूत्रसंचालनासह सर्वांचे आभार मानले.

00000







वृत्त क्र.  703

श्री चक्रधर स्वामी यांचे छायाचित्र शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करून घेण्याचे निर्देश

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  सन 2024 मध्ये विहित केलेल्या जयंतीच्या परिपत्रकान्वये गुरुवार 5 सप्टेंबर 2024 रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन भाद्रपद शुल्क द्वितीया या तिथीनुसार त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे छायाचित्र संबंधित  जिल्हा शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सर्व शासकीय विभागांनी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

00000

 वृत्त क्र.  702

कपाशीवरील रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावातुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो. तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जूलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. वरील सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी पुढील उपाययोजनाचा अवलंब करावा.

एकात्मिक व्यवस्थापन:

रसशोषक किडींचे व्यवस्थापन

· बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथोक्झाम किटकनाशकांची बीजप्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत पिकाला संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.

·   वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांद्यापाने व इतर पालापाचोळा जमाकरून किडींसहीत नष्ट करावा.

· पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर २५पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टर लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.

·  कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे त्यामुळे चवळी पीकावर कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल.

·  वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे जसे अंबाडीरानभेंडी इ. नष्ट करावी.

·  मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.

· रस शोषक किडीवर उपजीविका करणारे नैसर्गिक किटक उदा. सिरफीड माशीकातीनढालकिडेक्रायसोपा इत्यादी परोपजीवी कीटकांची संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.

·    रसशोषक किडींसाठी कपाशी पिकाचे प्रादूर्भावाबाबत सर्वेक्षण करावे.

· सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूडतूडे/पान किंवा दहा फूलकीडे/पान किंवा मावातुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली.किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही ३० मि.ली.किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

·      पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकापेक्षा  किमान एक फूट उंचीवर लावावेत, जेणेकरून फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.

·   प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जीनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा.

·  पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्यांची रोकथाम करता येईल 

·  पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासुन दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिलीप्रति १० लीपाणी या प्रमाणे फवारणी.

· पिक उगवणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकांची कार्ड (१.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी) चार वेळा पिकावर लावावेत.

·      गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुलेपात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुलेपात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली दिल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

·  प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅमडा  सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

000000

 



 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन 
हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना

नांदेडदि. 12 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी 4 वाजता  नांदेडहिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले. श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

#नांदेड विमानतळावर आ. बालाजी कल्याणकरमाजी खासदार हेमंत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमापजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमहानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे,अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौकहिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित कावड यात्रेस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झालेत.

***




वृत्त क्र.  701

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन

हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना

नांदेड, दि. 12 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी 4 वाजता  नांदेड, हिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले. श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

#नांदेड विमानतळावर आ. बालाजी कल्याणकरमाजी खासदार हेमंत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे,अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित कावड यात्रेस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झालेत.

***

















 वृत्त क्र.  700

सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  सद्यास्थितीत मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. पुढीलप्रमाणे रोगाची लक्षणे ओळखुन एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे.

 रोगाची लक्षणे :-  हिरवा मोझॅक : यामध्ये झाडाची पाने ही जाडसर, आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात. प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते. हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडी द्वारे केला जातो.

पिवळा मोझॅक : सोयाबीन च्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.

 रोगास कारणीभूत घटक :

·   केवडा रोग उबदार तापमान, अति दाट पेरणी या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरते.

·  आद्र हवामानात हा रोग वाढत जातो.

नुकसानीचा प्रकार :- दोन्हीही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

सोयाबीनवरील पांढरी माशी, मावा, आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन :-

काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा वरोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये १२ इंच x १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत. नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करावा. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासूनरोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. पीक तणमुक्त ठेवावे. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे

दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असिटामिप्रीड २५% + बाइफेन्द्रीन २५ % डब्ल्यूजी १०० ग्रॅम (५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) (लेबल क्लेम कीटकनाशक) किंवा थायमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६% झेडसी ५० मिली (२.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) (लेबल क्लेम नाही) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी. वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणीसाठी वापरण्यात येनाऱ्यां पाण्याचा सामू ५ ते ७ असावा, शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयारकरताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे, तोंडावर मास्क व संरक्षित कपडयाचा वापर करावा तसेचघुटका, तंबाखु  खाऊ नये व बीडी पिऊ नये. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो.

00000

 वृत्त क्र.  699

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महावीर चौकापर्यंतच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौक पर्यंतच्या परिसरात मुख्य रोडवर 13 ऑगस्ट 2024 रोजीच्या मध्यरात्री पासून ते 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. 

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2024 रोजी ध्वजारोहनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.  त्याअनुषंगाने शहरातील      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौकापर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (दिनांक 12 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री ) ते 16 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषणे,आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, रस्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

000000

 वृत्त क्र.  698

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुर्नभरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

विषेशत: उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेततील महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी  करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित तेल कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गावात येऊन ई-केवायसी करुन घेतील किंवा आपणास शक्य असल्यास संबंधित ऑईल कंपनीच्या एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी. सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्र.  697

समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनासाठी 26 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 20 टक्के सेस मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनासाठी पात्र लाभार्थ्यांनी 26 ऑगस्ट 2024 पर्यत पंचायत समितीकडे सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

या योजनांमध्ये मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिनप्रिंटर, लहान मशिन अनुदान,  मागासवर्गीयांना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे, मागासवर्गीय महिलांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन अनुदान,  मागासवर्गीयाना मिरची कांडप अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी प्रोत्साहनपर अनुदान, मागासर्गीय व्यक्तीना दुग्ध व्यवसायासाठी गाई व म्हैस पुरविणे, निराधार/विधवा/परितक्त्या, घटस्फोटीत एकल मागासवर्गीय महिलांना उपजिविकेसाठी सहाय्य करणे या योजनाचे अर्ज माहिती पत्रकासह सर्व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे संपर्क साधून अर्जामध्ये नमुद केलेल्या सर्व कागदपत्रासह अर्ज 26 ऑगस्ट पर्यत पंचायत समिती कार्यालयात सादर करावेत.  तसेच अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावाअसेही जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  

00000

 वृत्त क्र.  696

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन    

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://hmos.mahait.org   संकेतस्थळावर  30 ऑगस्ट 2024 या कालावधीत  कार्यालयीन वेळेत ऑनलाईन भरावा. भरलेला अर्ज 2 दिवसात अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहाकडे जमा करावा. सदर पात्र लाभार्थ्याची पहिली निवड यादी अंतिम  व प्रसिध्द 4 सप्टेंबर 2024 पर्यत करण्यात येईल. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन संबंधित वसतीगृह गृहपाल यांनी सही शिक्क्यासह 3 सप्टेंबर 2024 पर्यत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी खर्चाची बाबीत भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम  51 हजार रूपये एवढी आहे.  नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुज्ञेय रक्कम  आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.  

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी/ अकरावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.  विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. 

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...