Monday, August 12, 2024

 वृत्त क्र.  702

कपाशीवरील रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावातुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो. तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जूलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. वरील सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी पुढील उपाययोजनाचा अवलंब करावा.

एकात्मिक व्यवस्थापन:

रसशोषक किडींचे व्यवस्थापन

· बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथोक्झाम किटकनाशकांची बीजप्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत पिकाला संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.

·   वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांद्यापाने व इतर पालापाचोळा जमाकरून किडींसहीत नष्ट करावा.

· पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर २५पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टर लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.

·  कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे त्यामुळे चवळी पीकावर कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल.

·  वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे जसे अंबाडीरानभेंडी इ. नष्ट करावी.

·  मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.

· रस शोषक किडीवर उपजीविका करणारे नैसर्गिक किटक उदा. सिरफीड माशीकातीनढालकिडेक्रायसोपा इत्यादी परोपजीवी कीटकांची संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.

·    रसशोषक किडींसाठी कपाशी पिकाचे प्रादूर्भावाबाबत सर्वेक्षण करावे.

· सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूडतूडे/पान किंवा दहा फूलकीडे/पान किंवा मावातुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली.किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही ३० मि.ली.किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

·      पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकापेक्षा  किमान एक फूट उंचीवर लावावेत, जेणेकरून फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.

·   प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जीनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा.

·  पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्यांची रोकथाम करता येईल 

·  पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासुन दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिलीप्रति १० लीपाणी या प्रमाणे फवारणी.

· पिक उगवणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकांची कार्ड (१.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी) चार वेळा पिकावर लावावेत.

·      गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुलेपात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुलेपात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली दिल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

·  प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅमडा  सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...