Sunday, June 21, 2020


वृत्त क्र. 561   
दहा व्यक्ती कोरोनातून झाले बरे
नवीन एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नाही  
नांदेड (जिमाका) दि. 21 :- कोरोना आजारातून आज दहा व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील सहा व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील चार असे एकुण 10 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 219  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. रविवार 21 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 35 अहवालापैकी सर्वच्या सर्व  35 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. एकही नवीन पॉझिटिव्ह बाधित न आढळल्याने‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 304 एवढी आहे.
आतापर्यंत 304 बाधितांपैकी 219 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 71 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात 71 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 5 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार 21 जून रोजी 79 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 830,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 708,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 985,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 304,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 219,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 71,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 79 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
            00000    

वृत्त क्र. 560



योगाभ्यास जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून प्रशासनाने दिला योगाभ्यासाचा कृतीशील मंत्र
नांदेड (जिमाका) दि. 21 :- पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्येची भारताने संपूर्ण जगाला अनमोल देणगी दिली आहे. सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यासासारखे सहज सोप्या पद्धतीने व कोणताही खर्च न लागणारे असे प्रभावी माध्यम प्रत्येकाजवळ उपलब्ध आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात योगाभ्यासाची जीवनशैली प्रत्येकाच्या अंगी रुजल्यास आपल्याला अधिक सुरक्षित होता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी शासनाच्या निर्देशाचे पालन करीत जिल्हाधिकारी प्रशासनातील निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन हा संदेश घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न केला.
हा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/dionanded/ या फेसबुक पेजवरुन लाईव्ह करण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत जागतिक योग दिवसाचा कृतिशील संदेश पोहोचविणे शासकीय झाले.
आंतरराष्ट्रीय योगासन साधक श्रेयस मार्कंडेय व डॉ शर्मीली पाटील यांनी योगाभ्यासाचा सराव घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक हे सुरक्षित या त्राचे नियम पालन करीत सहभागी झाले.
योग ही जीवनशैली असून ती प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे अशी अपेक्षाही डॉ. विपीन यांनी व्यक्त केली. निरोगी आयुष्यासाठी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक एकात्मता तेवढीच आवश्यक असते. या तीन सुत्रांना योगाभ्यासाद्वारे स्वत:च्या मनावर ताबा मिळविता येणे शक्य होते. शारीरिक स्वास्थाबरोबर मनस्वास्थही अधिक महत्वाचे असून योगाभ्यासाद्वारे हे सहज साध्य होते, असेही डॉ. विपीन यांनी सांगितले. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. यशवंत पाटील यांनी योगाचे महत्व विशद केले.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...