Saturday, January 16, 2021

 

नांदेड जिल्ह्यातील 262 आरोग्य रक्षकांना कोरोनाची लस

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील लसीकरणाला आरोग्य रक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने लसीकरण करुन घेतले. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी रांगा लावून लसीकरण करुन घेतल्यामुळे पहिल्याच फेरीत संपूर्ण ग्रामीण भागात सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे. आज दिवसअखेरपर्यंत नांदेड जिल्ह्यात 262 आरोग्य रक्षकांनी कोरोनाची लस घेतली.

0000

 

नांदेड जिल्ह्यातील त्या पक्षांना एच-5 व एन-1 ची बाधा  

पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- देशातील इतर राज्यांच्या पाठोपाठ आपल्या राज्यातील काही गावांसमवेत नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच याचा अधिक प्रादुर्भाव इतर भागात होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. 

बिलोली तालुक्यातील मौजे हूनगुंदा येथे 8 जानेवारी रोजी 2 कावळे व 9 जानेवारीला 3 कावळे व 1 बगळा मृत आढळून आले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता घेत पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष उपाययोजना व पथके स्थापन केली होती. 11 जानेवारीला माहूर तालुक्यातील मौजे पापलवाडी येथे 4 कुक्कुट व 3 कावळे व कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथे 8 कुक्कुट पक्ष्यांमध्ये, किनवट तालुक्यात 12 जानेवारी रोजी मौजे तल्हारी येथे 9 कुक्कुट व 13 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथे 5 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. सदर मृत पक्षी पशुसंवर्धन विभागातर्फे पुणे येथील रोग अन्वेषण विभाग व भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था येथे रोग निदानासाठी पाठविण्यात आले होते.   

या रोगाच्या तपासणीचे निष्कर्ष  सकारात्मक आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगण्याविषयी सूचित केले आहे. पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून नमुने तपासणीचे निष्कर्ष प्राप्त झाले असून कावळे एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 8 )  व कुक्कुट पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 1 )  या स्ट्रेन करिता सकारात्मक आल्यानुसार मौजे नावंद्याचीवाडी ता.कंधार व मौजे पापलवाडी ता. माहुर येथे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिजेच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे व उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. 

त्याअनुषंगाने  जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत विभाग व जलसंपदा विभाग यांना लेखी सूचना देऊन जिल्ह्यातील कोणत्याही गावात अथवा पाणवठे / जलाशय याठिकाणी कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी / स्थलांतरित पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक आढळल्यास शासनाच्या तात्काळ निदर्शनास आणण्याबाबत आवाहन केले आहे. 

मर्तूकीबाबत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती देवून मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्यावतीने जिल्हास्तरीय एक व तालुकस्तरीय 32 जलद प्रतिसाद पथक (आर आर टी ) कार्यान्वित असून जिल्ह्यातून कुठेही नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात  मर्तुक आढळून  आल्यास तात्काळ भेट देऊन रोग निदानासाठी नमुने गोला करण्यात येत आहेत. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय महितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत अशी सर्व जनतेस विनंती करण्यात येते. अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व कुक्कुट मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे.

000

कृपया सुधारित वृत्त क्र. 65


19 कोरोना बाधितांची भर तर    

36 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शनिवार 16 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 19 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 7 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 616 अहवालापैकी 589 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 42 एवढी झाली असून यातील 20 हजार 923 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 338 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 579 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, लोहा तालुक्यांतर्गत 1, नायगाव तालुक्यांतर्गत 1, मुखेड कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.92 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 7, मुदखेड तालुक्यात 1, यवतमाळ 1, लोहा 1, किनवट 2 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, मुखेड तालुक्यात 2   असे एकुण 7 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 338 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 22, मुखेड कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 28, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 134, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 57, खाजगी रुग्णालय 31 आहेत.   

शनिवार 16 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 73 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 94 हजार 944

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 68 हजार 731

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 42

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 923

एकुण मृत्यू संख्या-579

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.92 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-338

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.          

00000


 

नायगाव तालुक्यातील मौ. खैरगाव येथे

17 जानेवारीला होणार फेर निवडणूक

नांदेड, (जिमाका) दि. 16:-  नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील प्रभाग क्र. 3 () या सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांना छताचा पंखा हे चिन्ह वाटप झाल्यानंतर त्यांचे नाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नजरचुकीने मतपत्रिकेवर समाविष्ट करावयाचे राहून गेल्यामूळे  जागा क्र. 3 () सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी 15 जानेवारी 2021 रोजी झालेले मतदान रद्द करण्यात आले आहे. या जागेसाठी रविवार 17 जानेवारीला फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. 

मौजे खैरगाव प्रभाग क्र. 3 () सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांना छताचा पंखा या जागेसाठी सुधारित मतपत्रिका तयार करुन, त्यामध्ये श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांच्या नावाचा समावेश करुन या जागेच्या फेर मतदानासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे. 16 जानेवारीला मतदान यंत्र तयार करुन रविवार 17 जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर सोमवार 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

मौजे खैरगाव प्रभाग क्र. 3 () सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी 15 जानेवारी 2021 रोजी पार पडले असल्याने ग्रामपंचायत निवडणूकीत मधल्या बोटाला शाई लावण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. रविवार 17 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील प्रभाग 3 () या सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव जागेची फेरनिवडणुकीसाठी मतदाराच्या डाव्या हाताच्या अनामिकेस मार्करपेनने शाई लावण्यात येणार आहे याची मतदारांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहानिमित्त

सायकल रॅलीचे सोमवारी आयोजन

नांदेड, (जिमाका) दि. 16:-  जिल्ह्यात 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानाचे उद्घाटन सोमवार 18 जानेवारीला होणार आहे. या दिवशी सकाळी 6.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातून रस्ता सुरक्षा जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा मार्ग हा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, कलामंदिर, आय.टी.आय-एस.टी. वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुना हॉटेल चौक ते आय.टी.आय कॉर्नर असा असून आय.टी.आय येथे रॅलीचा समारोप कार्यक्रम होईल. सर्वांनी या रॅलीत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

00000

 

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेस प्रारंभ 

 नांदेड, (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज रुग्णालयाच्या परिचारीका श्रीमती ममता वुईके यांना लस देवून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरण केंद्राचा आढावा घेवून कोविशिल्ड ही सिरम इनस्टीटयुट ऑफ इंडियाची लस असून ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे सांगितले. आरोग्य सेवेतील डॉक्टर, परिचारीका व कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी असे, आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी केले. 

 वैद्यकीय महाविद्यालयातील एकुण 1 हजार 524 कर्मचाऱ्यांची या लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. ज्यांचे लसीकरण होणार आहे त्यांना एक दिवस आधी कोविड ॲपमार्फत एसएमएस पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या ओळखपत्राची खात्री करुन सकाळी 9 ते 5 यावेळेत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून बाहरुग्ण विभागात लस देण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर लाभार्थींना अर्धातास वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल. लसीकरणानंतर लस घेणाऱ्यांना घाम येणे, चक्कर येणे किंवा इतर कुठल्याही स्वरुपाच्या तक्रारी आल्या तर संबंधितांवर तात्काळ उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, असे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गट्टाणी  यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण तसेच डॉ. भुरके, डॉ. अनमोड, डॉ. हेमंत गोडबोले,  डॉ. समीर,  डॉ.सलीम तांबोळी, डॉ. सुधा करडखेडकर, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. इशरत करिम आदी उपस्थित होते. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. शितल राठोड, डॉ. उबेद इत्यादीसह अनेक अध्यापक, परिचारीका व वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी डोळे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. ओमप्रसाद दमकोंडवार, डॉ. सोनाली कुलकर्णी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

00000




 

शासकीय कार्यालयातील स्वच्छता व शिस्तीसाठी

"5 स्‍टार कार्यालय सुंदर माझे कार्यालय उपक्रम

नांदेड, (जिमाका) दि. 16:- जिल्ह्यातील सर्व अधिनस्त शासकीय कार्यालयांनी 1 जानेवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत "5 स्‍टार कार्यालय, सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम अभियान स्वरुपात राबवावा व त्याबाबतचा अहवाल, प्रस्ताव गुणांकासह परिपत्रकात नमूद केलेल्या सूचनानुसार वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालयाच्या स्तरावर हा उपक्रम अभियान स्वरुपात राबवावा.  या उपक्रमात कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक बाबी यांचा समावेश राहणार आहे. सर्व संबंधित विभागप्रमुख, कार्यासन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी यांनी या अभियानात सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वीरित्या राबवावे. या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा पहिला प्रगती अहवाल 31 जानेवारी व दुसरा प्रगती अहवाल 15 फेब्रुवारी रोजी विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी  dygennanded@gmail.com या ई-मेल आयडीवर जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. 1 मार्च 2021 रोजी तहसिल कार्यालयाने केलेल्या कामांचा प्रस्ताव गुणांकासह जिल्हाधिकारी कार्यालयास व जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुख व उपविभागीय कार्यालयांनी जिल्हास्तरावरील समितीस प्रस्ताव गुणांकासह सादर करावा. 

जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या तहसिल कार्यालयाचा क्रमांक निवडण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त गुण असणारे कार्यालये ज्या तालुक्यात आहेत त्या तालुक्यांना जिल्हास्तरावरुन प्रथम क्रमांक देण्यात येईल. जिल्हास्तरावरील पथकामार्फत तालुकाच्या कार्यालयांनी केलेल्या कामांची तपासणी करण्यात येणार असून त्यांच्यामार्फत मुल्यांकन करण्यात येईल. जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमांकानुसार तहसिल कार्यालयाचे प्रस्ताव व जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामांचे मुल्यांकन करुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवडण्यात येतील. प्राप्त प्रस्तावाची छाननी व कामांचे मुल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीमार्फत कार्यालय निहाय मुल्यांकन करुन व प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

00000

 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

रामदास आठवले यांचा दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 16:- केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

रविवार 17 जानेवारी 2021 रोजी लातूर जिल्ह्यातील हत्तरगाव ता. निलंगा येथून रात्री 10.15 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. 

सोमवार 18 जानेवारीला सकाळी 10.30 वा. बाबानगर नांदेड येथे राखीव. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन नांदेड येथे एम्पलॉइज ऑफ रिपब्लिकन फेडरेशनच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक. दुपारी 12.15 वा. पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12.45 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 1.30 वा. नांदेड येथून बिलोलीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. बिलोली साठेनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. वाहनाने हैद्राबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000

 

लसीकरणासाठी नांदेड जिल्हावासीय

स्वयंस्फुर्तपणे पुढे येतील

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

पहिल्या लसीकरणाचा बहुमान सदाशिव सुवर्णकार यांना 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- बहुप्रतिक्षेत असलेल्या कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली आज नांदेड जिल्ह्यात झाला असून ही पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांना मिळाला. ही लस घेण्यासाठी सर्व दडपनांना झुगारुन पुढे येत त्यांनी आरोग्य साक्षरतेच्या लसीकरण चळवळीचा नवा अध्याय निर्माण केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मुंबई येथून झुमद्वारे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मनमोकळा संवाद साधत नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील सहकारी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिरसीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

मागील दिडवर्षे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने स्वत:ला झोकून देवून काम केले आहे. यात ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आशा वर्करपासून कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपर्यंतच्या यंत्रणेचा समावेश आहे. ज्या धैर्याने जिल्ह्यातील लोकांनी शासनाने दिलेल्या सर्व उपाय योजनांचा अवलंब करुन कोरोनाशी दोन हात केले त्याच धैर्याने नांदेड जिल्हावासी लसीकरणासाठी पुढे येऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेला साथ देईल असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांनी वैद्यकीय विभागातील सर्व टिमला लसीकरणाच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रारंभी आमदार अमर राजूरकर यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कोविड काळात केलेल्या सेवेबद्दल नांदेडकरांच्यावतीने कृतज्ञता म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांचा सत्कार केला.   

जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा शुभारंभ मुदखेड तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुरु करण्यात आला. या ग्रामीण लसीकरणाच्या शुभारंभाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागातील पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य सेवक मोहमंद खैसर मो. इस्माईल यांना मिळाला. मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांनी रांगा लावून ही लस घेत आरोग्य साक्षरतेच्या या चळवळीला नवा आयाम दिला. 

गेल्या दिड वर्षात कोविड सारख्या कठीन काळात आरोग्य विभागातील महिला हिरहिरीने न डगमगता न घाबरता पुढे झाल्या. शासनस्तरावरुन त्यांना ज्या सूचना भेटल्या त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन दाखविली. एखाद्या सैन्याच्या तुकडीप्रमाणे आरोग्य विभागातील संपूर्ण टिमने काम करुन समाजाला जो विश्वास दिला त्याला तोड नाही. लसीकरणाची ही मोहिमसुद्धा आरोग्य विभागातील संपूर्ण कर्मचाऱ्यांसमवेत महिला टिम समर्थपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर यांनी गौरव केला. लसीकरणाचा आजचा दिवस दिवाळीच्या आनंद सणापेक्षा मोठा असून खऱ्या अर्थाने कोरोनाच्या या भितीतून आपण कात टाकली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगत आरोग्य विभागाला शुभेच्छा दिल्या. माणसासमवेत प्राण्यांवरही या आर्थिक वर्षात संकट आले. लंम्पीसारखा आजार असो अथवा बर्ड फ्ल्यू सारखा आजार, या कठीन काळात जनतेला सावरण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शासकिय यंत्रणा कुठे कमी पडली नाही, असे जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रास्ताविक करुन जिल्ह्यातील आरोग्य विभागाने केलेल्या कार्याचा आढावा मांडला.   

लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील सुमारे 17 हजार 99 हेल्थ वर्करना ही लस दिली जाणार आहे. यात 631 वैद्यकीय अधिकारी, 1 हजार 489 परिचारिका, 1 हजार 530 अशा वर्कर्स, 5 हजार 632 अंगणवाडी सेविका, 1 हजार 845 बहुउद्देशीय कर्मचारी, 2 हजार 957 फ्रंटलाईन वर्कर, 1 हजार 323 पॅरामेडिकल, 1 हजार 302 सहाय्यक कर्मचारी, 390 कार्यालयीन संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे.  

00000









वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...