Saturday, January 16, 2021

 

नांदेड जिल्ह्यातील त्या पक्षांना एच-5 व एन-1 ची बाधा  

पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- देशातील इतर राज्यांच्या पाठोपाठ आपल्या राज्यातील काही गावांसमवेत नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच याचा अधिक प्रादुर्भाव इतर भागात होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. 

बिलोली तालुक्यातील मौजे हूनगुंदा येथे 8 जानेवारी रोजी 2 कावळे व 9 जानेवारीला 3 कावळे व 1 बगळा मृत आढळून आले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता घेत पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष उपाययोजना व पथके स्थापन केली होती. 11 जानेवारीला माहूर तालुक्यातील मौजे पापलवाडी येथे 4 कुक्कुट व 3 कावळे व कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथे 8 कुक्कुट पक्ष्यांमध्ये, किनवट तालुक्यात 12 जानेवारी रोजी मौजे तल्हारी येथे 9 कुक्कुट व 13 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथे 5 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. सदर मृत पक्षी पशुसंवर्धन विभागातर्फे पुणे येथील रोग अन्वेषण विभाग व भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था येथे रोग निदानासाठी पाठविण्यात आले होते.   

या रोगाच्या तपासणीचे निष्कर्ष  सकारात्मक आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगण्याविषयी सूचित केले आहे. पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून नमुने तपासणीचे निष्कर्ष प्राप्त झाले असून कावळे एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 8 )  व कुक्कुट पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 1 )  या स्ट्रेन करिता सकारात्मक आल्यानुसार मौजे नावंद्याचीवाडी ता.कंधार व मौजे पापलवाडी ता. माहुर येथे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिजेच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे व उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. 

त्याअनुषंगाने  जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत विभाग व जलसंपदा विभाग यांना लेखी सूचना देऊन जिल्ह्यातील कोणत्याही गावात अथवा पाणवठे / जलाशय याठिकाणी कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी / स्थलांतरित पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक आढळल्यास शासनाच्या तात्काळ निदर्शनास आणण्याबाबत आवाहन केले आहे. 

मर्तूकीबाबत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती देवून मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्यावतीने जिल्हास्तरीय एक व तालुकस्तरीय 32 जलद प्रतिसाद पथक (आर आर टी ) कार्यान्वित असून जिल्ह्यातून कुठेही नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात  मर्तुक आढळून  आल्यास तात्काळ भेट देऊन रोग निदानासाठी नमुने गोला करण्यात येत आहेत. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय महितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत अशी सर्व जनतेस विनंती करण्यात येते. अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व कुक्कुट मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे.

000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...