Thursday, November 19, 2020

 

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम

नव्याने जाहीर होणार : मदान

यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द 

 मुंबई, दि. 19 (रानिआ) : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

00000

 

 

केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा संपन्न 

नांदेड (जिमाका) 19 :- कृषि विभागाअंतर्गत हॉर्टसॅप सन 2020-21 अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा नुकतीच संपन्न झाली. या शेतीशाळेचे आयोजन अर्धापुरचे कृषि पर्यवेक्षक प्रवर्तक जी. पी. वाघोळे यांनी केले होते. 

या शेतीशाळेत पिकांत समतोल अन्नद्रव्याचे महत्त्व याविषयाचे व शासनाच्या विकेल ते पिकेल या योजनेतर्गंत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन केळी पिकांवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची संधी व मिळणारे अनुदान या विषयांचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी मागदर्शन केले. 

या शेतीशाळेस उपस्थित वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ श्री. दोंडे यांनी केळी पिकांवर येणारा सीएमव्ही व करपारोग नियंत्रण या विषयांची माहिती दिली. तसेच केळी संशोधन केंद्र नांदेडच्या सौ. धुतराज मॅडम यांनी केली. पिकांचे पोषण करतांना अन्नद्रव्याचे महत्त्व विषद करुन प्रास्तावीक शेतीशाळा प्रशिक्षक जी. पी. वाघोळे यांनी केले . प्रत्येक महिन्याला एक वर्ग व पिकवाढीच्या अवस्थेतनुसार केळी पिकांस त्या त्या टप्यावर मार्गदर्शन करण्याकरीता या शेतीशाळेचे वर्ग नियोजन होणार सोबत सांघिक खेळांच्या माध्यामातुन शेतकऱ्यामध्ये उत्साह निर्मिती करुन केळी पिकांच्या कृषि परीसंस्थेचा अभ्यास कसा करावा. यांचा पिकवाढीवर काय परीणाम होतो याचे चित्रीकरण व सादरीकरण इ. करण्यात करुन या बद्दल तालुका कृषि अधिकारी शिरफुले यांनी माहिती दिली. तालुक्यातर्गंत कृषि विभागाच्या योजनांची मंडळ कृषि अधिकारी श्री. चातरमल यांनी माहिती दिली. या शेतीशाळेस उपस्थितीत शेतकरी सर्व शास्त्रज्ञ व अधिकारी यांचे आभार मानले. हा शेतीवर्ग यशस्वी करण्याकरीता कृषिमित्र गोंविद जंगीलवाड व चिमनाजी डवरे यांनी विशेष सहकार्य केले.

00000

 

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) 19 :- जिल्ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) नोव्हेंबर-डिसेंबर 2020 या परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेच्या 15 केंद्रावर 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत तर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा केंद्राच्या 9 केंद्रावर 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

0000

 

43 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

   तर 36 कोरोना बाधितांची भर      

नांदेड (जिमाका) दि. 19 :- गुरुवार 19 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 43 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 36 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 18 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 358 अहवालापैकी  1 हजार 223 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 773 एवढी झाली असून यातील  18  हजार 782 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 258 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 19 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 543 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 17, औरंगाबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 43 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 14, मुदखेड तालुक्यात 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 असे एकुण 18 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 7, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 1, हदगाव 2, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 2, मुखेड 1 असे एकुण 18  बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 258 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 24, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 83, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 3, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 14, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 14, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 32, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, लातूर येथे संदर्भित 4, अकोला येथे संदर्भित 1 आहेत.  

गुरुवार 19 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 79 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 30 हजार 570

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 7 हजार 889

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 773

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 782

एकूण मृत्यू संख्या- 543

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-82

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-669

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-258

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-19. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...