Friday, February 9, 2018


दुकाने, आस्थापना नियमाचा मसुदा प्रसिद्ध ;
सूचना, हरकती सादर करण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 9 :- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनिमय) अधिनियम, 2017 हा अधिनियम 19 डिसेंबर 2018 रोजी राज्यात लागू केला आहे. या अधिनियमाच्या अनुषंगाने मुसद्यास प्रसिद्धीस देण्याबाबत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) नियम 2017 या नियमांचा मसुदा अधिसुचनेद्वारे 2 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या नियमांचा मसुदा शासनाच्या mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत सूचना व हरकती प्रधान सचिव (कामगार) किंवा कामगार आयुक्त यांच्याकडे 15 दिवसाच्या कालावधीत व्यक्तिश: किंवा टपालाने अथवा ई-मेलद्वारे सादर करण्याचे अधिसुचनेत नमूद केले आहे. या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतीचा विचार करण्यात येणार नाही, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त बी. एम. मोरडे यांनी केले आहे.
00000


कर्करोग तपासणी शिबिराचे
जिल्हा रुग्णालयात आयोजन
नांदेड, दि. 9 :- जिल्हा रुग्णालय नांदेड येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन त्याचबरोबर शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत केले आहे. त्यासाठी हैद्राबाद येथील (कॅन्सर तज्ञ) डॉक्टरांकडून मोफत तपासणी व पुढील उपचार करण्यात येणार आहे. संबंधित कर्करोग रुग्णांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रुग्णालय नांदेड येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून होणारे कर्करोग तसेच स्त्रियामध्ये होणारे स्तनाचे कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोगाची माहिती दिली. यावेळी स्त्रीरुग्ण, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.  
00000



राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा
नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम   
नांदेड दि. 9 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव हे दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.     
रविवार 11 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 10.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने जवरला ता. किनवटकडे प्रयाण. सकाळी 11.05 वा. जवरला येथील हेलिपॅडवर आगमन व राखीव. सकाळी 11.10 वा. जवरला हेलिपॅड येथून मोटारीने जवरला गावाकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. जवरला येथे आगमन. सकाळी 11.15 ते दुपारी 12.15 वाजेपर्यंत जवरला गावास भेट व राखीव. दुपारी 12.15 वा. जवरला येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. जवरला हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.25 वा. हेलिकॉप्टरने जवरला येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1.05 वा. नांदेड विमानतळ येथुन मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.45 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील दीक्षान्त समारंभास आणि इनडोअर स्टेडिअम उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं 5.30 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं 5.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.    
सोमवार 12 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.40 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 9.50 वा. नांदेड विमानतळ येथुन खाजगी हेलिकॉप्टरने बायपास रोड रागूडू गाव सीरसीला तेलंगणाकडे प्रयाण. दुपारी 2 वा. वळण रस्ता रागूडू गाव सीरसीला (तेलगंणा) येथून खाजगी हेलिकॉप्टरने सगरोळी हेलिपॅड ता. बिलोली येथे आगमन व मोटारीने शारदानगर सगरोळीकडे प्रयाण. दुपारी 2.10 वा. शारदानगर सगरोळी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.20 ते 3.20 वाजेपर्यंत संस्कृती संवर्धन मंडळ शारदानगर सगरोळी येथील कृषि विज्ञान केंद्र प्रशासकीय इमारत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.20 वा. शारदानगर सगरोळी येथून मोटारीने हेलिपॅड सगरोळीकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. हेलिपॅड सगरोळी येथे आगमन व राखीव. दुपारी 3.35 वा. सगरोळी हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 4.05 वा. नांदेड विमानतळ येथुन खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.     
000000


पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ  
जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या हस्ते संपन्न
नांदेड, दि. 9 :- राज्य शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम असलेल्या अनुलोम या संस्थेच्या माध्यमातून "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" ही विकासाभिमूख योजना नांदेड जिल्ह्यात देखील प्राधान्याने राबविण्यात येत असून याच लोकाभिमूख अभियानांतर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिलोली तालुक्यातील सगरोळी व लोहगाव येथे पाझर तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
ग्रामीण परिसरात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत व्हावी व या माध्यमातून त्या-त्या भागाचा मुलभूत विकास साधावा या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेतून व अनुलोम संस्थेच्या संकल्पनेतून "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" या नाविन्यपुर्ण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
     स्थानिक ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय सहभागातून साकारत असलेल्या या योजनेच्या माध्यमातून संबध महाराष्ट्रात तब्बल पाच हजार तलावातील गाळ काढण्यात येणार असून राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा हाच यामागील हेतू आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात देखील हे अभियान जोरदारपणे राबविण्यात येत असून जिल्ह्यातील 171 तलावातील गाळ यानिमित्ताने काढण्यात येणार आहे. याच उपक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील सगरोळी व लोहगांव येथे पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले. या कार्यात सगरोळी व लोहगांव येथील स्थानिक ग्रामपंचायतचे देखील भरीव योगदान असणार आहे.  
       
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.सगरोळी व लोहगांव येथे पार पडलेल्या या समारंभाला अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार विनोद गुंडमवार, श्री कुरेशी, श्री घुले, अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. सागरोळीचे सरपंच वेंकट पाटील सिद्नोड व संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख तसेच लोहगावचे सरपंच महाजन उमरे, उपसरपंच नाना राखे शंकर तोडावाड, मंडळ अधिकारी तलाठी गावातील प्रतिष्ठीत नागगरिक होते. अनुलोमचे उपविभाग जनसेवक विजय मोरगुलवार, भाग जनसेवक पांडुरंग बुद्देवार अनुलोमचे वस्तीमित्र मालू वनोळे आदी मान्यवर उपस्थीत होते.
000000


गारपीट, आवकाळी पावसाची शक्यता ;
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
नांदेड, दि. 9 :-  दक्षिण मध्‍य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागात येत्‍या रविवार 11 फेब्रुवारी पासुन गारपिट आणि अवकाळी पावसाची शक्‍यता असल्‍याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
रविवार 11 फेब्रुवारी 2018 पासुन पुढील 48 तासात दक्षिण मध्‍य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी गारपीट, विजा चमकण्‍याची व पावसाची शक्यता असल्‍यामुळे सावधगिरीच्‍या सुचना जिल्‍हा प्रशासनातर्फे नागरीकांना दिल्या आहेत. शेतक-यांनी त्‍यांच्‍या शेत आणि धान्‍यसाठयाची काळजी घ्यावी व कापलेले धान्‍य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. विजा चमकत असतांना झाडाचा आसरा घेणे टाळावे व सावधगिरी बाळगावी. जिल्‍हा, उपविभाग व तालुका ठिकाणी अवकाळी पाऊस उदभविल्‍यास स्‍थानीक प्रशासनास सतर्क राहण्‍याचे तथा याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्‍या वरीष्‍ठ कार्यालयांना बिनाविलंब कळविण्‍याच्‍या सुचना दिल्या आहेत, असेही प्रसिद्धी संदेशात म्हटले आहे.  
00000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...