Friday, January 6, 2023

 वृत्त क्रमांक 15 

मराठी पत्रकारितेचा पारदर्शी वारसा जपण्यासाठी कटिबद्ध होणे आवश्यक

-   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

· सर्व पत्रकार संघटना व प्रशासनाच्यावतीने पत्रकार दिन साजरा 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- समाजातील विविध घटनांचे प्रतिबिंब माध्यमात उमटावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या वृत्तपत्राला दर्पण हे नाव निश्चितच विचारपूर्वक दिलेले असेल. दर्पण म्हणजे प्रतिमा, दर्पण म्हणजे किरणांचे पृथ्थकरण, समाजात घडणाऱ्या घटनांविषयी अभ्यास करुन केलेले विवेचन असेही आपल्याला म्हणता येईल. वृत्तपत्राचा पारदर्शी वारसा आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिला असून हा वारसा तेवढयाच समर्थपणे जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

दर्पण दिनानिमित्त आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, संपादक केशव घोणसे पाटील, संतोष पांडागळे यांच्यासह विविध मुद्रीत, ईलेक्ट्रॉनिक, छायाचित्रकार माध्यम प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 

माध्यमातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण अनेक बदल अनुभवत आहोत. एखाद्या घटनेबद्दलचे भाष्य समाजाच्या तळागाळापर्यत काही मिनिटात पोहचविणे शक्य झाले आहे. याचाच अर्थ आपल्यावरची विश्वासाहर्ततेची जबाबदारी वाढली आहे. एका बाजूला अभिव्यक्तीमुळे आपल्याला स्वातंत्र्य असले तरी या स्वातंत्र्याचे मूल्य जपण्यासाठी माध्यमातील प्रतिनिधीनी आपली आचारसंहिता तयार करुन त्याचा सन्मान केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. 

पत्रकारितेच्या क्षेत्रात अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तीचा ग्रंथालयाशी अधिक संपर्क असेल तर लिखानामध्ये अधिक परिपक्वता येवू शकते. नव्या पिढीतील पत्रकारांनी आपले चौफेर वाचन करणे आवश्यक असून नवीन ज्ञानाच्या लालसेत सदा आग्रही राहीले पाहिजे असे जेष्ठ पत्रकार अनिकेल कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

वैचारिक मतभेद असणे हे जागरुकतेचे लक्षण आहे. तथापि असे मतभेद एका ठराविक मर्यादेपर्यंत असले पाहिजेत. माध्यमात काम करतांना परस्पर समन्वय व आपआपसातील सौहार्दता तेवढीच महत्त्वाची असते. ही सौहार्दता वाढण्यासाठी सर्व पत्रकार सर्वांशी योग्य समन्वय ठेवतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केला. मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. 

सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सर्व मान्यवर पत्रकारांना गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी दै. गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, दै. नांदेड टाइम्सचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे योगेश लाठकर, प्रकाश काबंळे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी प्रास्ताविक केले तर सर्व पत्रकार संघटनाच्यावतीने राम तरटे यांनी आभार मानले.

00000






सुधारित वृत्त क्रमांक 14

 उजवीकडून चाला हे अभियान

रस्ते अपघातात निष्पाप पादचाऱ्यांचे बळी रोखण्यास प्रभावी

- प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- रस्त्यावर होणाऱ्या अपघातात केवळ वाहन चालकांनाच दोष देऊन चालणार नाही. इतर असंख्य घटक अपघाताला कारणीभूत असतात. रस्त्यावरील पादचाऱ्यांना होणारे अपघात हे वाहनचालक आणि पादचारी या दोघांनी काळजी घेतली तर कमी होऊ शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रस्त्याच्या उजव्या बाजुने चालल्यास समोरून येणाऱ्या वाहनाचा निश्चित अंदाज बांधून पादचाऱ्यांना आपली सुरक्षितता घेता येऊ शकते. यादृष्टिने वॉक ऑन राईट अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला ही मोहिम खूप महत्वाची असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले. 

वॉक ऑन राईट अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला या अभिनव मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. 

वर्षांनुवर्षे आपल्यावर डाव्या बाजुने चालण्याचे संस्कार झाले आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या, वाढलेले महानगरे, लोकसंख्या यांचा समन्वय साधत जर सेवासुविधांचा विचार केला तर रस्त्यावर चालतांना पदोपदी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या-त्या शहरातील उपलब्ध असलेली वाहने नेमकी कोणत्या मार्गाने ये-जा करतात, किती व्यक्तींकडे गाडीबाबतचे आवश्यक कागदपत्रे, वाहन चालक परवाना नुतनीकरणासह उपलब्ध आहे याबाबतचा डाटा असणे आवश्यक आहे. यावरुन त्या-त्या मार्गावरील वाहतुक वर्दळीचा एक निश्चित अंदाज घेता येऊन त्याबाबत नियोजन करता येईल, असे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सांगितले. या डाटासाठी प्राथमिक पातळीवर प्रत्येक कार्यालयाने आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अशी माहिती संकलित करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालण्याबाबत शपथ दिली. कोणत्याही बदलाची सुरूवात ही आपण स्वत:पासून जर केली तर त्याचा व्यापक परिणाम आपल्याला दिसून येतो. यासाठी आपल्या वर्तणात बदल करून उजवीकडे चालण्याची सवय प्रत्येकांनी अंगी बिंबवण्याची अत्यावश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी यावेळी अभियानाला शुभेच्छा दिल्या. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी आपल्या प्रास्ताविकात या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. तर आभार प्रदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले. 

उजव्या बाजूने चालत रॅलीद्वारे

विद्यार्थ्यांनी दिला कृतीशील संदेश

या अभियानाच्या निमित्ताने आयोजित रॅलीस एनसीसी, स्काउट आणि इतर विद्यार्थी-विद्यार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी कार्यालय येथून दोन मार्गावर जाणाऱ्या रॅलीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज व मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात केली. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविला.

0000








                                     औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

विभागीय आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

 

                  औरंगाबाद, दि.5, (विमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-2022 कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीसंदर्भातील मतदारांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी विभागीय स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियत्रंण कक्षात 0240-2343164 या दुरध्वनी क्रमांक व deg.aurangabad@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करता येणार आहे.

 

                  नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी, कर्मचारी  दुरध्वनीवर व व ई-मेलवर प्राप्त होणारे सर्व तक्रारी, संदेश स्वीकारतील व तात्काळ नोंदवहीत नोंद घेतील. महत्वाचे व तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असणाऱ्या संदेशाची माहिती दूरध्वनीवरुन वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. असे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 1 जानेवारी, 2023 पासून स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष निवडणुक प्रक्रिया संपेपर्यंत कार्यरत असणार आहे.

*****

 विभागस्तरावरील लोकशाही दिन

निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द

 औरंगाबाद (विमाका) दि 5 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे औरंगाबाद विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आचार संहितेमुळे 9 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त जगदिश मिनियार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा

 

औरंगाबाद, दि.5, (विमाका) : भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर, 2022 च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ओरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार, 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत मतदान व गुरूवार, 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.

 

                  या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून, 2011 च्या शासन निर्णयानुसार या निवडणुकीच्या मतदारांना एक दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

*****

 

राज्यातील खाजगी चित्रीकरण

स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन    

मुंबई, दि. ४ : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक  अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे.

महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल.

अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट देता येईल.  गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

******

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...