Friday, January 6, 2023

 वृत्त क्रमांक 15 

मराठी पत्रकारितेचा पारदर्शी वारसा जपण्यासाठी कटिबद्ध होणे आवश्यक

-   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

· सर्व पत्रकार संघटना व प्रशासनाच्यावतीने पत्रकार दिन साजरा 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- समाजातील विविध घटनांचे प्रतिबिंब माध्यमात उमटावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या वृत्तपत्राला दर्पण हे नाव निश्चितच विचारपूर्वक दिलेले असेल. दर्पण म्हणजे प्रतिमा, दर्पण म्हणजे किरणांचे पृथ्थकरण, समाजात घडणाऱ्या घटनांविषयी अभ्यास करुन केलेले विवेचन असेही आपल्याला म्हणता येईल. वृत्तपत्राचा पारदर्शी वारसा आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिला असून हा वारसा तेवढयाच समर्थपणे जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

दर्पण दिनानिमित्त आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, संपादक केशव घोणसे पाटील, संतोष पांडागळे यांच्यासह विविध मुद्रीत, ईलेक्ट्रॉनिक, छायाचित्रकार माध्यम प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 

माध्यमातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण अनेक बदल अनुभवत आहोत. एखाद्या घटनेबद्दलचे भाष्य समाजाच्या तळागाळापर्यत काही मिनिटात पोहचविणे शक्य झाले आहे. याचाच अर्थ आपल्यावरची विश्वासाहर्ततेची जबाबदारी वाढली आहे. एका बाजूला अभिव्यक्तीमुळे आपल्याला स्वातंत्र्य असले तरी या स्वातंत्र्याचे मूल्य जपण्यासाठी माध्यमातील प्रतिनिधीनी आपली आचारसंहिता तयार करुन त्याचा सन्मान केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. 

पत्रकारितेच्या क्षेत्रात अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तीचा ग्रंथालयाशी अधिक संपर्क असेल तर लिखानामध्ये अधिक परिपक्वता येवू शकते. नव्या पिढीतील पत्रकारांनी आपले चौफेर वाचन करणे आवश्यक असून नवीन ज्ञानाच्या लालसेत सदा आग्रही राहीले पाहिजे असे जेष्ठ पत्रकार अनिकेल कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

वैचारिक मतभेद असणे हे जागरुकतेचे लक्षण आहे. तथापि असे मतभेद एका ठराविक मर्यादेपर्यंत असले पाहिजेत. माध्यमात काम करतांना परस्पर समन्वय व आपआपसातील सौहार्दता तेवढीच महत्त्वाची असते. ही सौहार्दता वाढण्यासाठी सर्व पत्रकार सर्वांशी योग्य समन्वय ठेवतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केला. मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. 

सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सर्व मान्यवर पत्रकारांना गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी दै. गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, दै. नांदेड टाइम्सचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे योगेश लाठकर, प्रकाश काबंळे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी प्रास्ताविक केले तर सर्व पत्रकार संघटनाच्यावतीने राम तरटे यांनी आभार मानले.

00000






No comments:

Post a Comment

 उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक  नांदेड दि. 15 जानेवारी : नांदेड येथील मूळ निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथ...