Friday, November 10, 2017

लेख_ ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वितरणात नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर

ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वितरणात
नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रणाली अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण ई-पॉस यंत्रणेद्वारे नांदेड जिल्ह्यात करण्यात येत आहे. यामुळे गरजु लाभार्थी कुटुंबाला त्यांचे हक्काचे धान्य मिळत आहे. या तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक झाली आहे. ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वाटपामध्ये नांदेड जिल्हा राज्यात दुसरा तर विभागात प्रथमस्थानी कायम आहे.
ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) यंत्रणेद्वारे बायोमॅट्रीक पध्दतीने सर्व रास्त भाव धान्य दुकानात धान्य वाटपामध्ये नांदेड जिल्ह्यानेही कात टाकली आहे. सार्वजनिक वितरण संगणकीकरण प्रणाली अंतर्गत शासनस्तरावरुन धान्य वाटपाबाबत अचुकता येण्यासाठी गरजु लाभार्थ्यांना धान्य देऊन त्याची पोच त्यांना तात्काळ प्राप्त होणे शक्य झाले आहे. धान्य वितरण प्रणालीमधील डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रत्येक लाभार्थी कुटूंबांला त्यांच्या हिश्याचे धान्य मिळत आहे. तसेच यामध्ये कोणतीही फसवणूक होत नाही, धान्य दिल्याबाबतची पोच पावती जागेवरच मिळते. कोणत्या लाभार्थ्यांना किती धान्य मिळेल याबाबतची माहिती ग्रामपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत ऑनलाईन दिसणार आहे. ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) या तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम होण्यास मदत होणार आहे, यासाठी गावकऱ्यांची साथ मोठी आहे.  
            तालुका स्तरावर रास्त भाव दुकानदारांना या विषयाचे महत्व पटवून देवून मशीन हाताळणी ते आधारकार्ड व्हेरिफाईड ट्रान्झेक्शन यशस्वी होण्यासाठी दुर्गम भागातील अडचणी  दुर करुन प्रत्येक तहसील कार्यालयात एक सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अचुक पध्दतीने व परिपूर्ण ट्राझेक्शन होण्यात यशस्वी झाले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रणालीतंर्गत ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) द्वारे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात आले आहे.
           
या ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) द्वारे धान्य वितरणाचा शुभारंभ तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते 16 जानेवारी 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गोपाळवाडी येथे पार पडला. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाची शंभर टक्के आधार सिंडींग करण्यात आली आहे. या गावातील शालेय मुलांना महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वाटप करण्यात आले असून लोकशाही दिन, भ्रष्टाचार निर्मुलन, लोकायुक्त, आपले सरकार आदी विषयातील प्रकरणे प्रलंबित नसलेले हे गोपाळवाडी गाव आहे.   
गावकऱ्यांना सार्वजनिक वितरण संगणकीकरण अंतर्गत ई-पॉस  योजनेचे महत्व पटवून देवून, प्रायोगिक तत्वावरील कामे नजीकच्या काळात सर्व दुकानांसाठी अंमलात आणुन लाभार्थ्यांसाठी अधिक सुलभता व पारदर्शकतेकडे पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यात या मशिनद्वारे धान्य घेतलेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन बक्षिस मिळणार आहेत. याबाबत जनसमुदायामध्ये जनजागृती करुन योजनेचा हेतू साध्य करण्यात येणार आहे. अशी ही अविस्मरणीय तंत्रणाची वाटचाल सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण सद्यस्थितीला रास्त भाव दुकानांची संख्या 1 हजार 988 असून रास्त भाव दुकानानुसार ई-पॉस मशिन वाटप करण्यात आले आहे. मार्च 2017 पासून ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटपास सुरुवात झाली आहे.
नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथील दुकानदार डी. आर. चिटमलवार  यांच्या दुकानातील कार्डधारक 292 आहेत. येथील माधव शिंदे यांनी या प्रणालीबाबत आम्ही खूप समाधानी असून खऱ्या गरजू लाभार्थ्यांनाच लाभ मिळतो आहे. आम्हाला लगेच त्याची पावती जसे की, योजनेतून किती धान्य वाटप झाले याची माहिती आमच्या हातात येते. गोर-गरिबांसाठी शासनाने उचलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वितरण व्यवस्था संगणकीकृत करण्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले असून सर्व प्रशासकीय यंत्रणा, रास्त भाव दुकानदारांच्या सहकार्यामुळे या प्रणालीचा वापर यशस्वी ठरु शकला आहे.
- काशिनाथ आरेवार,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड .
स्वातंत्र्य सैनिकांशी जिल्हाधिकारी
 डोंगरे यांनी केली मनमोकळी चर्चा  
            नांदेड, दि. 10 : - स्‍वातंत्र्य सैनिकांची जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आस्‍थेने विचारपुस करुन त्‍यांच्‍याशी मनमोकळी चर्चा केली. त्‍यांच्‍या अडी-अडचणी जाणुन घेतल्‍या. यावेळी स्‍वातंत्र्य सैनिकांनी हैद्राबाद मुक्‍ती संग्रामातील त्‍यांचे व्‍यक्‍तीगत अनुभव सांगितले. शहरातील ज्येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिकांची सदिच्‍छा बैठक जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी नुकतीच घेतली. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी यांची उपस्थिती होती.
राज्‍य शासन स्‍वातंत्र्य सैनिकांना केंद्र शासनाच्या स्‍वातंत्र्य सैनिकांप्रमाणे महागाई भत्‍ता लागु करावा. स्‍वातंत्र्य सैनिक वैद्यकीय प्रतिपुर्ती मर्यादा 10 हजार रुपयाच्‍या ऐवजी 25 हजार रुपये करावा. परिवहन महामंडळाच्‍या बसेसमध्‍ये कायम स्‍वरुपी दोन जागा राखीव ठेवणे. स्‍वातंत्र्य सैनिक पाल्‍यांना उद्योग सुरु करण्‍यासाठी कमी व्‍याजदराने कर्ज देण्‍याची योजना आणणे आदी मागण्‍यांबाबत जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सकारात्‍मक प्रतिसाद देऊन त्‍याबाबत शासनस्‍तरावर पाठपुरावा करण्‍यात येईल, असे सांगीतले.
            जिल्‍हाधिकारी यांनी स्‍वातंत्र्य सैनिकांना प्रथमच अशा प्रकारे स्‍वतंत्ररित्‍या वेळ दिल्‍यामुळे उपस्थित स्‍वातंत्र्य सैनिकांनी समाधान व्‍यक्‍त करुन जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांचे आभार मानले. बैठकीस जेष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक नारायणराव भोगावकर, शिवानंद राहेगावकर, पी. के. कदम, बालाजीराव जोशी, प्रभाकरराव नांदुसेकर, गुलाबसिंघ जहागिरदार, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.

000000
जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक   
            नांदेड, दि. 10 :- पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार 13 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2.30 वा. आयोजित करण्यात करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न होणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  अरुण डोंगरे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नांदेड यांनी केले आहे.

00000
"आयसीडीएस" आठवडा
साजरा करण्याच्या सुचना    
नांदेड, दि. 10 :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना आठवडा 14 ते 19 नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषगांने जिल्ह्यात संबंधीत विभागाने महिला व बाल विकास विभागाच्या परिपत्रकात दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
या कार्यक्रमामध्ये मुलांसाठी कार्यक्रम, बालकांचे आपापसात स्वयंस्फुर्ततेने आदान-प्रदानाबाबत प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये समंजस्याची भावना आणि कुपोषणाचे परिणाम अंगणवाडी स्तरावर समजावून सांगणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी क्षेत्रात अहिंसा संदेशाचा प्रसार करणे व बालकांचा आणि महिलांचा समावेश करुन त्यांना या कार्यक्रमात केंद्रित करणे, तसेच अंगणवाडीमध्ये बालकांची आरोग्य तपासणी झालेली आहे. पुर्व शालेय शिक्षणाची प्रगती, अंगणवाडीचे बांधकाम झालेले आहे काय, गरम ताजा आहाराचा पुरवठा योग्य प्रकारे होत आहे, त्याचप्रमाणे बालकांचे अतितीव्र कुपोषित कमी वजनाची बालके शोधून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, नागरिकांना पौष्टिक आहाराबाबत माहिती व नियमित जेवणात पौष्टिक आहाराचा समावेश करुन, पौष्टिक आहार घेण्याचे महत्व पटवून देणे व पौष्टिक आहार घेण्यास प्रोत्साहन देणे इत्यादीबाबत कार्यक्रम हाती घ्यावेत. हा आठवडा सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात व नागरिकांनाही या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घ्यावे, असे शासन परिपत्रकात नमुद केले आहे.

00000
शासनास जमीन विक्रीसाठी तयार
असणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करावेत
            नांदेड, दि. 10 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यान्वित शासकीय मुलींचे वसतिगृह देगलूर व मुखेड तालुक्याच्या ठिकाणी शहरालगत बहुसंख्य शैक्षणिक संस्था कार्यरत असलेल्या आणि विशेषत: मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे होईल, अशा ठिकाणी इमारत बांधकामासाठी प्रत्येकी चार एकर जमिन खरेदी करावयाची आहे.
            इच्छूकांनी सातबारा उतारा व जमीन मालकाचे संमतीपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड यांच्या नावे अर्ज करावेत. अधीक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा, असे अवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त नांदेड यांनी केले आहे

00000
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या
पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
नांदेड, दि. 10 :- संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी सीडीएसची परीक्षा 4 फेब्रुवारी 2018 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2017 अशी आहे. परीक्षेची जाहिरात 8 नोव्हेंबर 2017 रोजी रोजगार समाचारमध्ये आणि संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचे www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
सीडीएस परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 18 नोव्हेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018 या कालवधीत सीडीएस कोर्स क्र. 55 चे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे मंगळवार 13 नोव्हेंबर 2017 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावरील recruitment tab ला क्लीक करुन त्यामध्ये सीडीएस-55 कोर्ससाठी उपलब्ध महत्वाच्या तारखा व चेक लिस्ट सोबत असणारी सर्व परिशिष्टांचे अवलोकन करुन त्यांना डाऊनलोड करुन त्याची दोन प्रतीतमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.

000000
जिल्हा रुग्णालयास
जिल्हाधिकारी डोंगरे यांची भेट
नांदेड, दि. 10 :- येथील जिल्हा रुग्णालयास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी भेट देऊन रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.  
रुग्णालयातील अपघात विभागास जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी भेट देवून रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर रुग्णालयातील शस्त्रक्रिया, एनसीडी, नेत्र, अस्थिरोग, किशोरवयीन स्वास्थ्य, प्रेरणा प्रकल्प विभाग, दंतरोग, स्त्री रोग, प्रयोगशाळा, औषधी या विभागास भेट देऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात संबंधित सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

000000
हरभरा, गहु बियाणाचा
ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम  
नांदेड, दि. 10 :- रब्बी 2017 हंगामात नांदेड जिल्हयासाठी कृषि आयुक्तालय तसेच महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने हरभरा गहु या पिकाच्या प्रमाणीत बियाणे ग्राम बिजोत्पादनाद्वारे अनुदानित तत्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेतील बियाणे महाबीजचे विक्रेता उपविक्रेता यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. आल्लमवार यांनी केले आहे.
            नांदेड जिल्हयासाठी हरभरा पिकामध्ये 1 हजार 185 क्विंटल गहु पिकामध्ये 858 क्विंटल लक्षांक दिलेले असुन योजनेचे इतर ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत. गावाची आणि लाभार्थी शेतकऱ्यांची निवड जिल्हा स्तरावर कृषि विभागाचे संबंधित अधिकारी जिल्हा व्यवस्थापक महाबीज यांनी संयुक्तपणे समन्वयाने करावयाची आहे. लाभार्थी शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा, आधारकार्ड  यांचे झेरॉक्स प्रतिसह स्वसाक्षांकीत भ्रमणध्वनी क्रमांक यांचेसह शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रवर्ग निहाय प्राप्त निधीनुसार सर्वसाधारण प्रवर्ग 35 टक्के, अनुसूचित जाती  35 टक्के आणि अनुसूचित जमाती 30 टक्के या प्रमाणे प्रवर्ग निहाय शेतकऱ्यांची लाभार्थी निवड यादी तयार करण्यात येईल. निवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत कडधान्य (हरभरा) गळीतधान्य (भुईमुग) बियाणेसाठी 60 टक्के तृणधान्य (गहू) बियाणेसाठी 50 टक्के अनुदानीत दराने स्त्रोत बियाणे पुरवठा करावयाचा आहे. म्हणजेच एका एकरसाठी 20 किलो हरभरा किंवा 40 किलो गहु पुरवठा अनुदानावर करावयाचा आहे. जर त्या शेतकऱ्याचे क्षेत्र 40 आर पेक्षा कमी असेल तर त्याला हा लाभ देता येणार नाही.
कडधान्य-हरभरा-स्त्रोत बियाणे किमतीच्या जास्तीत जास्त 60 टक्के किंवा 4 हजार 800 रुपये प्रति क्विं. याप्रमाणे जे कमी असेल ते  तृणधान्य-गहू-स्त्रोत बियाणे किमतीच्या जास्तीतजास्त 50 टक्के किंवा 1 हजार 600 रुपये किंवा प्रति क्विं. या प्रमाणे जे कमी असेल ते. निवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि खात्यामार्फत बियाणे खरेदी करण्याचे परमीट दयावयाचे आहे. बियाणे परमीटचा पुरवठा महाबीज यांचेकडून करण्यात येईल. या योजनेतील बियाणे महाबीजचे विक्रेता उपविक्रेता यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन केले आहे.
हरभरा गहु बियाण्याचे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमाकरीता विक्री दर, अनुदान हंगाम रब्बी 2017
पिक व जात
पॅकिंग साईज किलो
विक्री दर रुपये क्विं.
अनुदान प्रति क्विंटल
लाभार्थी शेतकऱ्यांसाठी
अनुदान विक्री किंमत प्रति क्विं.
अनुदान विक्री किंमत प्रति पिशवी
हरभरा विजय, आयसीसीव्ही-37
20
9,000/-
4,800/-
4,200/-
840/-
गहू लोक-1 जिडब्ल्यु-496
40
3,200/-
1,600/-
1,600/-
640/-
फुले नेत्रावती, एचआय-1544, एमअसीएस-6478, युएस-428
20
3,500/-
1,600/-
1,900/-
380/-

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...