Tuesday, December 20, 2016

कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांची
 हरभरा पीक प्रात्यक्षिकास भेट
नांदेड, दि. 20 :-  कृषि विभागाकडून बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे चालु रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सुधारित तंत्रज्ञानावर आधारित हरभरा पिकाचे पक प्रात्यक्षिक शंभर हेक्टर व आत्माअंतर्गत भाजीपाला पीक प्रात्यक्षिक 20 एकर क्षेत्रावर राबविण्यात आल आहे. या प्रात्यक्षिकास परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ. बि. वेंकटेश्वरलू यांनी भेट देऊन पाहणी केली.
कुलगुरू यांनी भेटी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून पिकाविषयी मार्गदर्शन केले. प्रत्यक्षिकाबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी प्रत्यक्षिकाबाबत माहिती दिली.  कृषि विद्यापीठ विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी.  भोसले यांनी शेतकऱ्यांना पीक संरक्षणबाबत मार्गदर्शन केले. यावेळी  कृषी विद्यापीठाचे कार्यकारी समिती सदस्य केदार पाटील साळुंके, शेतकरी, तालुका कृषी अधिकारी लतीफ शेख , कृषि सहायक श्री. हांडे आदी उपस्थित होते.

000000
जागतिक अपंग दिनानिमित्त
दिव्यांग विद्यार्थ्यांचा आज सांस्कृतिक कार्यक्रम
नांदेड, दि. 20 :-  जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक सोहळा बुधवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, जिल्हा परिषदेचे सभापती दिनकर दहीफळे, संजय बेळगे, वंदना लहानकर, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, प्रकल्प संचालक भातलवंडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास दिव्यांग विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.

000000
दिव्यांग विद्यार्थीही राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होतील
-        जिल्हाधिकारी काकाणी  
नांदेड, दि. 20 :- दिव्यांग विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार यश मिळवून आम्ही सामान्य विद्यार्थ्यांच्या मागे नाही हे अनेकवेळा दाखवून दिले आहे. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते देशपातळीवरही यशस्वी होतील असा विश्वास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला.
जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने आज जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मैदानी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी पद्माकर केंद्रे, समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, कार्यकारी अभियंता लांडेकर, शिंदे, समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांतही सुप्त गुण दडलेले असतात अशा विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांचे वैशिष्ट्यपुर्ण सादरीकरण करावेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सहानुभुती बाळगू नका, त्यांना सक्षम समजून सहकार्य करा.
प्रास्ताविकात समाज कल्याण अधिकारी सुनिल खमीतकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते गोळाफेक स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळवणारा लोहा येथील अंध विद्यालयाचा विद्यार्थी शुभम बुरांडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशेष शिक्षक मुरलीधर गोडबोले यांनी केले. तर आभार यादव साळुंके यांनी मानले कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

000000
मुदखेड आयआयटीआयमधील
पदांच्या भरतीबाबत आवाहन
नांदेड, दि. 20 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुदखेड येथे शिल्पनिदेशक कारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर तत्वाभ्यास (थेअरी) (प्रात्यक्षिक) शिकविण्यासाठी भरावयाचे असून इच्छूक पात्र उमेदवारांनी बुधवार 28 डिसेंबर 2016 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुदखेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य ए. डी. वाळके यांनी केले आहे.
जोडारी, Employability Skills या व्यवसाकरीता संबंधीत ट्रेडमधील मेकॅनिकल अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणी पदवी व एक वर्षाचा अनुभव, पदविका व एक ते दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र N.C.V.T / A.T.I. परिक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. C.T.I उत्तीर्ण उमेदवारास व आयटीआय संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या शिल्पनिदेशक, गणित चित्रकला निदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच शिल्प निदेशकसाठी एमबीए, बीबीए पदवी व दोन वर्षाचा अनुभव समाजशास्त्र पदवी व दोन वर्षाचा अनुभव तसेच पदविका दोन वर्षाचा अनुभव राहणे आवश्यक आहे. बुधवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. संस्थेत उपस्थित रहावे. उशिरा आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शेतकऱ्यांसाठी
फळे, भाजीपाला, मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धा
नांदेड, दि. 20 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत मंगळवार 27 ते शुक्रवार 30 डिसेंबर 2016 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतातील फळे, भाजीपाला पिकाचे उत्कृष्ट नमुने आणून ठेवावीत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. विजेत्या शेतकऱ्यांना प्रथम बक्षीस रुपये 4 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 3 हजार रुपये, तृतिय बक्षीस 2 हजार रुपये असे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांना फळे, भाजिपाला स्पर्धेत फळे, भाजीपाला, मसाला पिके यापैकी एकाच नमुन्यासाठी बक्षीस मिळेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेला चांगल्या प्रतीचा एकच नमुना आवश्यक त्या कागदपत्रासोबत आणावा. फळे, भाजीपाला, मसाला पिकाच्या नमुन्यांसोबत शेतकऱ्याचा अर्ज अनिवार्य आहे. सात/बारावर पिकाची नोंद असावी. सात/बारावर नोंद नसल्यास संबंधीत तालुक्यातील कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यापैकी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे प्रमाणपत्र स्वाक्षरी व शिक्यासह असावे. शेतकरी नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असावा. प्रत्येक नमुना देतेवेळी बोरे, गाजर, पेरु, आवळा, चिंच, टोमॅटो, वांगी, वाटाणा, पानकोबी, कांदा, मिरची, मुळा, फुलकोबी, काकडी, भेंडी, कारले, दोडका, शिमला मिरची, पालक, शेवगा, हळद, अदरक इत्यादी नमुन्याचे वजन हे किमान एक किलो असावे. पपई नमुने किमान तीन नग, काशीफळ व भोपळा नमुना किमान एक नग असावा. सिताफळ, रामफळ, मोसंबी, संत्रा, पेरु, लिंबु, डाळींब इत्यादी नमुना असल्यास किमान 5 नग असावेत. प्रत्येक वाणात किमान 5 स्पर्धक असणे बंधनकारक आहे. तेवढे स्पर्धक नसलया त्या पिकासाठी स्पर्धा रद्द करण्यात येणार आहे. बक्षीसाची रक्कम डीडीद्वारे संबंधीत पंचायत समितीमार्फत देण्यात येईल. बक्षीस वितरणापुर्वी संबंधीत पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेमार्फत लागवड असलेल्या प्लॉटची तपासणी करण्यात येईल व त्यानंतरच बक्षीस वितरण होईल.
शेतकऱ्यांनी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील प्रदर्शन व स्पर्धेत जास्तीतजास्त सहभाग घेण्यासाठी स्वत:च्या शेतातील फळे, मसाला पिके व भाजीपाल्याचे नमुने माळेगाव यात्रेत कृषि विभागाच्या स्टॉलवर मंगळवार 27 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत घेवूत यावेत. शेतकऱ्यांनी सहभाग वाढविण्यासाठी संबंधीत पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांकडे रविवार 25 डिसेंबर 2016 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...