Monday, July 12, 2021

 

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह

मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाची शक्यता 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 12 ते 16 जुलै या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करु नये याबाबत पुढीलप्रमाणे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्याने नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.

 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईप लाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे टाळावे. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नये. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

00000

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी   

पीक विमा कंपनीस तात्काळ माहिती कळवावी

- जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  नांदेड जिल्‍हयात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्‍टी झाली आहे. त्‍यामुळे नदी नाल्‍यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्‍या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्‍ये कळवावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्‍यास, भुस्‍खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्‍तीमुळे नुकसानग्रस्‍त झाल्‍यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्‍तरावर पंचनामे करुन निश्चित करण्‍यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्‍या पावसामुळे पाण्‍याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन, शेत दिर्घकाळ जलमय राहिल्‍यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्‍यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. 

विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्‍या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्‍यासाठी पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्‍ले स्‍टोअर वरुन Crop Insurance  हे अॅप डाउनलोड करुन त्‍यामध्‍ये आपल्‍या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri@iffcotokio.co.in या पत्‍यावर ई-मेलवर नुकसानीची पुर्वसुचना दयावी किंवा कृषी विभाग व महसूल विभागास याबाबत माहिती कळवावी, असेही आवाहन केले आहे.

000000


 

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 984 अहवालापैकी  4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 332 एवढी झाली असून यातील 88 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 53 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, कंधार तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 4 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, कंधार तालुक्यांतर्गत 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 53 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12,  किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 136 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 31 हजार 718

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 28 हजार 615

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 332

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 775

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.20 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-73

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-53

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1                       

00000

 

जिल्ह्यातील 71 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 71 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 13 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, उमरी या 5 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड, ग्रामीण रुग्णालय मुदखेड, नायगाव या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 34 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 4 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 11 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 78 हजार 669 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 12 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 53 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 32 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

शहरासह गावातील मिळकत पत्रिकांचे उतारे आता ऑनलाईन उपलब्ध 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड शहरासह जिल्ह्यातील इतर गावातील जेथे गावठाण भुमापन झाले आहे अशा गावठणामधील मिळकत पत्रिकांसाठी आता नागरिकांना उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जाच्या कार्यवाहीबाबतची माहिती https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi/ महाभुलेख या संकेतस्थळवर उपलब्ध केली आहे. उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मिळकत पत्रिकांची नक्कल काढणे व फेरफारसाठी केलेल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी महाभुलेख संकेतस्थळांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख श्रीमती एस. पी. सेठिया यांनी केले आहे. 

ईज ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत भुमी अभिलेख विभागात Epcis प्रकल्प राबविण्यात आला असून त्याअंतर्गत नांदेड शहरासह नांदेड जिल्हयातील एकुण 212 गावांच्या 1 लाख 45 हजार 21 मिळकत पत्रि‍कांचे डिजीटल सिग्नेचर झाले आहे. या डिजीटाईज मिळकत पत्रिकांचे उतारे नागरिकांना आता ऑनलाईने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या वेबसाईटवर पाहण्यासाठी तसेच त्याचे उतारे घेण्यासाठी उपलब्ध आहेत. मिळकत पत्रिकांची उतारे घेण्यासाठी आता नागरिकांना कार्यालयात येण्याची व अर्ज देण्याची आवश्यकता नाही. वेबसाईटवर विहित शुल्क भरणा करुन त्याचे उतारे नागरिकांना घरीच घेता येणार असून ते सेतु केंद्रावरही उपलब्ध होतील. सध्याच्या कोविड-19 च्या काळात नागरिकांना याचा चांगला लाभ होणार आहे. 

मिळकत पत्रिकांची नक्कल घेण्यासाठी आता नगर भूमापन कार्यालयात किंवा उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. आपण कोणत्याही ठिकाणी मिळकत पत्रिकांची नक्कल एका क्लिकवर हस्तगत करुन घेऊ शकता. महाभुलेख संकेतस्थळ https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr वरुन डिजीटल स्वाक्षरी झालेले संगणीकृत मिळकत पत्रिकांची नक्कल नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

नागरीकांनी फेरफारसाठी नगर भुमापन कार्यालय किंवा उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज कार्यालयामार्फत ऑनलाईन भरणा केला जातो. या अर्जाच्या कार्यवाहीबाबतची माहिती नागरिकांना संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 56.2 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात सोमवार 12 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 56.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 134.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात सोमवार 12 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 120.1 (162.5), बिलोली- 67.8 (160.4), मुखेड- 48.7 (125.2), कंधार- 65.1 (113.4), लोहा- 73.7 (121.7), हदगाव-34.2 (108.5), भोकर- 46 (133.2), देगलूर- 52.3 (111.1), किनवट- 10.4 (138.8), मुदखेड- 74.1 (142.7), हिमायतनगर-20.6 (115.5), माहूर- 2.5 (117.8), धर्माबाद- 76 (181.6), उमरी- 63.6 (180.8), अर्धापूर- 97.3 (144.2), नायगाव- 41.2 (141.2) मिलीमीटर आहे.

0000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...