Thursday, July 15, 2021

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

यापूर्वी पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत 15 जुलै दिली होती. तथापि महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाला एवढ्या अल्पमुदतीत शेतकऱ्यांना पिक विमा काढणे कठीन असल्याचे निदर्शनास आणून यात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मुदतवाढ करीत असल्याचे भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

*****

 

निसर्गालापूरक अशा पद्धतीनेच विकास योजनातील नव्या इमारतींची रचना आवश्यक

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

 

·         जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा 

नांदेड, दि. 15 (जिमाका) :- विविध विकास योजनेंतर्गत शासन जनतेच्या कल्याणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देते. या सोई-सुविधांच्या नियोजनासाठी, आरेखन व वास्तू स्थापत्यासाठी पुरेसा वेळही दिला जातो. तथापि यात आता जुन्याधरती पेक्षा नवीन कालसुसंगत व पर्यावरणपूरक इमारतींच्या रचनांवर अधिक भर देऊन ग्रीन बिल्डींगची संकल्पना वृद्धींगत करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आकारास येऊ घातलेला बांबू प्रकल्प, शंभर खाटांचे रुग्णालय, ग्रामीण भागात प्रस्तावित करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि जलसिंचनाच्यादृष्टिने आवश्यक असलेल्या जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विकास कामांबाबत त्यांनी संबंधित विभागाकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

भोकर येथे उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांचे रुग्णालय हे अधिकाधिक निसर्गपूरक कसे करता येईल यावर अभियंत्यांनी भर दिला पाहिजे. पुरेसा प्रकाश, मोकळी हवा, उष्णतेला कमी करण्यासाठी निसर्गपूरक रचना ही बदलत्या पर्यावरणपूरक इमारतीची परिभाषा आहे. अलिकडच्या वर्षात आपोलो व अन्य हॉस्पिटलनी अत्यंत कुशलतेने त्यांचे वास्तुस्थापत्य, प्लॅन्स तयार केले आहेत. अशा धर्तीवर शासनाच्या हॉस्पिटलच्या इमारती का असू नयेत अशा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी वेळप्रसंगी याच्या नियोजनाचे काम इतर वास्तुशास्त्रज्ञांकडून करुन घेण्याचे निर्देश दिले. 

नारवट येथील बांबू प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. या प्रकल्पाची पायाभूत नियोजनाच्यादृष्टिने सर्व पूर्तता झाली असून प्रकल्पातील हस्तकला, प्रशिक्षण, प्रदर्शन, विक्री केंद्र इमारतीचा पहिला टप्प्याचे काम लवकरच सुरू करू असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक कामातील गुणवत्ता ही राखली गेलीच पाहिजे. इमारतीच्या वास्तुस्थापत्यामध्ये कोणत्याही त्रुटी असता कामा नयेत. याबाबत प्रत्येक विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.

*****      




 

कांडली पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन    

नांदेड (जिमाका) दि. 15 :- भोकर तालुक्यातील कांडली येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 इमारत बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वा. संपन्न होणार आहे. 

यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, भोकर पंचायत समितीच्या सभापती सौ. निता व्यंकटेश रावलोड, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता अन्य मान्यवर आणि पंचक्रोशीतील पशुपालकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून हा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली.

0000

 

नांदेड जिल्ह्याच्या कोविड-19 व्यवस्थापनाचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केला गौरव

 नांदेड येथे बालकांच्या कोविड-19 वर कार्यशाळा संपन्न

 संभाव्य कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आढावा

नांदेड, दि. 15 (जिमाका) :- गतवर्षाच्या मार्चपासून सुरू झालेला कालखंड हा सर्वाधिक आव्हानात्मक आणि शासकीय सेवेतील सर्वांसाठी कर्तव्य तत्परतेचा कस लावणारा ठरला आहे. पहिल्या लाटेत आपल्या मराठवाड्यापर्यंतच बोलायचे झाले तर कोविड-19 मुळे चार ते साडेचार हजार लोकांना प्राणास मुकावे लागले. दुसऱ्या लाटेमध्ये सुमारे 11 हजार मराठवाड्यातील व्यक्तींना प्राण गमवावे लागले. स्वाभाविकच प्रशासनाच्या दृष्टीने हा अत्यंत आव्हानात्मक काळ होता. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती धोकादायक वळणावर पोहोचली होती. परंतु जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, खाजगी रुग्णालये व संपूर्ण टीमने मोठ्या कुशलतेने यावर मात करून जिल्ह्याला कोरोना धोक्यातून बाहेर काढले या शब्दात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा प्रशासनाचा गौरव केला. 

लहान मुलांचा कोरोना या विषयावर आज डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. नागेश लोणीकर आणि जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते. 

कोरोनाचे हे आव्हान अजून संपलेले नाही. उलट तिसरी लाट जवळ येऊन ठेपली आहे. विशेषत: लहान मुलांसाठी ही लाट धोकादायक असल्याची भिती वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टिने शासनाच्या सर्व संबंधित विभाग, आरोग्य विभाग, बालरोग तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी अतिशय दक्ष होऊन युद्ध पातळीवर काम करण्यासाठी सज्ज व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.  

कोविड-19 च्या प्रादुर्भावाबाबत नेमके जे होणार नाही असे वाटत होते त्या आव्हानांना प्रत्यक्षात सामोरे जावे लागले आहे. यात रुग्णांनाही असंख्य त्रास सहन करावा लागला. रुग्णांचे नातेवाईक यात सफर झाले. रेमडेसीवीर इंजेक्शनपासून ऑक्सीजन पर्यंत निर्माण झालेली आव्हाने विसरता येणार नाहीत. शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांसह खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी पहिले आलेले अनुभव लक्षात घेऊन अधिक अचूक वैद्यकीय सेवा आणि सुविधा रुग्णांना तात्काळ कशी उपलब्ध करुन देता येईल यावर भर देणे गरजेचे असल्याचे सुनिल केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.

शासकीय सेवेचा भाग म्हणून कर्तव्य सारेच बजावत असतात. परंतु शासकीय सेवेच्या भूमिकेच्यापलिकडे एक मानवी संवेदना आणि आपल्या आयुष्याचे एक ध्येय निश्चित करुन जगणे महत्वाचे आहे. शासनात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या जगण्याच्या ध्येयाला कोविड-19 अंतर्गत जी काही जबाबदारी येत आहे ती स्विकारुन यापुढेही अधिक सचोटीने, तत्परतेने पार पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या चुका झाल्या असतील त्याचेही शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयात कोविड-19 केंद्र चालविणाऱ्या सर्वांनी आत्मपरीक्षण करुन भविष्यात अशा चुका होणार नाहीत याचीही दक्षता घेतली पाहिजे. कोरोना काळातील ही जबाबदारी आव्हानात्मक जरी असली तरी आजची आपली सेवा रुग्णांच्या कित्येक पिढ्यांपर्यंत लक्षात राहिल हे डॉक्टरांनी विसरता कामा नये, असे केंद्रेकर म्हणाले.

दवाखाण्यातील व्हेंटीलेटर व इतर उपकरणे योग्य स्थितीत आहेत की नाहीत याच्या खातरजमेपासून ऑक्सीजनसह इतर औषधे व रेमेडेसीवीर सारख्या इंजेक्शनची मात्रा नेमकी किती व केंव्हा द्यावी याबाबत डॉक्टरांनी दक्षता घेतली पाहिजे. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भावनिकता अधिक असते. या भावनिकतेला वैद्यकीय शिस्तीची जोड द्यावी लागेल. ही जबाबदारी सुद्धा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने जबाबदारीने पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या कार्यशाळेत सादर केल्या जाणाऱ्या विषयांची माहिती व नियोजन आपल्या प्रास्ताविकात सांगितले. नांदेड जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या मोठा जरी असला तरी परस्पर समन्वयातून व विश्वासर्हतेतून शासकिय व खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ मुलांच्या कोरोनाबाबत प्रभावी काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. 

डॉ. नागेश लोणीकर यांनी लहान मुलांमधील कोरोना, डॉ. श्रीराम शिरमाने यांनी मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन, डॉ. संदीप भोकरे यांनी नियोनेट, डॉ. सरफराज अहेमद यांनी ऑक्सीजन डिलेव्हरी सिस्टीम, डॉ. उमेश अत्रात यांनी इनपॉक्ट ऑफ कोविड-19 ऑन चाईल्ड मेंटल हेल्थ यावर भाष्य केले.

******






 

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे                                  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 394 अहवालापैकी  3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 350 एवढी झाली असून यातील 88 हजार 794 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 52 रुग्ण उपचार घेत असून यात एकाही बाधितांची प्रकृती अतिगंभीर नाही. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 3 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, किनवट कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 52 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 19, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 12 व खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 139 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 36 हजार 288

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 33 हजार 66

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 350

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 794

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.20 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-67

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-52

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक                       

00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 10.9 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात गुरुवार 15 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 205.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात गुरुवार 15 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.8 (254.9), बिलोली- 9.3 (268.1), मुखेड- 12.9 (190.8), कंधार- 16.0 (197.5), लोहा- 14.1 (197.9), हदगाव- 4.9 (131.7), भोकर- 3.4 (177.3), देगलूर- 10.5 (188.1), किनवट- 13.8 (207.2), मुदखेड- 13.1 (268.9), हिमायतनगर-5.5 (134.0), माहूर-9.7 (147.4), धर्माबाद-5.5 (221.5), उमरी- 3.6 (268.3), अर्धापूर-15.1 (283.5), नायगाव- 11.1 (219.3) मिलीमीटर आहे.

0000


दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळामार्फत सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार http://reshul.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे. 

सन 2021 मध्ये इयत्ता 10 परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्याने मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता 9 वीचा अंतिम निकाल, इयत्ता 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहेत. त्यानुसार मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे. 

शासन निर्णय 28 मे 2021 मधील तरतुदीनुसार सन 2021 मधील दहावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांना पुढील एक / दोन संधी उपलब्ध राहतील असेही शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

****


जिल्ह्यातील 43 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 43 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शहरी दवाखाना सांगवी, करबला, अरबगल्ली येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, माहूर, मुदखेड, बारड या 5 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय लोहा, उमरी या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 14 जुलै पर्यंत एकुण 7 लाख 4 हजार 667 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 15 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 53 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 32 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000


 

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा कार्यालयाच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

कार्यालयासह प्रयोगशाळेतील जवळपास 20 रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला होता. रक्त संकलन हे श्री गुरुगोविंद सिंघजी सेवा प्रतिष्ठान संचलित गोळवलकर गुरुजी ब्लड बँकेचे तंत्रज्ञ उदय राऊत, राजेश दुडकिकर यांनी संकलन केले. या शिबिरासाठी अनुजैविक तज्ज्ञ श्रीमती संगीता पोपलाईकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावलकर यांच्या हस्ते तंत्रज्ञाचा सत्कार करण्यात आला.

*****



 

भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका-भिंतीपत्रिकेचे विमोचन संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका व भिंतीपत्रिकेचे विमोचन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत नुकतेच करण्यात आले. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत येणाऱ्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला येत्या 16 जुलै रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन यंत्रणेच्यावतीने लिखित भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका व भिंतीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुशीलाबाई हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, समाज कल्याण समितीचे सभापती ॲड रामराव नाईक, शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे, जलव्यवस्थापन समिती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर, प्रणिताताई देवरे-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, आर. व्ही. पवार, श्रीमती पी. सी. जंजाळ, श्रीमती पोपलाईकर, श्री. भवानकर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

भूजल विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सहसंचालक डॉ. पी. एल. साळवे, उपसंचालक बी. एम. मेश्राम यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यातील पदवी व  पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या भूगर्भशास्त्र, भूगोल, कृषी अभियांत्रिकी, कृषी, बांधकाम विभाग याविषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच गावपातळीवरील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, जलसुरक्षक, राष्ट्रीय सेवायोजना व नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, महिला बचत गट, भूजल वापरकर्त्यांना विशेष करून जिल्ह्याची, तालुक्याची, गावाची भूजलाची परिस्थिती, जलचक्र, भूजल उपलब्धता, भूजलाचे पुनर्भरण, भूजलाची गुणवत्ता व भूजलाचे व्यवस्थापन, भूभौतिक पद्धतीने भूजलाचे संशोधन आणि व्यवस्थापन, पारंपारिक व अपारंपरिक उपाययोजना भूजल विषयक जनजागृतीसाठी आदी विषयावर ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन करण्यात आले. 

प्रत्यक्षात नवीन बांधकामे, पेट्रोल पंप, मोठे धाबे, हॉटेल, कृषी साहित्य दुकाने, बाजार समिती, शेतीशी निगडीत सेवा दुकाने व बांधकाम साहित्य दुकाने या ठिकाणी विहीर व विंधन विहिरी पुनर्भरणाचे महत्व व त्याचे फायदे याचा प्रसार केला आहे. विविध संवर्गातील भूजल वापरकर्त्यामध्ये भूजला बद्दल जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुमारे 11 वेबिणार घेण्यात आले असून हे या पुढेही चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले, अशी माहिती भूजल विकास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

0000



  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...