Sunday, February 24, 2019


प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ संपन्न  
जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार 304 शेतकरी कुटुंब पात्र
पहिला हप्ता बँक खात्यात जमा करणे सुरु  
नांदेड, दि. 24 :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेश गोरखपूर येथून आज करण्यात आला. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार 304 पात्र शेतकरी कुटुंबांना 2 हजार रुपयाचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा केला जात आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज संपन्न झाला.
याप्रसंगी मान्यवरांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळत असून शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे सोईचे होईल व कर्ज काढावे लागणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथून होत असलेला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ व मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.  
उत्तरप्रदेश गोरखपूर येथे प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हप्त्यात 6 हजार रूपये मिळणार आहेत. या पैशातून बी-बियाणे, खते, कृषी अवजारे इत्यादी शेतीशी निगडीत बाबींचा प्रश्न सुटू शकणार आहे. यामुळे देशातील जवळपास 12 करोड छोटे शेतकऱ्यांना  थेट लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर 75 हजार करोड थेट जमा  होणार आहेत, असे सांगितले.
गोरखपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्यावतीने मुरबाडचे गौतम चिंतामन पवार यांनी प्रतिनिधीत्व केले असून त्यांना  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान क्रेडिटकार्ड देण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.      
या योजनेच्या रविवार 24 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात 1 हजार 575 गावापैकी आठ अ प्रमाणे एकुण खातेदार शेतकरी 7 लाख 95 हजार 800 आहेत. या योजनेत परिशिष्ट अ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलीत झालेली गावांची संख्या 1 हजार 568 असून परिपूर्ण असलेले पात्र शेतकरी कुटुंब 2 लाख 89 हजार 351 एवढी आहेत. त्यापैकी 1 हजार 510 गावांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. माहिती अपलोड केलेली पात्र शेतकरी कुटुंब 2 लाख 60 हजार 304 तर टक्केवारी 89.96 एवढी आहे, अशी माहिती देण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आली आहे.  
 प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकाची तर कृषिनिष्ठ शेतकरी भगवान इंगोले यांनी सेंद्रीय शेतीची माहिती दिली.   
कार्यक्रमास कृषि उपसंचालक माधुरी सोनवणे, तहलिसदार किरण अंबेकर, श्रीमती उज्वला पांगरकर, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, एन. टी. पाटे, कृषि अधिकारी श्रीमती पुनम चातरमल, जिल्ह्यातील विविध ठिकाणचे महिला व पुरुष, कृषि व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभागचंद बोरा, श्री. येमूल, देसाई, संतोष बडवळे, मनोहर, शंकर पवार यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचलन व आभार कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी मानले.
00000


  वृत्त क्र.  696     जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न   नांदेड ,  दि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच...