Tuesday, September 4, 2018


हदगाव येथे 25 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
26 हजार 500 रुपयांचा दंड आकारला  
नांदेड दि. 5 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाकडून हदगाव येथे 4 सप्टेंबर रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 25 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 26 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला.
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, दंत आरोग्यक सय्यद इस्स्लाहूद्दिन, हदगाव उपजिल्हा रुग्णालयाचे दंत शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र तोष्णीवाल, डॉ. आकाश कासटवार तथा समुपदेशक गुडाप्पे व स्थानिक पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उपनि. नासरे व पो कॉ. माहोरे आदी होते.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.
00000


केरळ पुरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे 20 लाखांचा धनादेश
मुंबई, दि. 4 : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेडतर्फे 20 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला.
यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग, चहल सिंग, प्रेमज्योतसिंग चहल, अमरीक सिंग वासरीकर, शेरसिंग फौजी, गुरूंदर सिंग बावा, एकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते.


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आज आयोजन
नांदेड, दि. 4 :- "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  बुधवार 5 सप्टेंबर 2018 रोजी डॉ. करराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायं 3 यावेळात पुणे येथील अमोल दशपूते हे  स्पर्धा परीक्षेतील एन.सी.ई.आर.टी (NCERT) अभ्यासक्रम संदर्भात तर नाशिक येथील सचिन वारुळकर हे केंद्र, राज्य शासनाच्या संरक्षण / गृह विभागामार्फत होणाऱ्या विविध परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000


श्री गणेशोत्सव काळात
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात 13  सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत श्री गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2018 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत ? असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव  यांनी जारी केले आहेत.
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 4 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 ऑगस्ट पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 26 सप्टेंबर 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.  
00000


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर
साहिब मंडळ निवडणुक 2018 साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द
आक्षेप, दुरुस्‍ती असल्यास अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 4 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुक 2018 साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्यात आली आहे. सदर प्रारुप मतदार यादीवर आक्षेप / दुरुस्‍ती/ नाव समाविष्‍ट इत्‍यादी बाबत आक्षेप असल्‍यास मतदारांनी 28 ऑगस्‍ट ते 26 सप्‍टेंबर 2018 या कालावधीत विहीत नमुन्‍यातील फॉर्म- 2 भरुन संबंधीत तहसिल कार्यालयात दाखल करावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त आक्षेप अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
याबाबत आक्षेप किंवा दुरुस्‍तीबाबतचा विहीत नमुन्‍यातील फॉर्म-2 संबंधित तहसिल कार्यालयात तसेच www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडून देण्‍यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी अधिसूचना दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 अन्‍वये मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे संपुर्ण जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा मराठवाड्यातील भाग) येथील महाराष्‍ट्र विधानसभेसाठी दि. 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्‍वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्‍ट शिख धर्मीय मतदारांची मतदार नोंदणी कार्यक्रम 20 जुलै ते 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत फॉर्म-1 नुसार तयार केलेली प्रारुप मतदार यादी मतदार क्षेत्रातील सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व गुरुव्‍दारा तख्‍त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड नांदेडच्‍या सुचना फलकावर प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून 27 ऑगस्‍ट रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. तसेच  संबंधित जिल्‍ह्यातील तहसिल कार्यालयांच्‍या सुचना फलकांवर त्‍या-त्‍या तालुक्‍याची प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.
प्राप्‍त दावे व हरकती / आक्षेप सक्षम अधिकारी जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍या कार्यालयात 27 सप्‍टेंबर ते दिनांक 4 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत निकाली काढण्‍यात येणार आहेत. त्‍यानंतर त्‍या जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्‍या निकालाविरुध्‍द अपिल करण्‍यासाठी सक्षम अधिकारी, विभागीय आयुक्‍त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचेकडे 5 ऑक्‍टोबर 2018 ते 19 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत अपीलार्थींना  व्दितीय अपील दाखल करता येईल. विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांचेकडे 20  ते 26 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत प्राप्‍त अपील निकाली काढण्‍यात येतील. त्‍यानंतर दि. 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होईल, असे जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
00000


कापुस, सायोबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यात कापुस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिला आहे.
कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीसाठी थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम तसेच रसशोषण किडींसाठी बुप्रोफेझीन 15 टक्के अधिक असिफेट 35 टक्के डब्ल्यू पी 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे.
सोयाबीन पिकावर खोडमाशी, उंटअळी तसेच चक्रीभुंग्यासाठी थायमिथोक्झॅम 12.6 अधिक लॅमडा सॅहलोथ्रीन 9.5 झेड सी 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असेही कृषि संदेशात म्हटले आहे.  
00000


आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
8 सप्टेंबर रोजी साजरा होणार
नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यात व नांदेड शहरात 8 सप्टेंबर 2018 हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) यांच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. 
            या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील शाळेत तसेच नांदेड शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांची साक्षरता दिंडी काढण्यात येणार आहे. साक्षरतेचे महत्व विविध माध्यमातून पटवून दिले जाणार आहे. यावेळी शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांमधून साक्षरता दिंडी काढावी व विविध उपक्रम घ्यावेत. गावातील नागरिकांना शिक्षणाचे महत्व पटवून दयावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) यांनी केले आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...