Friday, March 6, 2026

 वृत्त क्रमांक  

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे सोमवारी धर्माबाद येथे आयोजन

नांदेड, दि. 6 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापना मध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 9 मार्च 2026 सकाळी 10 ते 2 पर्यत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar0१@gmail.com दुरध्वनी  क्रमांक02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर १५ व १६ मार्चला जिल्हा कृषी व धान्य महोत्सव

१०० स्टॉलची उभारणी

शेतकरी-ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. ६ मार्च :- कृषि विभाग व आत्मा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हा कृषी व धान्य महोत्सव २०२६” चे आयोजन १५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. हा महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे होणार आहे.

हा महोत्सव नांदेड शहरवासीयांसाठी एक प्रकारची मेजवानी असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतमालाची खरेदी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांचे स्टॉल, विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच कृषी संलग्न शासकीय विभागांचे स्टॉल असे एकूण १०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध विषयांवर शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच सेंद्रीय उत्पादने (गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) विक्रीसाठी उपलब्ध असतील.

याशिवाय मध, गुळाचा पाक, चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज, विविध फळे व भाजीपाला यांची थेट विक्री होणार आहे. तसेच जात्यावर दळलेली सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय भाज्या, रानफळे, लाकडी घाण्यावर तयार केलेले करडई, भुईमूग, जवस व तीळाचे तेल, बांबूपासून तयार वस्तू, केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्रीही करण्यात येणार आहे.

या महोत्सवाला शहर व जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

००००००

वृत्त क्रमांक  

नवीन सेवार्थ प्रणालीचे ई-बील प्रशिक्षण संपन्न   

नांदेड दि. 6 मार्च :- जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली अंतर्गत ई-बील संदर्भात नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण यांचे प्रशिक्षण आज शुक्रवार 6 मार्च रोजी जिल्हा नियोजन सभागृह नांदेड येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणास जवळपास 153 आहरण व संवितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी नविन सेवार्थ प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. 

अप्पर कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली ताटपल्लेवार यांनी नवीन सेवार्थ प्रणालीबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच कनिष्ठ लेखापाल मास्टर ट्रेनर शंकर दुमाने, लेखा लिपीक बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांनीही माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार लेखा लिपीक प्रमोद शिंदे यांनी केले. 

सर्व तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'नवीन सेवार्थ प्रणाली' ई- बिल संदर्भात पुढील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास संबंधित लेखा विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक     पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे सोमवारी धर्माबाद येथे आयोजन नांदेड, दि. 6 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार...