पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
Friday, July 10, 2026
वृत्त क्रमांक
नांदेड येथील विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी
दोषींवर कडक कारवाई केली जाईल - पालकमंत्री अतुल सावे
नांदेड, दि. 10 जुलै : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातील निष्काळजीपणा अथवा संबंधित यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचे आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
घटनेनंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उड्डाणपुलाची संरचनात्मक स्थिरता तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. या घटनेच्या तांत्रिक चौकशीसाठी केंद्रीय पातळीवरील तज्ज्ञांची टीम दिल्लीहून उद्या नांदेड येथे दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी उड्डाणपुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्यात आल्या. रस्त्यावर पडलेला मलबा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला तसेच पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही केली.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उड्डाणपुलाच्या संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या जीविताशी संबंधित कामांमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदार अथवा संबंधित यंत्रणांविरुद्ध चौकशी अहवालानुसार नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
00000
विशेष लेख
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ;
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल
राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 लागू केली आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजार भावातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्याने उभारी देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महत्त्वाची ठरत आहे.
या योजनेची अंमलबजावणी प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत व्हावी यासाठी सहकार विभागाने सर्व व्यापारी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूकपणे संकलित करून शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी बँकांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी मुख्यालय आणि जिल्हास्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, जबाबदार आणि गतिमान होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून, राष्ट्रीयीकृत, वाणिज्य, खाजगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पात्र थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली आहे. आतापर्यंत 2 लाख 7 हजार 635 पात्र थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील पोर्टलवर नोंदविण्यात आला असून, त्यांच्यावरील थकीत कर्जाची रक्कम 2 हजार 222 कोटी 37 लाख रुपये इतकी आहे. ही आकडेवारी या योजनेची व्याप्ती आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दिलाशाचे महत्त्व अधोरेखित करते.
ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा तिचा व्यापक उद्देश आहे. कर्जाचा बोजा कमी झाल्यास शेतकरी नव्या हंगामासाठी आत्मविश्वासाने शेती करू शकतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतील आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक गुंतवणूक करण्यास सक्षम होतील. परिणामी शेतीचे उत्पादन वाढण्यास, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, संबंधित बँका आणि प्रशासनाकडूनही शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. योजनेची पारदर्शक अंमलबजावणी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रशासन-बँकांचा समन्वय यामुळे पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ वेळेत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आर्थिक दिलासा, नव्या आशा आणि शेतीच्या शाश्वत विकासाचा मार्ग प्रशस्त करणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी नवी संजीवनी ठरणार आहे.
अलका पाटील
उपसंपादक
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
00000
वृत्त क्रमांक
बुधवारी लोहा येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड दि. 10 जुलै :- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वीर माधवराव नळगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून वीर माधवराव नळगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर रोड, लोहा येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 15 जुलै, 2026 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्रमांक
सोमवारी शिकाऊ उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड दि. 10 जुलै :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्यावतीने 13 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वा. आयटीआय पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी सर्व इंजिनियरीग ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. तरी आयटीआय पास उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उपरोक्त दिनांकास सकाळी 11 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के. अन्नपुर्णे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड दि. 10 जुलै :- नांदेड जिल्ह्यात 11 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 25 जुलै 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 25 जुलै 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000
वृत्त क्रमांक
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यान्वित ;
सर्व सेवांसाठी वापराचे आवाहन – जिल्हा कोषागार अधिकारी शोभा मुंढे
नांदेड, दि. १० जुलै : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंबंधित विविध माहिती व सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी ‘महा-उपलब्धी (MAHA UPLABDHI)’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले असून, १ जुलै २०२६ पासून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपचा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शोभा मुंढे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या १६ जून २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विकसित करण्यात आलेल्या या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध डिजिटल सेवा सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या ॲपमध्ये मासिक निवृत्तीवेतनाचा तपशील, महागाई भत्त्याचा फरक, आयकर कपात दाखला (फॉर्म क्र. १६), उत्पन्नाचा दाखला (Income Certificate), तसेच निवृत्तीवेतन विषयक शासन निर्णय यांसारख्या महत्त्वाच्या सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंधितांना कोषागार कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
प्रथम टप्प्यातील सुविधांमध्ये Pension Payment History हा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेद्वारे वित्तीय वर्ष २०२४-२५ पासून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई अथवा कोषागार कार्यालयामार्फत अदा करण्यात आलेल्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा सविस्तर तपशील पाहता येणार असून तो PDF स्वरूपात डाउनलोड व जतन करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
या ॲपचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे निवृत्तीवेतनधारकांना Single Digital Platform वर सर्व सेवा उपलब्ध करून देणे, कोषागार व अधिदान कार्यालयातील प्रत्यक्ष भेटी कमी करणे, सुरक्षित व वापरण्यास सुलभ डिजिटल सेवा प्रदान करणे आणि निवृत्तीवेतनासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना वेळेवर उपलब्ध करून देणे हे आहे.
‘महा-उपलब्धी’ ॲपचा User Manual आणि FAQ हे निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीवर तसेच ॲपच्या लॉगिन पृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ॲपच्या वापराबाबतची सविस्तर माहिती तेथे पाहता येणार आहे.
सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेऊन ‘महा-उपलब्धी’ ॲपचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शोभा मुंढे तसेच अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) नामदेव राठोड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती समितीसाठी 30 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि.10 जुलै:- भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी, अमानुष संस्कारातुन रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत असल्याने दिसुन येत आहे. लाखों मानसाचे जीव वाचविण्यासाठी त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व समाजाचे मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी शासनाने जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमजबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
त्यामध्ये अशासकीय 7 सदस्य (त्यात किमान 2 महीला) व जिल्हा समन्वयक यांची नियुक्ती राज्यस्तरीय पीआयएमसी अध्यक्ष व सह अध्यक्ष यांच्या मान्यतेने व आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या सहमतीने करण्यात यावी, असे निर्देश आहेत.
तरी इच्छुक नागरीकांकडुन एकुण 7 अशासकीय सदस्यांकरीता (त्यात किमान 2 महीला) व 01 जिल्हा समन्वयक यांचेकरीता अर्ज मागविण्यात येत असुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड या कार्यालयात शासकीय कामकाज वेळेत आपला अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
पात्र अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
जादुठोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम घेतलेला किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. -पुरावे जोडण्यात यावे (पेपर कात्रणे व फोटो ) जाहीर प्रगटन दिलेल्या तारखेपासुन 06 महीन्याच्या कालावधीतील पोलीस चारित्रय दाखला आवश्यक आहे.
स्वता:च्या गावच्या ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांचेकडील चारित्रय दाखला आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता किमान 10 वी उतिर्ण आवश्यक आहे. आपल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधी यांचे शिफारस पत्र आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्यामधील नांदेड जिल्हयातील रहीवासी असणे आवश्यक आहे. त्याकरीता रहीवासी प्रमाण पत्र (Domicile Certificate) आवश्यक आहे. 02 पासपोर्ट साईजच फोटो अर्जासोबत जोडावे. स्वता:चा परीपुर्ण घरचा पत्ता व संपर्क क्र. अर्जात नमुद करावे. सहायक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे नांवे अर्ज सादर करावे. सदरचे ऑफलाईन अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच आपण अर्ज अशासकीय सदस्यासाठी अर्ज दाखल करीत आहोत कि, जिल्हा समन्वयक करीता याचा स्पष्ट उल्लेख अर्जात करणे आवश्यक आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2026 आहे. जर आवश्यकता पेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ करण्यात येईल असे समाज कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
00000
वृत्त क्रमांक
जिल्ह्यात ११ ते १८ जुलै दरम्यान "जागतिक लोकसंख्या दिन" सप्ताहाचे आयोजन;
"दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर" हे असणार यंदाचे घोषवाक्य
नांदेड दि. 10 जुलै : राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात ११ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत "जागतिक लोकसंख्या दिन" सप्ताह अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या मोहिमेसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे "दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर" हे मुख्य घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ अनपेक्षित गर्भधारणा टाळणे इतकाच मर्यादित नसून, माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुटुंब नियोजनाचे महत्त्व जनमानसात रुजविणे हा आहे. कुटुंब नियोजनाच्या सेवांच्या अनुपलब्धतेमुळे वाढणारी अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या लोकसंख्या सप्ताहामध्ये आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये खालील प्रमुख सेवा व योग्य समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आधुनिक तात्पुरत्या पद्धती: यामध्ये अंतरा इंजेक्शन, छाया गोळ्या, तांबी (IUD) व इतर साधनांचा समावेश आहे.
कायमस्वरूपी पद्धती: पुरुष व महिलांसाठी सुरक्षित नसबंदी शस्त्रक्रिया.
तातडीचे समुपदेशन व आपत्कालीन सेवा
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या व माता-बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे .
000000
वृत्त दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केंद्रीय पथकाकडून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...


.jpeg)
