Monday, April 29, 2019


                        उष्मघातापासून बचाव करण्याचे उपाय

   लातूर,दि. 29 :-  तहान लागलेली नसली तरीसुध्‍दा जास्तीत जास्‍त पाणी पिण्‍यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत; बाहेर जातांना गॉगल्‍स, टोपी, छत्री/बुट व चपलाचा वापर करण्‍यात यावा, प्रवास करताना पाण्‍याची बाटली सोबत घ्‍यावी. उन्‍हात काम करीत असलेल्‍या व्‍यक्‍तींनी डोक्‍यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्‍यात यावा तसेच ओल्‍या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्‍यात यावा. शरीरातील पाण्‍याचा प्रमाण कमी होत असल्‍यास ओआरएस, घरी बनविण्‍यात आलेली लस्‍सी, तोरणी, लिंबू पाणी, ताख इत्‍यांदीचा नियमीत वापर करण्‍यात यावा.
           अशक्‍तपणा, स्‍थुलपणा, डोकेदुखी. सतत येणारा घाम इत्‍यादी उन्‍हाचा झटका बसण्‍याची चिन्‍हे ओळखावित व चक्‍कर येत असल्‍यास तात्‍काळ डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्‍यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्‍यात यावे. तसेच त्‍यांना पुरेसे पिण्‍याचे पाणी दयावे. घरे थंड ठेवण्‍यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्‍यात यावा. रात्री खिडक्‍या उघाडया ठेवण्‍यात याव्‍यात.  पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्‍यात यावा. तसेच थंड पाण्‍याने वेळोवेळी स्‍नान करण्‍यात यावे.  कामाच्‍या ठिकाणी जवळच थंड पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.
        सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्‍यासाठी कामगारांना सुचित करण्‍यात यावे.पहाटेच्‍या वेळी जास्‍तीत जास्‍त कामाचा निपटारा करण्‍यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्‍ये मध्‍ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्‍यात यावा. गरोदर, कामागार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्‍यात यावी. रस्‍ताच्‍या कडेला उन्‍हापासून संरक्षणाकरीता शेट उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्‍यात यावी.
काय करू नये –   
        लहान मुले किंवा पाळीव प्राण्‍यांना बंद असलेल्‍या व पार्क केलेल्‍या वाहनात ठेऊ नये.   दुपारी  १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. गडत, घटृ व जाड कपडे घालण्‍याचे टाळावे बाहेर तापमान अधिक असल्‍यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
      उन्‍हाच्‍या कालावधीत स्‍वयंपाक करण्‍याचे टाळण्‍यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्‍वयंपाक घराची दारे व खिडक्‍या उघडी ठेवण्‍यात यावी. आपल्‍या घराममध्‍ये, कामाच्‍या ठिकाणी अथवा इमारतीमधून बाहेर पडण्‍याचे मार्ग (Escape      Route) जाणून व समजून घ्‍या.आग लागल्‍यास’ लगेच अग्निशमन दलाला फोन (101) करा. जमिनीवर लोळून आग विझविण्‍याचा प्रयत्‍न करा.  आग लागलेल्‍या ठिकाणी असल्‍यास उभे न राहता गुडघ्‍याच्‍या मदतीने निकासा सरकावा.  तोंडावर ओला रुमाल/कपडा ठेवून धुरापासून दूर राहण्‍याचा प्रयत्‍न करा. 
        स्‍वयंपाक घरामध्‍ये विशेष काळजी घ्‍यावी. रात्री गॅस सिलेंडरचा रेग्‍युलेटर बंद करावा. दर सहा  महिन्‍यांनी गॅस नळी बदलावी, स्‍टोव्‍ह, मेणबत्‍ती इत्‍यादी ज्‍वालाग्रही वस्‍तू गॅसपासून दूर ठेवाव्‍यात. विजेच्‍या उपकरणांचा उपयोग करताना Amper ची तपासणी करावी व योग्‍य सॉकेटमध्‍ये वापर करावा. गोदामे, घरातील कोठीघर इत्‍यादी ठिकाणी कचरा तेलकट पदार्थ अथवा जळावू पदार्थ जमा करु नका, निकास मार्ग नेहमी अडथळे विरहित ठेवावे. आगीच्‍या वेळी शांत रहा, तसेच इतरांना शांत करा, आगीपासून विजेचे उपकरणे दूर ठेवा. छोटया आगी पासून संरक्षण करण्‍यासाठी पाणी व वाळूचे बकेट तयार करुन ठेवा.

****


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 29 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.  
दरवर्षी 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 30 एप्रिल 2019 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने रात्री 9.30 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
बुधवार 1 मे 2019 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान पोलिस मुख्यालय वजिराबाद नांदेड. सकाळी 10 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
000000


महाराष्ट्र दिनानिमित्त
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ
नांदेड, दि. 29 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त बुधवार 1 मे 2019 रोजी येथील वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे
बिगरसिंचन पाणी वापराबाबत आवाहन
नांदेड, दि. 29 :- उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात (इसापूर धरण)  सन 2018-19 साठी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी टंचाई कालावधीसाठी नांदेड जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी 35 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. दरवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाकडून जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार बिगर सिंचन पाणी सोडण्यात येते.
आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाकडून पूर्णपणे भरणा केली जात नाही. जुन 2018 अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे 55 कोटी 82 लाख रुपये तसेच सन 2018-19 साठी आरक्षित पाण्याची 50 टक्के अग्रीम पाणीपट्टी  63 लाख रुपये अशी एकूण 56 कोटी 45 लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी 16 लाख रुपये इतका भरणा करण्यात आला आहे.
शासन निर्णय क्र. संकीर्ण-1002 / (208/02) / सिं.व्य.(धो) दिनांक 10 डिसेंबर 2003 अन्वये आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र 1 नांदेड या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...