Monday, February 10, 2025

 वृत्त क्रमांक 168

लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्‍यांची जबाबदारी : अभिजीत राऊत 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत तर अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ साजरा 

नांदेड दि.१० : शासकीय सेवेमध्ये आपण येतो ती लोकांची सेवा करण्यासाठी. लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा विश्वास कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. खरे तर लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असते, असे प्रतिपादन वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भावनमध्ये आज नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत समारंभ व मावळते जिल्हाधिकारी तथा संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ महसूल व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी त्यांनी लोकाभिमुख प्रशासन ही आपल्या प्रशासकीय सेवेची ओळख बनवा, असे आवाहन यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.

नांदेड जिल्ह्यातील आपले वास्तव्य आठवणीत राहणारे असून या काळात जलसंधारणापासून लेंडी प्रकल्पाला गती दिल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. दोन लोकसभा निवडणुका एक विधानसभा निवडणूक, तसेच मराठवाड्यात आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक आंदोलन सुरू असताना जिल्ह्यात शांतता ठेवता आली. कारण एक टीम म्हणून प्रत्येक जण काम करत होते. नव्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत देखील हीच टीम काम करणार असून नांदेडमध्ये आणखीन चांगले काम होईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपण कायम शांततेत राहून काम करत असतो, असे अनेक जण म्हणतात. खरं म्हणजे शांत न राहता काम केल्यास अर्थात डोके गरम ठेऊन काम केल्यास चुका होतात. त्यामुळे जर तुम्हाला चुका करायच्या नसतील तर कोणी कितीही डिवचले तरी त्याला बळी न पडता काम करा. खरं म्हणजे प्रशासकीय पदांवर प्रमुख असणाऱ्या माणसाने शांततेनेच काम केले पाहिजे. कारण तुम्ही जर अस्वस्थ झालात तर अन्य कामावर त्यांचा परिणाम होतो.

नांदेड मध्ये गेल्या अडीच वर्षात अनेक चांगली कामे झाले. शासन आपल्या दारी, महासंस्कृती महोत्सव, लाडकी बहीण मेळावा अशी मोठ मोठे कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या टीमवर्कने पार पडले. नांदेडच्या या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे तयारी नसेल तरीही टीम भारी काम करून दाखवू शकते. नव्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा अशाच पद्धतीने कामे सुरू राहावी अशा शुभेच्छा ही त्यांनी व्यक्त केल्या.

नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी अभिजीत राऊत सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा कित्ता गिरवायला मिळणार याचा आनंद आहे .त्यांच्याकडून आपण नेहमीच मार्गदर्शन घेत होतो. प्रशासकीय स्तरावर ते कायम मार्गदर्शक राहिले आहे. आता त्यांचेच उत्तराधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यासारखे काम करणे ही जबाबदारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या निरोप समारंभाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आई-वडील व त्यांच्या पत्नी, त्यांचे आई-वडील उपस्थित होते. याशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रमुख अनेक ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुगाजी काकडे यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी संबोधित केले. तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ही मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन तहसीलदार नागमवाड यांनी केले.

000

 







  वृत्त क्रमांक 167

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नांदेड, दि. १० : दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा अभियान' राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत यानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री.सावे म्हणाले, "शिक्षण हे केवळ गुणांसाठी नाही, तर ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्जवल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून, प्रामाणिक प्रयत्नांद्वारे यश संपादन करावे. आगामी परीक्षा काळात जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त आणि भयमुक्त राहतील यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापनांनाही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

  **

  वृत्त क्रमांक 166

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू 

तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त   

नांदेड दि. 10 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  लातूर विभागीय मंडळस्तरावर 10 वी साठी 02382-251633 तर  12 वीसाठी 02382-251733 हा हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.  

या हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले नावे व भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव)  मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक बारावी साठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.  

माध्यमिक (दहावी) साठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस.एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं. 7620166354 हे भ्रमणध्वनी क्रमांक असतील. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत साधावा.  

भयमुक्त-तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्र. परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल. नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कच्छवे बी.एम. 9371261500, कारखेडे बी.एम. 9860912898, सोळंके पी.जी. 9860286857, पाटील बी. एच. 9767722071 असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे  लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

०००००


विशेष लेख                                                                                                                                     परीक्षेला जाताना....

प्रियविद्यार्थी मित्र मैत्रिणींनो परीक्षासुरु होणार तुमचीखूप खूप शुभेच्छा प्रथम तुम्हा सर्वांना. बारावीचे वर्षबारावीची परीक्षा सगळं वातावरण वेगळ असत. परीक्षाही काही वेळापुरती, काही प्रश्नापुरती असली तरी त्यामागे वर्षभर केलेली मेहनतअभ्यास असतो.

परीक्षेला जाताना..

*परीक्षा* कोणतीही परीक्षा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असते. त्यातल्या त्यात 12 वीची परीक्षा सर्वांनाच महत्वाची असते. पालक व विदयार्थी यासाठी तयारी करत असतात. 1. नियोजन परीक्षेचे नियोजन अभ्यासाचे सातत्यनियोजन पूर्वक केलेला अभ्यास, प्रत्येकाची समजून घेण्याची विषयानुसार आवड, ग्रहणशक्तीवातावरण इ. यात येतात.

टाईम टेबल.. वेळापत्रक आल्यापासूनच नियोजन करायला हवे. हॉल तिकीट जपून ठेवणे परीक्षा केंद्र व घर,हॉस्टेल,रूम यातील अंतर यानुसार परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचण्याचे नियोजन करणे . त्यासाठी योग्य वाहनाचे नियोजन करने किंवा कशाप्रकारे जायचे ते ठरवणे परीक्षेला घरून निघताना प्रोटोकॉल नियमां नुसार ड्रेसिंग -कपडे परिधान करणे इतरही नियम पाळणे. हॉल टिकिट सोबत ठेवणे पानीघड्याळ नियमानुसार असणे वेळे आधी परीक्षा केंद्रावर आल्याने घाई गडबड होत नाही.

महत्वाचे म्हणजे रात्रीची झोप शांत होणे आवश्यक आहे. जास्त जागरण करू नये. सकाळी जेवण करावे काहीतरी पोषक खावेपरीक्षेला जाताना उपाशी राहू नये पाणी व्यवस्थित प्यावे. परीक्षा काळात साधेपण पोषक आहार घ्यावे, अतितिखटमसालेआंबवलेलेबाहेरचे पॉकेटमधील अन्न खाऊ नये. परीक्षा काळात आहार साधापोषक, सहज पचणारे असावा. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर वातावरण हलकफुलक असाव . उगाचच टेंशन घेऊ नये, आपण अभ्यास केलेला आहे, त्यामुळे कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो हा आत्मविश्वास असावा.

परीक्षा केंद्रावर आल्यानंतर तसेच समोर पेपर पाहून नविन वातावरण पाहून घाबरु नये. शांत रहावे. जर घबराहट वाटलेधडधड वाटली थरथर वाटली तर मनाला स्वतः सांगावे. शांत रहा सर्व छान होईल घाबरु नका रिलॅक्स रहा, रडू नका. या वेळी फक्त श्वासावर लक्ष्य द्यावे. थोडा वेळ श्वास घ्या श्वास सोडा असे दीर्घश्वसन करावे. श्वास मोकळा घ्यावा. साधारणतः आत घेताना, श्वास 4 सेकंद व श्वास सोडताना सहा सेकंद असे प्रमाण असावे. असे 2 ते 5 वेळा करावे. किंवा मोकळा श्वास आत घेऊन सोडताना मेणबत्ती फुंकल्यासारखे फू करून श्वास सोडावा असे श्वासावर लक्ष्य दिल्याने ताण कमी होतो व परीक्षेवर लक्ष्य केंद्रित करावे. पेपर हाती आल्यानंतर उत्तरपत्रिका यावर आपला नंबर इ. व्यवस्थित लिहावे उपस्थित शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावेचुका करू नयेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे. प्रश्न स्वतःला जसे येतात तसे सोडवावे इतरांना काही विचारून डिस्टर्ब करू नयेशंका असल्यास गारडींगला असलेल्या सर मॅडमशी संपर्क साधावा.

*कॉपी करू नये*

स्वतःच्या हिंमतीने अभ्यास करून मिळवलेले मार्कस - आयुष्यभर उपयोगी पडतातत्यामुळे आपला पेपर सोडवताना शांत राहून मन एकाग्र करून उत्तरे लिहावीत. अस्वस्थता कोणताही प्रश्न वाचून अस्वस्थ होऊ नये. घाबरु नयेवाटल्यास थोडा वेळ दीर्घ श्वसन करावे, आपणास जे प्रश्न सोपे वाटतात ते आधी सोडवावे नंतर कठिण प्रश्न सोडवावेमन आनंदी ठेवावे. वेळेचे नियोजन प्रश्नांच्या मार्कानुसार उत्तरे लिहिताना वेळेचे नियोजन असावे त्यामुळे वेळ पुरतो अन्यथा एकाच प्रश्नात वेळ जास्त गेल्याने वेळेचे गणित बिघडू शकते म्हणून वेळेकडे लक्ष्य असावे. हस्ताक्षर हस्ताक्षर सुवाच्य सुंदर वाचता येण्या सारखे असावे. घाईघाईत खराब अक्षर असू नये. सुटसुटीत ,मुद्देसूद लिहावे. एक पेपर झाल्यावर परीक्षा काळात ज्या दिवशी जो पेपर असेल त्या पेपर झाल्यानंतर उगाचच त्याबद्दल चर्चा करत वेळ वाया घालवू नयेदुसरा पेपरची लगेच तयारी सुरु करावी सगळ्यात शेवटी संपूर्ण विषयांचे पेपर्स झाल्यानंतर त्यावर चर्चा करावी. यशस्वी व्हा आनंदी वातावरणातहसत खेळत परीक्षा द्यावी, काळजी, चिंता करू नये. पालकांनी घरातील वातावरण शांत व उत्साही असावे उगाचच परीक्षेचा बाऊ करू नयेअवास्तव अपेक्षांचे ओझे देऊ नये, घाबरू‌न जाऊ नये. स्ट्रेस न घेता शांत चित्ताने पेपर सोडवावा व यशस्वी व्हावेसर्वांना खूप खूप शुभेच्छा यशस्वी भव.

डॉ. पुष्पा गायकवाड,

 वैद्यकीय अधिकारी

 जिल्हा रुग्णालय नांदेड

 मो- 9422862625

 टीप- परीक्षा काळात काही अडचण आल्यास विद्यार्थी विद्यार्थिनी पालक कधी ही फोन करू शकतात.

 

  वृत्त क्रमांक 165

बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार

दोषी आढळणाऱ्याची गय केली जाणार नाही

#नांदेड , दि. 9 :- केवळ बारावीच नव्हे तर आयुष्यात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे परीक्षेचा ताण घेऊ नका. तणाव मुक्त व निर्भय वातावरणात परीक्षा द्या,असा शुभेच्छा संदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. सोबतच प्रशासनाने काटेकोर कॉफी मुक्ती अभियान राबविण्याचे निर्देशही दिली आहे.

जिल्ह्यात यावर्षी एकूण 107 परीक्षा केंद्रावर बारावीच्या परिक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीसाठी 172 परीक्षा केंद्राचे नियोजन आहे. यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविणार असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. जिल्ह्यात बारावीसाठी एकूण 24 तर दहावीसाठी 32 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील परिक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक बदलण्यात येणार आहेत.

बारावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकूण 10 भरारी पथक नेमण्यात आली आहेत. या पथकात उपजिल्हाधिकारी, उपआयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी २ तालुके दिले आहेत. प्रत्येक तालुक्यातून तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना त्यांचा तालुका क्षेत्रात भरारी पथक प्रमुख म्हणून कार्य करतील. याशिवाय 24 संवेदनशिल विशेष भरारी पथक म्हणून 5 पेपरसाठी 7 अधिकाऱ्यांचे जिल्हास्तरावरुन नियोजन करण्यात आले आहे. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे भरारी पथक अचानक भेटी देवून परीक्षा सुरळीत पार पडत आहेत की नाही याची पाहणी करतील. 

याशिवाय सर्वच 107 केंद्रावर तालुकास्तरावर पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी बैठे पथकाचे नियोजन तहसिलदार यांचे अधिकारात करण्यात आलेले आहे. यामध्ये तालुकास्तरावरील वर्ग-२ एक अधिकारी पथक प्रमुख म्हणून राहतील, त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, केंद्रप्रमुख, कृषि सहाय्यक यांचे पैकी २ इतर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी कोणत्याही ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहून कर्डिले यांनी केले आहे. 

00000



  वृत्त क्रमांक 168 लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्‍यांची जबाबदारी : अभिजीत राऊत  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत तर अभिजी...