जन आरोग्य योजना ठरतेय नवं संजीवनी
नांदेड दि. 5 :-
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने विषयी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संलग्नीकृत रुग्णालयांची बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी डॉ. साखरे, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना डॉ. दिपेशकुमार शर्मा, सर्व संलग्नीकृत रुग्णालय प्रशासन, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना 2 जुलै 2012 पासून सुरु झालेली आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी पासून कार्यान्वित असून या योजनेंतर्गत 23 सप्टेंबर 2018 पासून आजपर्यंत 20 हजार 528 शस्त्रक्रिया व औषधोपचारांचा लाभ लाभार्थ्यांना भेटलेला आहे.
नांदेड जिल्ह्यातील 12 रुग्णालये या योजनेअंतर्गत संलग्नीकृत असून या अंतर्गत डायलेसिससाठी 5 हजार 930, कॅन्सरसाठी 4 हजार 323, अपघातग्रस्त रुग्ण 3 हजार 553, हृदयरोगसाठी 2 हजार 639, अश्या विविध 30 प्रकारच्या स्पेशालिटी अंतर्गत रुग्णांनी लाभ घेतलेला असून या औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी 42 कोटी 99 लाख 72 हजार 942 रुपये विम्याच्या रक्कमेतून अदा करण्यात आली आहे.
ही योजना गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना उपचारासाठी राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 971 व आयुष्यमान योजनेंतर्गत 1 हजार 300 या वेगवेगळ्या 1 हजार 300 दुर्धर आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यां जवळ केसरी, पिवळे, अन्नपूर्णा, अंत्योदय तसेच शेतकरी कुटुंबांसाठी पांढरी शिधापत्रिका व आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्याकडे ई-कार्ड असणे आवश्यक आहे.
बदलत्या जीवनशैलीने दिवसागणिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. परंतु सर्व सामान्य नागरिकांना शस्त्रक्रिया व औषधोपचारांवर होणारा खर्च आवाक्या बाहेरचा असल्याने केंद्र सरकारची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तर राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना त्या रुग्णांच्या दृष्टीने नव संजीवनी ठरत आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांचा समावेश असल्यास संगणक प्रणालीद्वारे कुटुंब सदस्यास ई-कार्ड मिळण्याची तरतूद आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी केसरी, पिवळे, अन्नपूर्णा,अंत्योदय तसेच पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब पात्र आहेत अशी
माहिती डॉ दिपेश कुमार शर्मा, जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना नांदेड यांनी दिली आहे.
000000