Saturday, April 9, 2022

कृपया सुधारित वृत्त

होट्टलचे ऐतिहासिक वैभव पुन्हा प्राप्त करून देवू

- पालकमंत्री अशोक चव्हाण

होट्टल महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

• पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याला अपूर्व संधी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- आपल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक, अध्यात्मिकतेचा वैभव संपन्न वारसा मिळालेला आहे. उत्तर भारतातील नंदघराण्यानंतर मोर्य राजवंशाच्या सत्तेचा संबंध नांदेड जिल्ह्याशी आला. वेरुळचे कैलाश लेणे निर्माण करणाऱ्या राजवंशाचे सत्ताकेंद्र हे आपले कंधार होते. या काळात राजधानीचे नगर म्हणून कंधार विकसीत झाले. कंधारपासून होट्टल पर्यंतचा ऐतिहासिक वारसा खूप मोलाचा आहे. चालुक्याची उपराजधानी म्हणून होट्टलकडे पाहिल्या गेले. प्राचिन शिल्पस्थापत्य कलेचा एक समृद्ध वारसा आपल्याला होट्टलने दिला आहे. हा वारसा जतन करण्यासमवेत होट्टलचे गत वैभव पून्हा प्राप्त करू असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

देगलूर तालुक्यातील होट्टल येथे होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर, महापौर जयश्री पावडे, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे,पर्यटन उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, होट्टल येथील सरपंच हनिफाबी युसूफमिया शेख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामराव नाईक यांची विशेष उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याला पर्यटनाच्यादृष्टिने अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळे लाभलेली आहेत. आध्यात्माचाही याठिकाणी संगम आहे. माहूर येथील रेणुकादेवी, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा, सहस्त्रकुंड येथील धबधबा, विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर, राहेर अशी पर्यटकांना वेगळी अनुभूती देणारी केंद्र, स्थळे नांदेड जिल्ह्यात आहेत. काळेश्वर येथे पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने भव्य वॉटर स्पोर्टचे केंद्र, सहस्त्रकुंड धबधबा परिसराचा विकास यावर आपण लक्ष केंद्रित केले असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योग व्यवसायाची संधी लक्षात घेता विविध स्थळासंदर्भात एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. होट्टल महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी होट्टल येथील ग्रामस्थांचा आवर्जून गौरव केला. हजारो वर्षाचा ठेवा या गावातील लोकांनी जपून ठेवला आहे. सिद्धेश्वर मंदिर व रिदेश्वर मंदिर हे या जपून ठेवलेल्या शिल्पामुळेच आपल्याला उभे करणे शक्य झाले आहे. अजूनही दोन मंदिरांची शिल्पे गावकऱ्यांनी जपून ठेवली आहेत. होट्टल गावात विविध कामांमुळे जे उत्खन्न झाले त्यात सुमारे शंभर शिल्प निघाले. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी ते जपून ठेवली आहेत. जे योगदान होट्टल वासियांनी हा समृद्ध वारसा जपण्यासाठी दिले आहे ते अत्यंत लाख मोलाचे आहे, या शब्दात त्यांनी ग्रामस्थांचा गौरव केला.

राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पर्यटन मंत्री म्हणून अदित्य ठाकरे यांनी एक नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. तर नवादृष्टिकोण ते देत आहेत. जे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत याचा आवर्जून उल्लेख करत पालकमंत्री चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मराठवाड्यामध्ये औरंगाबादसमवेत इतर ठिकाणच्या पर्यटन स्थळांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पर्यटन विभागाने यासंदर्भात एक विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढे यावे अशी अपेक्षा त्यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली.

यावेळी आमदार जितेश अंतापूरकर यांनी हा महोत्सव आपल्या सर्वांचा बहुमान असलेला महोत्सव आहे, असे सांगून यापुढेही तो मोठ्या प्रमाणात साजरा करून असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा आढावा घेतला. माजी सरपंच युसूफ मिय्याची शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

000000







महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा

पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21 व सन 2021-22 या चार वर्षांचा एकत्रित देण्यात येणार आहे. या चार वर्षाच्या पुरस्कारांसाठी इच्छूक व्यक्ती व संस्थांनी चार वेगवेगळे विहित नमुन्यातील अर्ज बुधवार 20 एप्रिल 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे रितसर आवश्यक योग्य त्या माहितीसह सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराची नियमावली 8 मार्च 2019 रोजीच्या  शासन निर्णयात देण्यात आली आहे. यानुसार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन, साहित्यिक क्षेत्रात काम करत असलेले व्यक्ती, संस्थेच्या कामाची दखल घेऊन त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार, साहित्यिकांनी पुढे यावेत या उद्देशाने हा पुरस्कार व्यक्ती व सामाजिक संस्थेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. नियमावलीबाबत 8 मार्च 2019 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000 

सुधारीत वृत्त

जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन शैक्षणिक

अर्ज स्विकारण्यासाठी मंगळवारी विशेष मोहिम

नांदेड (जिमाका) दि. 9 :- सामाजिक समता सप्ताह निमित्ताने विशेष मोहिमेअंतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले शैक्षणिक अर्ज स्विकारण्यासाठी जिल्ह्यात मंगळवार 12 एप्रिल 2022 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत अर्ज सादर करता येणार आहेत. याबाबत शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाने आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या व घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दयावे, असे आवाहन नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे. 

समाज कल्याण आयुक्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक यांच्या सूचनेनुसार सामाजिक समता सप्ताह निमित्ताने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याविशेष मोहिमेच्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदारास अर्ज करतांना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह सामाजिक समता सप्ताह निमित्ताने विशेष मोहिमेत 12 एप्रिल 2022 रोजी पुढील ठिकाणी तालुकास्तरावर ऑनलाईन भरलेले परिपूर्ण अर्ज स्विकारले जाणार आहेत. 

विशेष मोहिम कार्यक्रमाचे वेळापत्रक मंगळवार 12 एप्रिल 2022 रोजी वेळ सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत राहील. या विशेष मोहिमेचे स्थळ व संबंधित तालुक्याचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सभागृह (मो. 9823839310) येथे नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा तर अनुसूचित जाती मुलांची शासकिय निवासी शाळा नायगाव बा. (मो.9096219992) येथे नायगाव, बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यातील  तसेच शाहिर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड (मो. 9921056074) येथे मुखेड व कंधार या तालुक्यातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह भोकर (मो.8390864982) येथे किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, उमरी व हदगाव या सर्व तालुक्यातील सर्व संबंधित महाविद्यालयातील अ.जा., वि.जा., भ.ज., इ.मा.व., व वि.मा.प्र. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारणे व त्रुटी असल्यास त्रुटीच्या पूर्ततेसाठी या विशेष मोहिमेच्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

अर्जदारांनी मूदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीला अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र / समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहीत मुदतीत निकाली न निघाल्यास त्यामुळे अर्जदार प्रवेशापासून वंचित राहिल्यास समिती जबाबदार राहणार नाही, असेही नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

000000

भूमापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- भारतातील जमिनीची मोजणी 10 एप्रिल रोजी सुरु झाली. त्याअनुषंगाने हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भूमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने रविवार 10 एप्रिल 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी 11 वा. भूमापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती एस. पी. सेठिया, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती असणार आाहे. 

 

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून नांदेडचे समाज कल्याण अधिकारी व साहित्यिक बापु दासरी, कालाकार हास्य सम्राट रमेश गिरी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, स्वागत नृत्य यात ढेमसा आदिवासी नृत्य, लघुपट, पथनाटयाचे सादरीकरण, व्यक्तीमत्व विकास, संवाद कौशल्य व वेळेचे व्यवस्थापन याविषयांवर समाज कल्याण अधिकारी व साहित्यिक बापु दासरी यांचे मार्गदर्शन होणार आहे. मोजणी व मोजणी कामात येणाऱ्या अडचणी या विषयांवर चर्चासत्र, हास्य सम्राट रमेश गिरी यांचा कार्यक्रम, विशेष उल्लेखनिय काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्राचे वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाचे आयोजन नांदेडचे उप.अ.भू.अ. निलेश उंडे, किनवटचे उप.अ.भू.अ. तुकाराम पेंदोर, कंधारचे उप.अ.भू.अ. प्रमोद माळी, बिलोलीचे उप.अ.भू.अ. रविंद्र निकम, अर्धापूरचे उप.अ.भू.अ. विलास अन्नमवार यांच्यासह नांदेड भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांनी केले आहे.

00000

दिनांक 8 एप्रिल 2022

 

जिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा रुग्णालयात 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन संपन्न झाला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयांतील तज्ञ डॉक्टरांमार्फत निरोगी आरोग्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक व्यक्तींने आपल्या निरोगी आरोग्यासाठी दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा, असे जिल्हा शल्य चिकित्सक             डॉ. एन.आय. भोसीकर यांनी  यावेळी सांगितले. 

 

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, डॉ. सबा खान, डॉ. ए.आर. रहेमान, डॉ.सुमेध वाघमारे यांनी निरोगी आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात प्रत्येक व्यक्तींने संतुलित आहार, पुरेशी झोप घ्यावी, याबरोबर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून  (व्यसनापासून) दूर राहण्याचा सल्लाही दिला.

 

या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.ये.पी.वाघमारे, एनसीडी नोडल अधिकारी                   डॉ. हनुमंत पाटील, डॉ. ताजमुल पटेल, डॉ. अनुरकर, डॉ.  विखारुनिसा खान, डॉ. सुजाता राठोड, जिल्हा समन्वयक (एनसीडी) डॉ. उमेश मुंढे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी इन्चार्ज श्रीमती नारवाड, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, बालाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

0000

दिनांक 8 एप्रिल 2022

 

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 60 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी झाली असून यातील 1 लाख 106 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 99 हजार 684

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 79 हजार 687

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 106

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-00

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...