शेतकऱ्यांना पिकांचे किड व रोगाबाबत
गाव पातळीवर मार्गदर्शन करावे
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 17 :- "जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान, किड/रोग व्यवस्थापन व उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम पूर्व अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षणात ते बोलत होते.
कार्यशाळेत विविध मोहिमांची माहिती पुस्तिका, खरीप हंगाम पुर्व जणजागृती मोहीम-2023 कृषि मार्गदर्शिका आदीचे सर्व कृषी सहाय्यकांपर्यंत वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, खत बचत मोहीम, जैविक खतांचा वापर, बीज प्रक्रिया आदी मोहिमेद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी.चलवदे यांनी सांगितले. डॉ. अरविंद पांडागळे यांनी कापुस, सोयाबीन व तुर लागवडीतील तंत्रज्ञान, किटकशास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे यांनी खरीप हंगामातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन व रोग शास्त्रज्ञ डॉ. पवन ढोके यांनी प्रमुख रोगांचे व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी व इतर कर्मचारी आदींची उपस्थित होती.
000000