Saturday, February 8, 2025

 वृत्त क्रमांक 162

वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे. 

जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील  निवासी 8-10 विद्यार्थ्यांना आज सकाळी 9 वा. जेवण केल्यानंतर उलटी व मळमळ होत असल्याचे जाणवले.या विद्यार्थ्यांवर लगेच नांदेड येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. 

आश्रमशाळेतील शिक्षकांनी सर्व 59 विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय विष्णपुरी नांदेड येथे दाखल केले आहे. या विद्यार्थ्यांची इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी भेट घेऊन प्रकृतीबाबत संबंधित डॉक्टरांची प्रत्यक्ष चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत असून त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दिली असल्याचे श्री. मिनगिरे यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 161

गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू

महसूल खात्याची धडक कारवाई 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत केली आहे. या सर्वांची महसूल खात्याने गंभीर दखल घेतली आहे. गोदावरी नदीकाठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू आहे. वाळू तस्करावर एमपीडीए 1981 नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.  

महसूल खात्याच्या पथकाने 4 फेब्रुवारी रोजी तीन मोठे इंजिन जप्त करून संबंधितावर लिमगाव पोलीस स्टेशन येथे  गुन्हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2025 अन्वये दाखल केला आहे. नदीकाठावरील भनगी, वाहेगाव, गंगावेट, विष्णुपुरी, थूगाव, कल्याळ, लोहा तालुक्यातील बेट सांगवी, इत्यादी गावांमधील अवैध वाळू साठा मागच्या तीन दिवसापासून जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे. 

आज पर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त केली आहे. हे काम अजून पुढे दोन-तीन दिवस चालणार आहे. यापुढे सुद्धा ही अविरत कार्यवाही सुरू राहणार आहे. या कारवाईनंतर वाळू तस्करानी गोदावरी नदीमध्ये तराफे, इंजिन टाकून वाळू उपसा केल्यास, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाळू उपसा करणारे बिहारी मजूर यांना अनधिकृतपणे झोपड्या टाकण्यासाठी दिल्यास अथवा अनधिकृतपणे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा यांना शेतकऱ्यांनी अनधिकृत रस्ता दिल्यास अथवा वाळू तस्करांना बेकायदेशीररित्या मदत करणाऱ्या व्यक्तीवर, संबंधितावर MPDA 1981 नुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे. 

ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या सनियंत्रणाखाली नांदेड तहसीलदार संजय वारकड व लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल दिगलवार नायब तहसीलदार नांदेड पथक प्रमुख, नन्हणू कानगुले मंडळ अधिकारी, कुणाल जगताप मंडळाधिकारी, तलाठी रमेश गिरी, संताजी देवापुरकर, माधव भिसे, सरपे, रणवीरकर, खेडकर, जाधव, कदम, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादी करत आहेत.

0000







  वृत्त क्रमांक 160

शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

किनवट येथील शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
#किनवट (जि. नांदेड ) दि. ८ फेबुवारी : आज किनवट येथे आपल्याला ज्या काही योजना माहिती झालेल्या आहेत. त्या योजनांचा तुम्ही स्वतः लाभ घ्या. सोबतच या योजना आपल्या संपर्कातील अनेकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
किनवट येथील तालुका क्रीडा संकुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरामध्ये ते बोलत होते. या महाशिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनातील प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला व बालकल्याण, व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे अनेक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते. या प्रत्येक स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती शैलेश ब्रह्म्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज, तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर, मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची यावेळी उपस्थिती होती.
शासनाच्या विविध विभागाच्या ४६ स्टॉलची उभारणी या ठिकाणी करण्यात आली होती. या ठिकाणावरून प्रत्येक योजनेची माहिती दिल्या जात होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आपल्या संक्षिप्त संदेशामध्ये न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी या आयोजनामागचा उद्देश हा केवळ लोकांपर्यंत माहिती पोहोचविणे आहे. शासन कायम चांगल्या योजना निर्माण करते. पण बहुतेक वेळा ही माहिती जनतेपर्यंत जात नसल्याचे दिसून आले. न्यायालयीन कामकाज करताना देखील अनेक बाबी नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे मदतीसाठीच राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची निर्मिती झाली. न्यायाबद्दल, आपल्या सोयी सुविधांबद्दल, माहिती व्हावी हा यामागील उद्देश आहे. आज इथे उपस्थित नागरिकांच्या संख्येवरून हा उद्देश सफल होताना दिसतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी देखील यावेळी संबोधित केले. ते म्हणाले, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे अनेक लोक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. त्यांना त्याचा फायदा होत नाही एका छताखाली सर्व योजना उपलब्ध व्हाव्यात व लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा ही या आयोजनामागची भूमिका आहे. मला आनंद आहे की. ४६ स्टॉल आज लावण्यात आले आहे. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता या ठिकाणी अनेक यंत्रणांनी जिल्हा विधी प्राधिकरणाला मदत केली. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित मोठ्या महिलांच्या संख्येची देखील नोंद घेतली ते म्हणाले महिला सक्षमीकरणाकडे आपले पाऊल पडत असल्याचे आजची उपस्थिती द्योतक आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनीही संबोधित केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज यांनी केले. सर्व शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या सहभागाबद्दलही त्यांनी सर्वांचे आभार मानले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन 4 थे सह दिवानी न्यायाधीश व. स्तरचे महेश सोवनी यांनी केले तर दिवाणी न्यायाधीश क. स्तर पी. एम. माने यांनी सर्वांचे आभार मानले. प्रारंभी बोधडी बु. येथील अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तर समारोप सामुहिक राष्ट्रगीताने झाला.
0000















#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #नांदेड



#बारावीपरीक्षा विशेष लेख                                                                                                                    ...