Friday, August 8, 2025

 वृत्त क्रमांक 828

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत 

दुसरा हप्ता देण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती आवश्यक  

नांदेड दि. 8 ऑगस्ट :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाआयटी या ऑनलाईन प्रणालीद्वारे छाननी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती ('B'Statement) महाआयटी या ऑनलाईन प्रणालीवर समाविष्ट करावी. त्यानंतर त्याची मूळ प्रत समाज कल्याण कार्यालयातील स्वाधार विभागात लवकर जमा करावी. जेणे करून पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जून 2018 व 26 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राबविण्यात येत आहे.

00000

 वृत्त क्रमांक 827

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना” 

नांदेड दि. 8 ऑगस्ट :- सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांसाठी “वीर परिवार सहायता योजने”च्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कायदेशीर सेवा केंद्र स्थापन केले आहे. लाभार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे येऊन अर्ज सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मार्फत “वीर परिवार सहायता योजना-2025” मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवाप्रदान करीत आहे. या योजनेचा उद्देश देशाचे संरक्षण करणारे सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रभावित करणाऱ्या वैयक्तिक आणि नागरी हक्काच्या कायदेशीरबाबींमध्ये सेवा प्रदान करणे आहे.

ही योजना सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना मालमत्ता आणि कौटुंबिक वाद, वारसा हक्काचे आणि वारसाचे प्रश्न, आर्थिक फसवणुकीचे प्रकरणे, कल्याणकारी योजनेखालील लाभ मिळवणे, दिव्यांग अधिकार नियम 2016 अंतर्गत हक्क मिळवून देण्यासारख्या विविध कायदेशीर बाबीमध्ये मदत पुरवते. 

या योजनेत डिजिटल सुविधांचा वापर करण्यात आला आहे. जसे Nalsa च्या लीगल सर्विसेस मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलद्वारे ई-फायलिंग, ई-कोन्सिलिंग, ई-मेडीएशन आणि ई-लोक अदालत या उपाय योजनेमुळे दुर्गम भागातही न्याय मिळवणे सोपे होईल.

ही योजना केवळ एक कल्याणकारी उपाय नाही तर देशाच्या संरक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कृती आहे. या योजनेमुळे देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानाच्या कुटुंबियांना त्यांच्या अनुपस्थित ही विश्वसनीय कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध होईल.

0000

वृत्त क्रमांक 826

वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:10 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 08, 09 व 12 ऑगस्ट 2025 या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 08, 09 व 12 ऑगस्ट 2025 हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

000

वृत्त क्रमांक 825

महसूल सप्ताहानिमित्त सिध्दनाथ येथे वृक्षारोपण

उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ यांची वृध्दाश्रमास भेट

नांदेड,८ ऑगस्ट:- महसूल सप्ताह निमित्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज वाजेगाव महसूल मंडळातील सिध्द्नाथ येथील शिवानंद स्वामी संस्थानच्या परिसरात उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी परिसरातील वृध्दाश्रमास भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद  साधला .

 महसूल सप्ताह निमित्त 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह आरंभ झाला असून तहसील कार्यालय नांदेडच्यावतीने गावपातळीवर विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताहात शासनाच्या जनकल्याण‌कारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. महसूल सप्ताहा निमित्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले आहे. नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, परीवीक्षाधीन तहसीलदार अभयराज नानजुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांच्या सूक्ष्म नियोजनात आज सिध्दनाथ येथील शिवानंद स्वामी संस्थानच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थानचे सचिव माणिकराव देशमुख यांचेसह नायब तहसीलदार  संजय नागमवाड, सुनिल माचेवाड, सरपंच सटवाजी तारू, माजी सरपंच आनंदा आवातिरक, ग्रामपंचायत सदस्य दुर्गाजी पाटील आवातिरक, राजाराम खाडे, तातेराव पाटील, बालाजी दगडफोडे, नामदेव आवातिरक, प्रसेनजीत तारू, पोलीस पाटील सुनिता आवातिरक, आशाताई श्रीमती जयश्री आवातिरक , ग्रामरोजगार सहायक मारोती जाधव, सुरेश कदम यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थानचे गुरु श्रीकांत देशमुख लाठकर ,त्र्यंबक गुरु महाराज उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाजेगाव मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राममहसूल अधिकारी श्रीमती ललिता नागलगे, दिलीप पवार, एम. के. पाटील, महसूल सेवक संतोषी कर्डिले, श्रद्धा सूर्यवंशी ,सेतू चालक एकनाथ ठोके आदिंनी योगदान दिले.

००००००




वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...