Tuesday, September 23, 2025

 वृत्त क्रमांक 1001

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

नांदेड दि. 23 सप्टेंबर :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्यात दोन सत्रात 22 परीक्षा केंद्रात घेण्यात येणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात रविवार 28 प्टेंबर 2025 रोजी सकाळी ते रात्री 8 वाजेपर्यंत कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यक्तीरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध केले आहे.

 

या परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटरट्रॅन्झीस्टररेडिओलॅपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यात्याचप्रामाणे आदेशात दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्सएस.टी.डी., आय.एस.डी.भ्रमणध्वनीफॅक्स, झेरॉक्सपेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 22  सप्टेंबर 2025 रोजी निर्गमीत केला आहे.

00000

वृत्त क्रमांक 1000

नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांचा यलो अलर्ट जारी

नांदेड दि. 23  सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २३ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23,24,25 व 27 सप्टेंबर 2025 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दि. 23 व 25 सप्टेंबर 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा व दि. 26 व 27 सप्टेंबर 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक 999

29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन

नांदेड दि. 23  सप्टेंबर :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच विरनारी, वीरमाता-पीता, शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी कळविले आहे.

देशभरात 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने उरी सेक्टर मधील अतिरेकी भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक द्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यत व्यापक प्रमाणात पोहोचविण्यासाठी तसेच जनतेस देश भक्तीची ज्वाला मोठया प्रमाणात जागविण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी माजी सैनिकांचा सन्मान करुन शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.

00000

वृत्त क्रमांक 998

कर्मवीर दादासाहेब सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत

 पात्र अर्जदारांनी 7 ऑक्टोबरपर्यत अर्ज करावेत

नांदेड दि. 23 सप्टेंबर :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शासनाकडे उमरी तालुक्यातील मौजे मोखांडी येथील शेतजमीन खरेदी करण्यात आली असून लाभार्थ्यांना वाटप करावयाची आहे. मौ. मोखांडी व लगतच्या गावातील (वितनाळ, सावरगाव, शिरुर) अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील, दारिद्ररेषेखालील, भूमिहीन वय वर्ष 18 ते 60 वयोगटातील पात्र अर्जदारांनी पुढील कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज विहित नमुन्यात 7 ऑक्टोबर 2025 पर्यत कार्यालयीन वेळेत या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  

जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/नवबौध्द फक्त), भूमिहिन शेतमजूर तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, द्रारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र (ग्रामसेवक), भूमिहीन प्रमाणपत्र, अहवाल, रहिवासी प्रमाणपत्र (तहसिलदार),  प्राधान्य परित्यक्ता, विधवा, ॲट्रासिटी पिडीत, राशनकार्ड, आधारकार्ड (वयाचा पुरावा 18 ते 60 वर्ष). अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड (शासकीय सुटीचे दिवस सोडून) या पत्तयावर संपर्क करावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 997

वेतन देयकासाठी कर्मचाऱ्यांची माहिती  

ऑनलाईन आज्ञावलीत नोंदवावी   

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन   

नांदेड दि. 23 सप्टेंबर :- शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2025 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड मार्फत सुरू करण्यात आले आहे.  नियोजन विभागाचे शासन परिपत्रक क्र. असांसं-1325/प्र.क्र.127/का.1417 दि. 17 सप्टेंबर 2025 नुसार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै 2025 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावली मध्ये नोंदविणे आवश्यक आहे.                                                                                                                              

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी  उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड 02462-252775 ई-मेल dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा.   कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2025 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक सरिता ब. गोतमारे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 996

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबीर संपन्न 

नांदेड दि. 23 सप्टेंबर :- 17 सप्टेंबर  ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधी संपूर्ण देशभर  “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य तपासणी मोहीम सुरु आहे. त्याअनुषंगाने आज 23 सप्टेंबर रोजी श्री. गुरु.गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 979 महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.

यामध्ये उच्चरक्तदाब, मधुमेह, मौखिक आरोग्य, स्त्रीरोग, गर्भाशय मुख कर्करोग, लहान बालकांची तपासणी, भोतीकोपचार सेवा, क्षयरोग तपासणी, कान नाक घसा, आयुष कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय सेवा, आभा व आयुष्यमान कार्ड नोंदणी, आहार विषयक माहिती व सल्ला तसेच महाराक्तादन शिबीर इ. सेवा प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमात रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड व इनरविल क्लब नांदेड यांच्यामार्फत उपस्थित रुग्ण व विद्यार्थ्यांना केळी, बिस्किटे व पाणीबॉटल इत्यादीचे  वाटप करण्यात आले. तसेच क्षयरोग ग्रस्त रुग्णांना सकस आहार कीटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी वैद्यकीय अधिकारी(बा.सं.) डॉ. राजाभाऊ बुट्टे, आर एम ओ डॉ. पुष्पा गायकवाड यांनी उपस्थित रुग्ण व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, आर एम ओ डॉ. एच.के साखरे , वैद्यकीय अधिकारी  डॉ. आपनगीरे,  डॉ. तजमुल पटेल, डॉ. बालाजी माने, डॉ. कांतीलाल इंगळे, डॉ. शाहू शिरढोणकर, अधिसेविका श्रीमती सुनिता राठोड, परिसेविका अनिता नारवाड, रोटरी क्लब नांदेडचे श्रीमती स्मिता गंदेवार, इनरविल क्लब नांदेडचे श्रीमती मीनाक्षी पाटील, डॉ. विद्या पाटील, श्रीमती लता प्रेमचंदानी, श्रीमती गायत्री तोष्णीवाल तसेच  रुग्णालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रुग्णालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000


वृत्त क्रमांक 995

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा 

नंबर प्लेट बसवण्यास येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत 

नांदेड दि. 23 सप्टेंबर :- जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांनी अधिकृत https://mhhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनाचे काम जसे वाहन हस्तांतरण, वाहनाची पुन: नोंदणी, वाहनाचे वित्तदात्यांची नोंदणी, वाहनाची वित्तदात्याचा बोजा उतरवणे इत्यादी होऊ शकणार नाही. मोटार वाहन कायद्यानुसार सदर नंबर प्लेट मुदतीत बसून वाहनाचे कामकाज करावे व दंड टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनाला HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हायसिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना HSRP बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. 

वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. इतर कुठल्याही संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रक्टरकरिता 450 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये, सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745 रुपये इतका दर आकारला जाणार असून याव्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे. सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे. या दरांव्यतिरीक्त फिटमेंट सेंटरकडुन एचएसआरपी HSRP बसविण्याकरिता जादा पैशाची मागणी करत असेल तर या कार्यालयास त्याबाबत तक्रार दाखल करता येईल.  

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्यासाठी Appointment घेण्याची कार्यपद्धती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

सद्य:स्थितीत नांदेड जिल्ह्यात 19 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत एकुण 1 लाख 21 हजार 728 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने HSRP नंबर प्लेट बसविण्याकरिता करण्यात आली असून 73 हजार 406 इतक्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यात आलेली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता प्रतिसाद वाढत असून वाहन धारकांनी वेळेत वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी. तसेच वाहनांना HSRP बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...