Tuesday, October 6, 2020

 

 205 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

180 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 6 :- मंगळवार 6 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 205 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 180 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 59 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 121 बाधित आले. 

आजच्या एकुण 829 अहवालापैकी  611 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 16 हजार 632 एवढी झाली असून यातील  13  हजार 213 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 879 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी नांदेड कौठा येथील 75 वर्षाचा एका पुरुषाचा, 4 ऑक्टोंबर रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 80 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, तर 5 ऑक्टोंबर रोजी व्यंकटेशनगर नांदेड येथील 72 वर्षाचा एका पुरुषा, चीतगिरी भोकर येथील 84 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर अर्धापुर तालुक्यातील कामठा येथील 57 वर्षाचा एका पुरुषाचा, नायगाव येथील 50 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर 6 ऑक्टोंबर 2020 रोजी मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील 32 वर्षाचा एका पुरुषाचा, छत्रपती नगर नांदेड येथील 60 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान या आठ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 439 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 13, अर्धापुर कोविड केंअर सेंटर 7, लोहा कोविड केंअर सेंटर 4, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, माहूर कोविड केंअर सेंटर 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 30,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 5,  एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 99, कंधार कोविड केंअर सेंटर 3, किनवट कोविड केंअर सेंटर 6, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, खाजगी रुग्णालय 23 असे 205 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.53 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 39, अर्धापूर तालुक्यात 1, कंधार 7, धर्माबाद 1, परभणी 3, हदगाव 1, किनवट 1, बिलोली 2, हिंगोली 3, यवतमाळ 1 असे एकुण 59 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 56, लोहा तालुक्यात 4, हदगाव 3, माहूर 1, उमरी 13, अर्धापूर 2, मुखेड 11, नायगाव 6, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 4, किनवट 7, देगलूर 1, धर्माबाद 1, परभणी 1, मुदखेड 4, कंधार 2, बिलोली 3, यवतमाळ 1, असे एकूण 121 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 879 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 205, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 889 , जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड नवी इमारत येथे 28, आयुवैदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 16, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 57, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 28, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 34,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 25, लोहा कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर 38, भोकर कोविड केअर सेंटर 26,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 19,  मुदखेड कोविड केअर सेटर 14, माहूर कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड केअर सेंटर येथे 33, धर्माबाद कोविड केअर सेंटर 43, उमरी कोविड केअर सेंटर 57, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 226, बारड कोविड केअर सेंटर 1, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 20, लातूर येथे संदर्भित 2, औरंगाबाद येथे संदर्भित 2, मुंबई येथे संदर्भित 2, निजामाबाद येथे संदर्भित 5, आदिलाबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 87 हजार 701,

निगेटिव्ह स्वॅब- 68 हजार 047,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 632,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 213,

एकूण मृत्यू संख्या- 439,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.53

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 454, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 879,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 33.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी

उच्च माध्यमिक शिक्षकांनी 8 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणा-या क.महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी इ. 12 वी, पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व त्या तदनुषगिक बाबीसंदर्भात सर्व विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, हे प्रशिक्षण घेणे सर्व क.महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. या प्रशिक्षणासाठी उच्चमाध्यमिक कनिष्ठ महाविदयालयातील सर्व विषय शिक्षकांची ऑनलाईन नाव नोंदणी करुन घेण्यात येत आहे. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रशिक्षणास प्रविष्ठहोण्यासाठी मंडळाच्या evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रात/ फार्म मध्ये आपली माहिती दि. 1 ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत भरावयाची आहे.त्यानंतर सदर लिंक बंद केली जाईल. तरी उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी इ. बारावी,पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तदनुषंगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विहित मुदतीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

परतीच्या पावसापासून

सोयाबिन, ज्वारी पिकांचे संरक्षण करा

नांदेड (जिमाका) दि. 6 :-जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये 9 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर 2020  या कालावधीत परतीच्या पावसाची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीतमध्ये सोयाबिन व ज्वारी यापिकांची काढणी सुरु असून पिकांची काढणी करुन ढीग केला असल्यास व्यवस्थीत झाकून ठेवावा. शक्य असल्यास लवकरात लवकर मळणी करुन घ्यावी. सोयाबिन, ज्वारी व इतर पिकांची येणाऱ्या पावसापासून काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रविशंकर चलवदे यांनी केले आहे.   

0000

 

दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या परवान्यासाठी

20 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 6 :-दिपावली उत्‍सव दिनांक 14 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 7 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख 20 ऑक्‍टोंबर 2020 आहे. तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात खाली नमुद कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम नुसार दिनांक 07 ऑक्टोबर, 2020 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.

तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत. नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण,साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्‍वये सदर दुकानातील एकमेकापासून किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्‍यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच नकाशा स्‍थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो.लायसन फीस रूपये 500/- चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिक रित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्‍याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत / ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र.

जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत/मान्‍यताप्राप्‍त असोसिएशन मार्फत तात्‍पूरता फटाका परवानासाठी अर्ज केल्‍यास या कार्यालया मार्फत देण्‍यात येणा-या परवान्‍यातील नमूद ज्‍या अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल. तसेच कोणत्‍याही विस्‍फोटक नियमांचे व परवान्‍यातील अटी व शर्तीचे उल्‍लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल या बाबत सबंधित असोसिएशन कडील शपथपत्र. दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील 1.अग्निशमन दल 2.सुरक्षा रक्षक इ.इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.

कोव्हिड-19  विषाणूच्या अनुषंगाने शासनस्तरावरुन तसेच विस्फोटक नियंत्रक व इतर संबंधित विभागाकडून वेळोवळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून देण्यात येते. अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 27 ऑक्टोबर, 2020 व  29 ऑक्टोबर,2020 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.

दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

0000

 

बचतगटांना 90 टक्के अनुदानावर

मिनि ट्रॅक्टरची निवड यादी प्रसिद्ध

नांदेड (जिमाका) दि. 6 :- अनुसूचित जातींच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची निवड यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवड यादीत ज्या बचतगटांची नावे आहेत त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची मुळ पावती जीएसटीसह सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने  अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित असून लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने सन 2018-19 या वर्षात ज्या बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी एकूण 365 बचतगटांनी अर्ज केले  होते. प्राप्त अर्जात  163 बचतगटांचे अर्ज तपासणी अंती पात्र ठरविण्यात आले होते. या पात्र बचतगटांमधून सन 2019-20 या आर्थिक वर्षात प्राप्त तरतुदीनुसार 97 बचतगटांची निवड करण्यात आली आहे. ही निवड यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेच्यासमोर, अर्धापूर रोड, नांदेड येथे कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. ज्या बचतगटांचे नाव यानिवड यादीत आहेत त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करुन खरेदी केल्याची मूळ पावती जीएसटीसह सादर करावी असेही आवाहन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

00000

 

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या  

विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघुउद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. इ.मा.व. प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobefdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

बीज भांडवल कर्ज योजना

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनातंर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल.

थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना

महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते या योजनेत लाभार्थी सहभाग नाही, अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. 2 हजार 85 रुपये नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही. परंतु, थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना

गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम 1 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्याची ही योजना आहे.

00000

नांदेडच्या सायकलपटू व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

तरोडानाका ते लिंबगाव रस्ता सकाळी अवजड वाहनासाठी बंद

 नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड शहरातील तरोडानाका ते लिंबगाव या मार्गावर दररोज सकाळी व्यायामासाठी तरुणाई पासून ज्येष्ठ नागरिकांची असलेली वर्दळ व सकाळच्यावेळी या मार्गावर अपघाताबाबत आलेल्या निवेदनाचा विचार करुन दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नांदेड शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्यावेळी हा मार्ग सायकलपटू व पायी फिरणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. या विनंतीचा व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी हे निर्देश दिले.   

या निर्देशाप्रमाणे तरोडानाका ते लिंबगाव पर्यंत सकाळी 6 ते 9 या कालावधीत यापुढे जर अवजड वाहने आल्यास मोटार ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिले. जनहित लक्षात घेऊन व जिल्ह्यातील युवा क्रीडापटू, खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल क्रीडापटूंनी समाधान व्यक्त केले.

00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...