Saturday, October 1, 2016

जिल्ह्यात हंगामात 106.91 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 32.31 मि.मी. 
           नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात  रविवार 2 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 516.99 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 32.31 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1021.54 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-149.19, नांदेड-125.95, अर्धापूर-124.89, कंधार-120.87, भोकर-120.51, मुखेड-119.51, बिलोली-109.29, हदगाव-108.59, नायगाव-103.49, माहूर-99.29, धर्माबाद-96.04, मुदखेड-95.68, हिमायतनगर-92.22, देगलूर-91.49, उमरी-90.82, किनवट-81.24. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  106.91 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात रविवार 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 51.75 (1148.53), मुदखेड- 29.33 (816.69), अर्धापूर-29.00 (1086.00), भोकर-18.25 (1200.75), उमरी-40.00 (904.93), कंधार-49.00 (974.97), लोहा-30.83 (1243.17), किनवट-26.71 (1007.32), माहूर-24.00 (1231.25), हदगाव-21.43 (1061.27), हिमायतनगर-14.00 (901.31), देगलूर-33.67 (823.67), बिलोली-16.20 (1058.00), धर्माबाद-15.33 (879.38), नायगाव-28.20 (947.54), मुखेड-89.29 (1059.85) आज  अखेर  पावसाची सरासरी 1021.57 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 16344.63) मिलीमीटर आहे. 

 00000
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
5 ऑक्टोंबर रोजी बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 :-  जिल्ह्यातील  शासनाच्या  कोणत्याही  कार्यालयामध्ये  चालू  असलेल्या  किंवा आजपर्यंत  केल्या  गेलेल्या  भ्रष्टाचाराबाबत  कोणाची  काही  तक्रार  असल्यास  अथवा एखाद्या कार्यालयामध्ये चालू असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी  स्वरुपात  तक्रार बुधवार 5 ऑक्टोंबर  2016  रोजी आयोजित  जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीच्या  बैठकीत  सादर  करावी , असे  आवाहन जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीचे  अध्यक्ष  सुरेश काकाणी  यांच्यावतीने  करण्यात  आले.     
येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हाधिकारी  यांचे निजी कक्षात बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी  11  वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत  निवेदन  लेखी  स्वरुपात  प्रत्यक्ष  उपस्थित  राहून  सादर  करावे  लागेल.  हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मूलन  समिती  नांदेड  या  नावाने  सबळ  पुराव्यासह  दोन  प्रतीत  सादर  करावे  लागेल.
या  बैठकीसाठी  सर्व  विभागांचे  प्रमुख  अधिकारी  उपस्थित  राहणार   असल्यामुळे  आपल्या  निवेदनाची तातडीने दखल  घेवून  शासनाच्या  नियमानुसार   भ्रष्टाचार  करणाऱ्या  अथवा भ्रष्टाचारास  वाव  देणाऱ्या  जबाबदार  अधिकारी  व कर्मचारी  यांच्याविरुध्द  कार्यवाही  करण्यात  येईल,  असे  आवाहनही  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीतर्फे  करण्यात  आले आहे.

00000000
ऑटोरिक्षा परवाना नुतनीकरणाचे आवाहन  
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यातील ऑटोरिक्षा परवानाधारकांचे अपर परिवहन आयुक्त मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 1 नोव्हेंबर 2014 नंतरचे मुदतबाह्य ऑटोरिक्षा परवाने विहित शुल्क आणि विलंब शुल्क आकारुन नुतनीकरण करण्यात येणार आहेत. संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000000
पिडीत महिलांना विधी सहाय्यासाठी
विधी चिकित्सालयाची स्थापना
नांदेड, दि. 2 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत नुकतेच अर्धापूर तालुक्यातील श्री साईनाथ लोककला केंद्र भोकरफाटा दाभड येथे पिडीत महिलांच्या  मदतीसाठी  विधी चिकित्सालयाची  स्थापना  करण्यात आली आहे. या चिकित्सालयासाठी अर्धापूर तालुक्यातील लोण येथील अश्विनी गोवंदे व छाया लोणे यांची पीएलव्ही म्हणून तर मार्गदर्शन, समस्या सोडवणे, कायदेशीर कार्यवाहीसाठी अॅड.  प्रविण अयाचित व अॅड. विजय गोणारकर यांची पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव न्यायाधीश  ए. आर. कुरेशी मार्गदर्शन करताना म्हणाले, पिडीत महिलांनी पीएलव्ही व विधीज्ञांचा सल्ला घेवून आडचणी दूर कराव्यात. अॅड. अयाचित, अॅड गोणारकर, अॅड. के. एम. सोनुले, अॅड. अर्चना घोरपडे, अॅड. पंचशिला झगडे यांनी मार्गदर्शन केले. शाहीर रमेश गिरी, कलाकेंद्राच्या प्रमुख विद्याताई काळे, मिनाताई काळे, सचिन काळे, बेगम बाबालाल कळवात, मिनाताई परभणीकर, शाम कांबळे, नितीन काळे, ज्येष्ठ कलावंत कांताबाई पवार, बबनबाई लोदगेकर  यांनी मनोगत व्यक्त केले.

000000

मुखेडमधील तरुणाची सूखरुप सुटका , डोंगरगाव मधील नागरिकांच्या सुटकेसाठी वेळेत पथक पोहचविण्यासाठी प्रयत्न

मुखेडमधील तरुणाची सूखरुप सुटका , डोंगरगाव मधील नागरिकांच्या सुटकेसाठी वेळेत पथक पोहचविण्यासाठी प्रयत्न
           नांदेड, दि. 1 :-  लिंबोटी  धरणाच्या  अचानक  आलेल्या पाण्यामुळे  लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवारात सुमारे 23 जण अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांत आता लिंबोटीचे दरवाजे  बंद होऊ लागल्याने मदत कार्याला वेग आला आहे. दरम्यान, मुखेडमध्ये  कुंद्राळा तलावाच्या पाण्यात अडकलेल्या मारूती सोनपल्ले  या पंचवर्षीय तरुणाची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे.
डोंगरगाव शिवारातील काही घरात नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तर अन्य काही शेतातच अडकले आहेत. या सुमारे 23 जणांच्या सुटकेसाठीही मन्याडचे पाणी ओसरू लागल्याने मदत कार्यात वेग येऊ लागला आहे. नदीपात्राच्या दुसऱ्या बाजुने या पाण्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहचण्यात स्थानिक मदत पथक प्रयत्न करत आहे. त्यामध्येही यश येऊ लागले आहे.
बीडहून  रवाना झालेल्या  एनडीआरएफच्या पथकासह थेट घटनास्थळी पोहचण्यास निर्देशित करण्यात आले आहे. दरम्यान, डोंगरगाव येथील शिवारात आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक अशी प्रकाश व्यवस्था (लाईट टॅावर) तसेच अनुषांगिक, मदतीसाठीची बोट सामुग्री पोहचविण्यात येत आहे.
मुखेड तालुक्यातील कुंद्राळा तलावाच्या पाण्याच्या अडकलेल्या मारूती सोनपल्ले या तरूणाची सुटका करण्यात यश आले आहे. उपविभागीय अधिकारी व्ही. एल. कोळी तसेच स्थानिक मदत पथक यांनी या तरुणाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.
दरम्यान,  लिंबोटी धरणाचे दरवाजे हळू-हळू बंद होऊ लागल्याने, मन्याडचे पाणी ओसरू लागले आहे. तरीही नदीकाठच्या रहिवाश्यानी सतर्कता बाळगावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालिन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध पातळ्यावंरील माहितीची देवाण-घेवाण, संपर्क-समन्वय यासाठी कार्यरत आहेत.

 00000
डोंगरगाव मधील नागरिकांच्या सुटकेसाठी शर्थीचे  प्रयत्न सूरु
नागरीकांनी संयम बाळगावा , कोणत्याही धरणास धोका नाही
           नांदेड, दि. 1 :-  लिंबोटी  धरणाच्या  अचानक  आलेल्या पाण्यामुळे लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवारात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 23 जणाच्या सुटकेसाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. या नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या पश्चिम कंमाडकडून गुजरात येथील गांधीनगर येथूनही हेलिकॅाप्टर  बोलाविण्यात  आले आहे. पूरस्थितीबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. डोंगरगाव येथे मदतीसाठी लोहा, कंधार तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह, नांदेड महापालिकेचे आपत्ती निवारण पथक तातडीने डोंगरगाव येथे पोहचली आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरआफ) चे पथकही रात्री याठिकाणी पोहचणार आहे. डोंगरगाव येथे सुटकेसाठी बोलाविण्यात आलेले हवाई दलाचे हेलीकॅाप्टर सायंकाळच्या अंधारामुळे आणि खराब हवामानामुळे परत गेले आहे. त्यामुळे तातडीने अन्य ठिकाणाहून म्हणजेच गुजरात गांधीनगर येथून हवाईदलाचे रात्रीही मदत आणि सुटकेसाठी काम करू शकणाऱ्या हेलिकॅाप्टर बोलाविण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तातडीने पोहचावे यासाठी समन्वय व संपर्क साधण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापनाशी  संबंधीत  यंत्रणा  डोंगरगाव येथे पुरात अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. पाण्यात अडकलेल्यांनाही  धीर देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा स्तरावरूनही विविध प्रकारची मदत आणि सुटकेसाठीचे साहित्य तसेच साधनसामुग्री वेळेत पोहचेल यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधून समन्वय करीत आहेत. याबाबत वरीष्ठ आणि आपत्ती व्यवस्थानासाठी मदत करू शकणाऱ्या राज्यस्तरीय यंत्रणाच्या वरीष्ठांशी वेळोवळी माहितीची देवाण-घेवाण केली जात आहे. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच विविध स्तरावरील अधिकारी आपत्ती  व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध प्रयत्न करत आहेत.
लोहा तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे, कंधारच्या तहसिलदार अरूणा संगेवार व अधिकारी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची टीम डोंगरगाव येथे प्रत्यक्ष थांबून नागरिकांना धीर देत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्यासह अन्य एका पथकही डोंगरगावकडे रवाना करण्यात येत आहे.
 00000



जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा सज्ज
नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्कता बाळगण्याचे आवाहन
           नांदेड, दि. 1 :-  नांदेड जिल्ह्यात अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. डोंगरगाव येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
लिंबोटीसह जिल्ह्यातील सर्व धरण, प्रकल्प सुरक्षीत असून नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   लिंबोटी धरणाचे सर्व दरवाजे खुले झाल्याने लोहा तालुक्यातील डोंगरगाव गावातील 23 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, बिदर येथून आलेल्या हवाई दलाच्या हेलीकॅाप्टरने या तेवीस जणाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान, संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) दलाला पाचारण करण्यात आले आहे.  हे दल रात्रीपर्यंत जिल्ह्यात पोहचणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. जोरदार पावसामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीवर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी स्वतः नजर ठेवून आहेत. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणाचे तातडीने समन्वय सुरु केले आहे. मुखेड येथे कुंद्राळा तलावाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या बेटावर एक मुलगाही अडकला आहे. त्याच्या सुटकेसाठीही सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने लिंबोटी धरणाचे चौदा दरवाजे खुले झाले आहेत. बारुळ प्रकल्पातूनही पाणी बाहेर पडले आहे. तर विष्णपुरी प्रकल्पातून दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. सखल परिसरातील नागरिकांनी दक्ष राहवे असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 00000
जिल्ह्यात हंगामात 103.52 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 29.96 मि.मी. 
           नांदेड, दि. 1 :- जिल्ह्यात  शनिवार 1 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 479.38 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 29.96 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 989.23 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-145.49, अर्धापूर-121.55, नांदेड-120.27, भोकर-118.68, कंधार-114.80, मुखेड-109.45, बिलोली-107.61, हदगाव-106.40, नायगाव-100.41, माहूर-97.36, धर्माबाद-94.37, मुदखेड-92.24, हिमायतनगर-90.79, देगलूर-87.75, उमरी-86.81, किनवट-79.08. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  103.52 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात शनिवार 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 38.63 (1096.78), मुदखेड- 21.67 (787.36), अर्धापूर-43.00 (1057.00), भोकर-48.75 (1182.50), उमरी-32.33 (864.93), कंधार-45.17 (925.97), लोहा-54.17 (1212.34), किनवट-10.29 (980.61), माहूर-5.00 (1207.25), हदगाव-12.86 (1039.84), हिमायतनगर-10.00 (887.31), देगलूर-47.33 (790.00), बिलोली-40.80 (1041.80), धर्माबाद-18.67 (864.05), नायगाव-21.00 (919.34), मुखेड-29.71 (970.56) आज  अखेर  पावसाची सरासरी 989.23  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 15827.64) मिलीमीटर आहे. 

 00000
 विक्रीकराच्या महसुलातून विकासात्मक
कामात मोठे योगदान – खासदार चव्हाण
विक्रीकर दिन कार्यक्रमात जागरूक करदाते , कार्यक्षम अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

नांदेड दि. 1 :- विक्रीकर  विभागाची  कार्यक्षमता , हीच राज्याचीही कार्यक्षमता मानली जाते. त्यामुळे या कराच्या महसुलातून राज्याच्या विकासात्मक कामात मोठे योगदान दिले जाते , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले. विक्रीकर विभागाच्या नांदेड सह आयुक्त कार्यालयाच्यावतीने  विक्रीकर  दिनाच्या  निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात नांदेड विभागातील जागरूक करदाते तसेच करसंकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही  सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रीकर दिनानिमित्त मुंबईत आयोजित विक्रीकर दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या भाषणाचेही थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले.
व्यासपीठावर  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलताई गुंडले, सर्वश्री आमदार अमर राजूकर, डी. पी. सावंत, वसंत चव्हाण, सुभाष साबणे, हेमंत पाटील यांच्यासह सह विक्रीकर आयुक्त एन. एम. कोकणे आदींचीही प्रमुख उपस्थिती होती.
खासदार चव्हाण पुढे म्हणाले की , राज्याच्या महसुलात विक्रीकराचा मोठा वाटा आहे. या करातून राज्यातील विकासात्मक कामांमध्ये योगदान दिले जाते. त्यामुळे विक्रीकर विभागाची कार्यक्षमता हीच राज्याची कार्यक्षमता समजली जाते. करप्रणालीतील सुटसूटीतपणा आणि सुकरता यामुळे करदात्यांनाही प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे उद्योग-व्यवसाय-व्यापार यांच्या वाढीसाठी कर प्रणालीतील सुविधाही महत्त्वाची आहे. ई-फायलींग, ॲप तसेच माहिती तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळे कर प्रणाली सोपी झाली आहे. त्यामुळेही करदात्यांची संख्या वाढली आहे. कर देण्याबाबतही जागरुकता वाढली आहे. कर हे ओझे न वाटता, कर देण्यासाठी करदात्यांना प्रोत्साहीत करणाऱ्या योजना राबविता येतील. विभागातील नांदेड, लातूरसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उद्योग-व्यापार यांच्या वाढीसाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरून विक्रीकरात आणखी भरच पडेल, अशी अपेक्षाही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात नांदेड विभागाचे विक्रीकर सहआयुक्त श्री. कोकणे यांनी नांदेडसह, लातूर, परभणी आणि  हिंगोली  जिल्ह्यातून  गत आर्थिक वर्षात 452 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता, तर या आर्थिक वर्षातील गत पाच महिन्यात उद्दीष्टपुर्तीहून अधीक 237.4 कोटी रुपयांचा महसूल एकत्रित करण्याची विभागाने कामगिरी केल्याची माहिती दिली.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. तसेच तत्पर आणि जागरूक करदाते म्हणून उद्योजक-व्यावसायिकांचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये बाफना मोटर्स-संचालक प्रभाकर विश्र्वास, साई स्मरण फुडस लिमीटेड –नरेश गोयंका, शिवा ग्लोबल इंडस्ट्रीज- दिपक मालीवाल, गजानन स्पेअर हब- सतिश पाटील, एल.बी. कॅाटन इंडस्ट्रीज धर्माबाद - धर्मेंद्र पांडे (आदित्य पल्लोड), राजयोग ॲटो प्रा.लि.लातूर-योगीराज जाधव, अरिहंत फायबर्स परभणी- अजय सरीया, मारूती ॲटो हिंगोली – नरेश देशमुख यांचा समावेश होता. तर कर संकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती शोभाबाई मिरासे (सेविका), भारत बुरकूले (लिपीक), विक्रीकर निरीक्षक-संजय अडकिणे व सुधाकर वसावे, विक्रीकर अधिकारी प्रकाश गोपनर, सहायक विक्रीकर आयुक्त रविंद्र जोगदंड, उपायुक्त श्रीमती रंजना देशमुख यांचा समावेश होता. याशिवाय उल्लेखनीय कामगिरीसाठी उपायुक्त दिपक वाघमारे, विक्रीकर अधिकारी माधव पुरी, नंदकिशोर लुल्ले, कर निरीक्षक मनोज गजभारे, सेवक पाशा मोईनुद्दीन बेग यांचाही सत्कार करण्यात आला.
सुरवातीला  मीना  सोलापूरे यांनी स्वागत गीत सादर केले. सहायक आयुक्त पंडित जाधव, मदन दराडे यांनी संयोजन केले. सहायक आयुक्त श्री. जोगदंड, विक्रीकर अधिकारी आनंद मुधोळकर, निरीक्षक अंजली दासरे यांनी सुत्रसंचलन केले, उपायुक्त श्रीमती देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्यापारी, उद्योजक यांच्यासह सनदी-लेखापाल, कर-सल्लागार विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.
0000000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...