Friday, December 23, 2022

 पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बालदिवस व नांदेड महोत्सवाचे रविवारी उद्घाटन

 नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे सकाळी 10 वा. होणार आहे. ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

याचबरोबर माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पर्यटन संचलनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. माळवदे यांची उपस्थिती राहणार आहे.   

 

वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवात रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वा. या कालावधीत गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर, नांदेड येथे चर्चासत्र. सायं. 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत मार्शल आर्टस्, रात्री 8.30 वा. गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे शबद किर्तनाचे आयोजन केले आहे.

 

सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते 11 वा. महात्मा फुले पुतळ्यापासून ते गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसर नांदेड या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. दुपारी 12.15 ते 2.30 या कालावधीत गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसर नांदेड येथे निबंध, वक्तृत्व स्पर्धा व कविता वाचन. सायं. 5.30 ते 6.30 पर्यंत गोदावरी नदीकाठी (नगीनाघाट) येथे मार्शल आर्टस तर रात्री 8.30 वा. गुरूग्रंथ साहिब भवन यात्री निवास परिसरात शबद किर्तनाचे आयोजन केले आहे.

0000

 लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख

-   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- ग्रामीण व दुर्गम भागासह सर्व लोकांची शासनाशी संबंधित असलेली सर्व कामे पारदर्शक पद्धतीने व निर्देशीत केलेल्या कालावधीत निकाली निघाली पाहिजेत. यासाठी लोकाभिमूख प्रशासन महत्वाचे असते. प्रशासकीय पातळीवर याला अधिक गती मिळावी व कर्तव्य तत्परता वाढावी यादृष्टिने 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख असते. याला चालना मिळावी व जिल्ह्यात ज्या-ज्या विभागामार्फत अधिक पारदर्शक व लोकाभिमूख कामे पार पडली आहेत अशा कामांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. चांगले उपक्रम हे सदैव राबविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

सुशासन सप्ताह व 25 डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सुशासन दिनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, भोकर तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रेखा काळम यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत सचित्र सादरीकरण केले.

000000 






डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषी प्रदर्शनाचे

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते माळेगाव येथे उद्घाटन संपन्न

डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 23 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत 22 ते 26 डिसेंबर कालावधीत कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन 22 डिसेंबर 2022 रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेट्टे, महाराष्ट्र शासनाचे कृषि भुषण प्राप्त शेतकरी डॉ.शिवाजी शिंदे, आत्मा प्रकल्प उपसंचालक श्रीमती सोनवणे, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) श्रीमती भाग्यश्री भोसले, मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर, जिल्हा कृषि अधिकारी व्ही.एस. निरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांची उपस्थिती होती.

डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले. यामध्ये शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2021-22 चे 16 व 2022-23 चे 16 असे एकूण 32 शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह, साडीचोळी, शाल, फेटा व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. जिल्हयातील शेतकरी, कृषि निविष्ठा कंपनीचे प्रतिनिधी स्टॉलधारक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी कृषि विभागामार्फत आयोजित फळे, भाजीपाला, मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या गुणवत्ता पुर्ण पिकांच्या नमुन्याचे पाहणी करुन शेतकऱ्यांचे कौतुक केले.

या कृषि प्रदर्शनात एकूण 113 स्टॉल आहेत. ट्रॅक्टर, कृषि औजारे उत्पादक, बियाणे उत्पादक कंपनी, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, सेंद्रीय शेती उत्पादन, खाद्यपदार्थ, शेतकऱ्यांची शेती उत्पादने, नर्सरी, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, महाबीज, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, तालुका कृषि अधिकारी लोहा यांचे हे कृषि स्टॉल यात्रेच्या पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत स्टॉल सुरु राहणार आहेत. जिल्हा परिषद कृषि विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला, मसाला पिकांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध पिकांच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या पिकांमध्ये स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट नमुन्याची निवड उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीमार्फत करण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या उमेदवारांना अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये, 2 हजार रुपये बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांनी केले तर सुत्रसंचालन राम कवडे यांनी केले. आभार कृषि अधिकारी सिकंदर पठाण यांनी मानले. हे प्रदर्शन आयोजनासाठी जिल्हा कृषि अधिकारी व्ही.एस. निरडे, पुंडलिक माने, माजी जिल्हा कृषि विकास अधिकारी संभाजी कऱ्हाळे, मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर यांनी सहाय्य केले.

00000

 आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या

ऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यत मुदतवाढ 


नांदेड (जिमाका) दि. 23 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली  (कासराळी) येथील केंद्रावर सुरू आहे. ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शनिवार 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 


नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेराऑनलाईन नोंद असलेला सातबाराबँक खात्याची साक्षांकीत प्रतआधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000

 अहिल्या शेळी योजनेत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यात शेळी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना आहे. या योजनेतर्गंत राज्यातील वय वर्षे 18 ते 60 मधील अनुसूचित जाती/जमाती, दारिद्र रेषेखालील, अल्पभूधारक  (1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक) अशा लाभार्थ्यांकडून रविवार 25 डिसेंबर 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांनी केले आहे.

 

या योजनेची माहिती/अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबत संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या  www.mahamesh.co.in संकेतस्थळावर तसेच ॲन्ड्राईड मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वरुन अहिल्या योजना ॲपद्वारे वरील दिलेल्या दिनांकामध्येच करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील यांची नोंद घ्यावी.  इच्छूक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत असेही कळविले आहे.

00000

कृपया सुधारित वृत्त

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदान

केंद्राची प्रारुप यादी 24 डिसेंब रोजी प्रसिद्ध

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्य सभा आणि राज्य विधान परिषदेसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्तपुस्तिकेतील प्रकरण 2 परिच्छेद 14.1 मधील निर्देशानुसार 5-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक 2023 साठी मतदान केंद्राची प्रारुप यादी शनिवार 24 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ही यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी तसेच सर्व तहसिलदार यांचे कार्यालयात मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरची प्रारुप यादी नांदेड जिल्ह्याचे संकेतस्थळ https://nanded.gov.in यावर देखील मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

 

मतदान केंद्राच्या प्रारुप यादी संबंधाने हरकती व सूचना ही यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार 30 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांचेकडे सादर करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

0000

 जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातील अर्जांसाठी

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित  

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्‍याच्‍या अनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालय स्‍तरावर मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्‍थापन करण्‍यात आले आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्‍य जनतेचे दैनंदिन प्रश्‍न, शासन स्‍तरावर असलेली कामे व त्‍यासंदर्भात प्राप्‍त होणारे अर्ज, निवेदने इत्‍यादीवर कार्यवाही करण्‍यात येते. 

 

याबाबत राज्याचे मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. राज्‍यातील सर्वसामान्‍य जनतेचे दैनंदिन प्रश्‍न, शासनस्‍तरावर असलेली कामे यासंदर्भात वेळोवेळी निवेदने / अर्ज प्राप्त होतात. त्याअनुषंगाने प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्‍यासाठी प्रत्‍येक जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी कार्यालयामध्‍ये मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय निर्देशाप्रमाणे सुरू करण्यात आले आहे.  

 

जिल्‍हयातील उपलब्‍ध असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्‍यामधून आवश्‍यक अधिकारी, कर्मचारी यांच्‍या सेवा सदर मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्‍ध करुन देण्यात आल्या असून निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड हे या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी असणार आहेत. त्यांच्या अधिनस्त नायब तहसिलदार करमणूक कर व पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. प्राप्त निवेदनांच्या तात्काळ निपटाऱ्यासाठी या चार  कर्मचाऱ्यांकडे महसूली उपविभाग निहाय कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. याद्वारे नांदेड जिल्ह्यातील जनतेला त्यांचे अर्ज मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-32 द्वारा मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड असे उद्देशून लिहिलेली अर्ज, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आवक-जावक शाखेत सादर करुन त्याची पोच पावती घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.   

 

जे अर्ज, संदर्भ व निवेदने यावर जिल्‍हास्‍तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे संबंधीत जिल्‍हा स्‍तरावरील संबंधीत विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्‍यावर तातडीने कार्यवाही शासन स्तरावरील निर्देशान्वये करण्याच्या सुचना संबंधीत कक्षास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत. ज्‍या प्रकरणी शासन स्‍तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी सर्व वैयक्तिक / धोरणात्‍मक अर्ज, संदर्भ व निवेदने अपर मुख्‍य सचिव, मुख्‍यमंत्री सचिवालय, मुंबई -32 यांना सादर करण्‍यात येतील.  

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...